**कर्तव्यकठोर राधाबाई पेशवे**

सदर चित्र बाळाजी विश्वनाथ पेशवे पुस्तकातून साभार

(थोड्या दिवसांपूर्वी आलेल्या पेशवा बाजीराव ह्या कार्यक्रमात राधाबाईंचे व्यक्तिमत्व दाखवलेच आहे,पण cinematic liberty च्या नावाखाली बऱ्याच गोष्टी चुकीच्या दाखवल्या जातात.कादंबरी,सिनेमे,कार्यक्रम ह्यातून दाखवला जाणारा इतिहास पूर्णपणे बरोबर असतो असे म्हणता येत नाही.इतिहास हा पुराव्यांवर अवलंबून असतो,त्यामुळे त्याचा अभ्यास करणे गरजेचे!)

कोकणातील गणपतीपुळ्याच्या आग्नेयेला असलेले नेवरे हे राधाबाईंचे माहेरचे गाव होय.त्यांचे वडील दादाजी जोगदेव बर्वे हे सावकार होते.राधाबाईंचा जन्म कधी झाला याचे साल उपलब्ध नाही.त्यांना मल्हारपंत व त्र्यंबकपंत नावाचे दोन थोरले भाऊ होते.राधाबाईंना चांगले लिहिता वाचता येत होते ह्या गोष्टीला भरपूर आधार आहे.त्यांचे हस्ताक्षर जुन्या वळणाचे बाळबोध पद्धतीचे असावे.त्यांचा विवाह श्रीवर्धनच्या भट घराण्यातील बाळाजी विश्वनाथ भट यांच्याशी झाला.लग्नावेळी बाळाजी हे १२-१३ वर्षांचे व राधाबाई ह्या ६-७ वर्षांच्या असाव्यात असा तर्क आहे.त्यांचा विवाह नेवरे येथे झाला असावा.हे लग्न २० रु. झाले अशी ख्याती आहे.राधाबाईंना थोरले बाजीराव,चिमाजीआप्पा,भिऊबाई,अनुबाई अशी चार अपत्ये होती.थोरल्या बाजीरावांचा जन्म १८ ऑगस्ट १७०० रोजी झाला.त्यांचा विवाह महादजी कृष्ण जोशी(चासकर) यांची कन्या लाडूबाई उर्फ काशीबाई यांच्याशी १७१२ मध्ये झाला.चिमाजीआप्पांचे जन्मसाल नमूद नाही,पण त्यांचा जन्म १७०३ सालचा असावा.त्यांचा विवाह विसाजी कृष्ण पेठे यांची कन्या रखमाबाई यांच्याशी १७१६ साली झाला.राधाबाई यांची कन्या भिऊबाई यांचा जन्म १७०८ साली झाला व त्यांचा विवाह १७१२ मध्ये आबाजी सदाशिव(नाईक)जोशी यांच्याशी झाला.अनुबाई ह्या पेशव्यांच्या कुटुंबातील सर्वात धाकटी कन्या होय.त्यांचा जन्म १७१४ सालचा.त्यांचा विवाह १७१९ साली नारायणराव महादेव घोरपडे(जोशी) यांचा मुलगा व्यंकटराव याच्याशी झाला.बाळाजी विश्वनाथांनी शाहू महाराजांची मर्जी संपादन केलीच होती,तसेच स्वतःच्या स्वकर्तृत्वाच्या बळावर त्यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली.१७ नोव्हेंबर १७१३ रोजी पुण्याजवळच्या मांजरी या गावामध्ये शाहू महाराजांनी त्यांना पेशवाईची वस्त्रे दिली.हे सारे बहुतांश अंबाजीपंत पुरंदरे यांच्या सल्ल्याने घडले होते.आता बाळाजी हे पेशवे व राधाबाई पेशवीणबाई झाल्या होत्या.

बाळाजी हे उत्तम सेनानी होते.पेशवेपद मिळण्यापूर्वी व मिळाल्यानंतर देखील त्यांनी खूप मोठ-मोठी कामे स्वराज्यासाठी केली.१७१९ मध्ये केलेली दिल्लीची स्वारी ही त्याच यशाचे प्रतिक होते.त्यांनी मुघलांच्या ताब्यातून महाराणी येसूबाई व इतर लोकांची सुटका केली,त्याचबरोबर चौथाईच्या सनदा आणल्या.या स्वारीनंतर शाहू महाराजांनी साताऱ्यात खूप मोठा दरबार भरवला.तिथे बाळाजी विश्वनाथांचा शाहू महाराजांनी स्वहस्ते भव्य सत्कार केला.१७२० मध्ये इस्लामपूरच्या लढाईनंतर ते सासवडला घरी आले व आल्यानंतर लगेच आजारी पडले.दिल्ली स्वारीनंतर लगेचच कोल्हापूर स्वारीत झालेली दगदग त्यांना मानवली नाही.२ एप्रिल १७२० रोजी सासवडच्या काळ्या वाड्यात त्यांचा मृत्यू झाला.बाळाजी गेल्यानंतर राधाबाईंनी पतीनिधनाचे दुखः बाजूला ठेवून बाजीरावांना पेशवाईची वस्त्रे घेण्यास साताऱ्याला पाठविले.सातारा दरबारात अनेक लोक शाहू महाराजांच्या कानाशी लागले.सातारा दरबारातील परीस्थिती राधाबाईंना चांगल्या प्रकारे माहित होती.परंतु महाराज कोणासही बधले नाहीत.त्यांनी बाजीरावांना पेशवाईची वस्त्रे बहाल केली.चिमाजीआप्पांना मुतालकीची वस्त्रे मिळाली.ते पेशव्यांच्या वतीने कारभार पाहू लागले.

राधाबाई ह्या बाळाजी विश्वनाथ ह्यांच्या कर्तुत्वाला शोभतील अशाच पत्नी होत्या.त्या हिंमतावन म्हणून पूर्वायुष्यापासून नावाजल्या होत्या.कर्तव्यकठोर आणि शिस्तप्रिय म्हणून त्यांचा सर्वत्र दरारा होता.त्यांना राजकारणाची चांगली जाण असून प्रसंगी राजकारस्थाने रचून तडीलाही नेत.मुलांवर अपरंपार माया हे त्यांचे वैशिष्ट्य होते.त्या मुलांना योग्य सल्ला देत व मार्गदर्शन देखील करत.राधाबाई  ह्या पेशव्यांच्या घरातील कर्तबगार स्त्रियांपैकी एक होत्या.पेशव्यांच्या घरातील सर्व कारभार राधाबाईंच्या सल्ल्यानेच चालत असे.व्यावहारिक दृष्टीने पेशव्यांच्या सोयरिकी श्रीमंत घराण्यात करण्याची राधाबाईंची खटपट असे.राधाबाईंची थोरली सून सौ.काशीबाई,थोरली नातसून गोपिकाबाई,थोरली पणतसून लक्ष्मीबाई या सावकारांच्या मुली होत्या.त्यांचा एक नातू राघोबा याच्यासाठी ओंकार सावकारांची मुलगी करावी अशी राधाबाईंची इच्छा होती,त्याचे कारण यावरून स्पष्ट व्हावे.पेशव्यांच्या घरातील मुली(सुना,पत्नी)ह्या प्रतिष्ठित घराण्यातील हव्यातच,खेरीज त्या देखण्या,रूपवान असाव्यात अशी राधाबाईंची अपेक्षा असे.साधी,काटक,साहसी वृत्ती त्यांनी मुलांमध्ये बाणवली,त्यामुळे पुढे सगळ्यांचा उत्कर्ष झाला.बाजीराव व चिमाजीआप्पा राधाबाईंचा सल्ला घेऊन वागत असत.मातुश्रींच्या आशीर्वादापासून आपले सर्वकाही मनोरथ सिद्धीस जातात अशी या वीरपुत्रांची भावना असे.

राधाबाई अत्यंत चतुर,बुद्धिमान,कर्तव्यकठोर परंतु धर्मनिष्ठ,प्रेमळ होत्या.त्यांना राजकारणाची खूप चांगली जाण होती.राजकारणाची बातमीपत्रे मागवून बातम्या राखीत.सर्व पेशवे कुटुंबीय,सरदार,मुत्सद्दी त्यांना वचकून असत.थोरले बाजीराव,चिमाजीआप्पा पुण्याबाहेर असताना राधाबाईच,पुण्यातील कारभार दक्षतेने चालवीत.कुटुंबातील मुलांचे संगोपन,शिक्षण,धार्मिक कृत्ये,विवाह,व्रतबंध वगैरे राधाबाईच जातीने पाहत.थोरल्या बाजीरावांनी १७२१ साली हैदराबादच्या निजामाची भेट घेतली,त्या भेटीबद्दल राधाबाईंनी बाजीरावांना काळजीपूर्वक तपशीलवार मार्गदर्शन केले होते.निजामाच्या डावपेचांच्या व मुघली राजकारणाच्या त्या चांगल्या माहितगार होत्या.बाजीराव निजामाचे भेटीला जाणार आहेत,अशा आशयाचे पत्र ब्रह्मेंद्र स्वामींनी राधाबाईंना पाठविले होते.त्याबद्दल राधाबाई बाजीरावांना लिहितात:"श्री यासह सहस्रायु चिरंजीव राजमान्य राजश्री बाजीराऊ यासी मातुश्री राधाबाई आशीर्वाद.उपरी येथील कुशल जाणून स्वकीये लिहित जाणे विशेष,मौजे जेजुरी येथील मुकामी तुम्हास राजश्री स्वामींची पत्रे आली ते वर्तमान आम्हास कळले.त्याजवरून विश्वतोमुखी त्याचे भेटीस न जावे.राजश्री रंभाजी निंबाळकर, तुरुजताजखान यांची भेट जालियानंतर भेटीचा मनसुबा मोडला तर बहुतच उत्तम आहे,नाही तरी तुम्ही विचार करून भेटीचा मनसबा मोडेल ते गोष्ट करणे.तुम्हास भेटीचा मनसबा मोडवयाचा विचार की राजश्री आनंदराऊ सोमवंशी सरलष्कर व संभूसिंग जाधवराव हे दोन्ही सरदार बरोबर नाहीत आणि आम्ही एकलेच यावेसे काय आहे?ऐसे आनंदराऊ सुमंत यांस सांगोन भेटीचा मनसबा मोडे ते गोष्ट करणे.बहुत काय लिहिणे हे आसीर्वाद."

पुढे जंजिरेकर सिद्दीविरुद्धच्या मोहिमेदरम्यान सिद्दीने खुद्द बाजीरावाला भेटायचा घाट घातला होता.बाजीरावांची भेट घेणार हे संभाव्य कळताच राधाबाईंना काळजी वाटणे साहजिक होते.तेव्हा या भेटीबद्दल सावधगिरी बाळगण्याची सूचना देताना,शत्रूचे मध्यस्थाचे घरी विडा देखील खाऊ नये असे राधाबाईंनी सांगितले होते.राजकारणाची,लष्करी घडामोडी,राज्यामधील इतर घडामोडींची सविस्तर खबर राखून राधाबाई योग्य सल्ला देत.पेशवा परिवारात राधाबाईंचा मान सर्वोच्च होता यात कोणतेही दुमत नाही.अनेक जुन्या सरदारांशी राधाबाईंचे जिव्हाळ्याचे संबंध होते.राधाबाईंचा त्यांच्याशी व्यक्तिगत पारिवारिक पत्रव्यवहारही असायचा.त्यापैकी कान्होजी आंग्रे यांचे पत्र:-"गंगाभागिरथी समान राधाबाई यांसी
             प्रीतीपूर्वक कान्होजो आंगरे सरखेल दंडवत उपरी येथील कुशल वैशाख बहुल पंचमीपर्यंत आपले क्षेम                  वर्तमान लिहित जाणे.सांप्रत तुमचे पत्र येत नाही यैसे तर नसावे.आपले  कुशल वर्तमान लिहित                              जाणे.बहुत काय लिहिणे ही विनंती."

राधाबाई यांची पारिवारिक पत्रे उपलब्ध आहेत.त्यांची ज्येष्ठ कन्या भिऊबाईच्या संदर्भात बाजीरावांना लिहिलेले पत्र आहे:-"चिरंजीव राजश्री बाजीराऊ यांप्रती राधाबाईने कृतानेक आसीर्वाद उपरी.सौभाग्यवती चिरंजीव भिऊबाईस पातल पाठविले ते व चोली आपणाजवळील यैसे देणे म्हणून लिहिले.ऐश्यास ते परमारेच आपले घरी गेले.आजी सात पाच रोज रुसली आहे.घोडा घेतले बगर समजत नाही.कलले पाहिजे.चोली व पातल त्यांचे घरी पावावयासी पाठविते.हे विज्ञापना."

राधाबाईंना नानासाहेब,रघुनाथराव,जनार्दन,सदाशिवरावभाऊ ही नातवंडे होती.जनार्दनाचा जन्म झाला तेव्हा त्यांनी बाळाच्या काळजीसाठी आपली सून काशीबाई यांना पत्र लिहिले होते.चिमाजीआप्पा व त्यांच्या पत्नीच्या मृत्युनंतर सदाशिवरावभाऊंबद्दल 'मातापित्याविना पोर' म्हणून त्यांना विशेष कणव वाटे.या सर्व उल्लेखांवरून राधाबाईंचे परस्पर संबंध व जिव्हाळा कसा असेल हे स्पष्ट होते.राधाबाई यांनी ब्रम्हेंद्रस्वामींना लिहिलेली पत्रे पण उपलब्ध आहेत.काही उपयोगाच्या वस्तू,मिठासारखे जिन्नस पाठवावे म्हणून स्वामींना राधाबाईंनी अधिकाराने परंतु अगत्याने लिहिले आहे.स्वामींशी केलेल्या पत्रव्यवहारात युद्धाच्या घडामोडी,राजकीय बाबी,कौटुंबिक सुख-दुखः,आजारपणे,सातारा दरबाराच्या बाबी तसेच इतर अनेक विषय आढळतात.

राधाबाई जितक्या कठोर,कर्तव्यपरायण होत्या तितक्याच प्रेमळ व धार्मिक वृत्तीच्या होत्या.राधाबाईंनी ९ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर १७२८ दरम्यान बाजीराव आणि परिवारासह तुळजापूर व पंढरपूरची यात्रा केली होती.१७३४ साली खासगत खर्चासाठी राधाबाईंना एका गावचा मोकासा हक्क दिला,त्याची नोंद:'१५-२-१७३४ छ ११ रमजान मातुश्रीबाई यांस मौजे आंबोसी ता चोण हा गाव दिल्हा होता.त्यास तो बारा नव्हे याजकरिता मौजे कलल ता तलोजे हा गाव मोकासा दिला येवेसि सनद'
थोरली सून काशीबाई यांना १७३३ साली एक मुलगा झाला पण तो लगेच वारला.या मुलाचा उल्लेख राधाबाईंनी चिमाजीआप्पांना लिहिलेल्या एका पत्रात येतो.'चिरंजीव सौभाग्यवती,कासीबाई फालगुण बहुल द्वादसीसह त्रयोदसी मंदवासार संध्याकालच्या सात घटिका दिवस उरला तत्समयी प्रसूत झाली.पुत्र झाला(३ मार्च १७३३)'
यानंतर १७३५-३६ साली राधाबाईंनी मोठ्या लवाजम्यासह मानमरातबात केलेली काशीयात्रा खूप महत्वाची बाब होती.तेव्हा उत्तरेकरील सरदार व सत्ताधीशांनी,राजपूत राजांनी,इतकेच नव्हे तर पेशव्यांच्या शत्रूंनीही राधाबाईंची उत्तम बडदास्त ठेवली होती.बाजीराव व चिमाजीआप्पांचे अध्यात्मिक गुरु प्रकांड पंडित नारायण दीक्षित पाटणकर,राधाबाईंच्या प्रयाणापूर्वी काशीला जायला निघाले होते.राधाबाईंचे व्याही सदाशिव नाईक जोशी(बारामतीकर)हे देखील या काळात वाराणसीत होते.

प्रवासाच्या दरम्यान ठिकठिकाणी मुकाम होतील.सत्कार,आहेर स्वीकारावे लागतील.दक्षिणा,दाने आणि परतीचे आहेर द्यावे लागतील,धर्मकृत्ये करावी लागतील.आपण स्वतः विकेशा विधवा असल्यामुळे आपणच यजमान म्हणून सर्व करणे प्रशस्त नाही.कोणीतरी पुरुष मनुष्य सोबत असणे श्रेयस्कर आहे.यासाठी छोट्या सदाशिवरावभाऊला बरोबर द्यावे असे राधाबाईंनी चिमाजीआप्पांना सुचवले होते.ही सूचना आप्पांनी विनम्रपणे नाकारली होती अशी एका पत्रात नोंद आहे.काशी यात्रेत राधाबाईंबरोबर बाबूजी नाईक जोशी(बारामतीकर)(जावायाचे थोरले बंधू ) हे होते.बाबूजी नाईक शूर,धोरणी होते,तसेच निकटचे आप्त होतेच.नर्मदा पार करून राधाबाई उदेपूरला पोहोचल्या तेव्हा उदेपूरच्या राण्याने त्यांचा आठवडाभर पाहुणचार केला.१ मोत्याची माळ,१ पदक,हातचे सोन्याचे चुडे,१ हत्तीचा छावा,वाटखर्चासाठी ५००० रु. असा सत्कार आहेर केला.याखेरीज उदेपूरचा दिवाण बिहारीदासाने १००० रु. नजर केले.नाथद्वारमार्गे जयपूरला आल्यावर सवाई जयसिंगाने सर्वांचा शाही दिमाखात सव्वा दोन महिने पाहुणचार केला.सवाई जयसिंगाने बुंदी संस्थान यापूर्वीच खालसा केले होते.हे संस्थान आपला जावई दिलेलसिंग याला भेटीदाखल देण्याचे सवाई जयसिंगाने पूर्वीच ठरवले होते.या अधिकार हस्तांतराची सनद जयसिंगाने समारंभपूर्वक राधाबाईंच्या हस्ते दिलेलसिंगाला देववली.पेशवा राजवटीकडून कुठलाही उपद्रव बुंदी संस्थानाला होणार नाही अशी ग्वाही राधाबाईंनी दिली.सवाई जयसिंगाने राधाबाईंच्या बरोबर राय नारायणदास यांना दिले होते.यमुनातीरावरील मुक्कामात स्वारीच्या बंदोबस्तासाठी खुद्द दिल्लीच्या बादशहाने स्वारांचे पथक पाठवले होते.पेशव्यांचा सदाशिव बल्लाळ कुंटे नावाचा वकील जयपूरला होता,तो लिहितो:'मातुःश्री राधाबाईंचे आगमन आषाढआरंभी जयनगरास जाले.बाबूजी नाईक घेऊन आले.तेथून निघणे दसरा जाहलिया उपर होईल.मातुःश्री पुण्यवान याजकरिता सर्व गोष्ट नीट पडली.पुढेही त्यांचेच पुण्याने गोष्टी होतील.स्वामींचे(बाजीरावांचे)अदृष्ट विचित्र आहे,तेणेकरून चिंता वाटत नाही.यात्रा सुखरूप होऊन आपले स्थलास जातील.राय नारायणदासजी यांस महाराजाधिराज सवाईजीनी मातुःश्री समागमे शेवटपावेतो दिल्हे.त्यांचे व्याही राय हरप्रसाद महंमदखान बंगाशाचे दिवाण.स्वामीचेअगत्य सर्वास.तेच घडीस आम्हांस यमुनापार उतरून नवाब बंगशाचे भेटीस घेऊन गेले.जाऊन नवाबाची भेट घेतली.बहुत संतोषी झाले की रायांनी आम्हांस स्मरून करून पत्र लिहिले व आमचे भरवसियार मातुःश्रीस पाठविले.त्यांची मातुःश्री व आमची दोन नाहीत.'

बाजीरावांचा जुना शत्रू मुहम्मदशाह बंगश याने आपला दिवाण लाला हरप्रसाद याला सत्कार सामग्रीसह स्वारीला सामोरे जाण्यासाठी व राधाबाईंचे क्षेमकुशल विचारण्यास पाठवले होते.वाटखर्चासाठी १००० रु. दिले होते,शिवाय विकेशा स्त्रीला वापरता येतील अशी सोवळी पातळे भेटीदाखल दिली होती.बंगशाने राधाबाईंना 'आपण मला माते समान' अशा शब्दाने गौरविले आहे.बाजीरावांचा राधाबाईंच्या यात्रेबद्दलचा खलिता बंगशाने आदरपूर्वक आपल्या मस्तकी लावला.(यावरूनच बाजीरावांचा काय दरारा होता हे लक्षात येते व मराठ्यांच्या ताकदीचा अंदाज येतो) राधाबाई स्वतंत्रपणे मुत्सद्देगिरी चालवून राजकारण हाताळत असत.'श्रीमंतांच्या मातुश्री यात्रेच्या मिषाने उत्तरेत येतात आणि आमच्या घरात भेद पडतात.' अशी तक्रार जयपूरचा वकील नानासाहेबांकडे करतो.
राधाबाईंनी काशीयात्रेतील मुक्कामाचा,राजहितासाठी उपयोग करून घेऊन जयपूर,उदेपूर वगैरे दरबारातील राज्यधोरण पेशव्यांना अनुकूल करून घेतले.जयपूरच्या मुक्कामी अयामल दिवाण व बिहारीदास यांच्या मार्फत उदेपुरच्या राण्यांकडून राधाबाईंनी खंडणीचा पट्टा(करार-पत्र)लिहून घेतला.एवढ्या धामधुमीच्या काळातही राधाबाईंची काशीयात्रा निर्विघ्नपणे पार पडली.तथापि राधाबाईंची काशीयात्रा आणि यात्रेचा उद्देश पूर्णपणे सफल झाला यात शंका नाही.

काशीयात्रा धार्मिक होती तथापि यात्रेला सामाजिक व राजकीय महत्व सर्वाधिक होते.राजपुतान्यासह,उत्तर हिंदुस्थानातील अंतस्थ राजकारणाची व सत्ताधीशांची माहिती बाजीरावांना मिळाली.१४ फेब्रुवारी १७३५ रोजी राधाबाईंनी काशीयात्रेला प्रस्थान ठेवले.२४ मे १७३६ रोजी यात्रा संपवून त्या पुण्यात पोहोचल्या.यात्रा खर्च १ लाख रु. झाला.१ जून १७३६ ला काशीयात्रेचे मावंदे करण्यात आले.पण त्या वेळी खंडेराव दाभाडे यांच्या पत्नी उमाबाई यांना गंगापूजनाचा प्रसाद पाठविण्यास पेशव्यांचे कारभारी विसरले.आपला हा अपमान आहे असे समजून उमाबाई यांनी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण बाजीरावांनी मुत्सद्दीपणाने छत्रपतींच्या मध्यस्थीने हा वाद मोठ्या कौशल्याने मिटवला.

थोरले बाजीराव व मस्तानी यांच्या संबंधामुळे पेशवा परिवारात उठलेल्या वावटळीमुळे मोठे धर्मसंकट उभे राहिले.या प्रकरणातील राधाबाई व चिमाजीआपांच्या धोरणामुळे त्यांना खलप्रवृत्तीची माणसे मानण्याची वृत्ती पुढच्या काळात दिसून आली.त्यावेळच्या समाजाची मानसिकता व धार्मिक बंदिस्तपणा लक्षात घ्यायला हवा.बाजीराव मस्तानीच्या आहारी गेल्यास राज्याचे नुकसान होईल व मस्तानीचा पुत्र समशेर बहाद्दर पुढच्या काळात राज्यासाठी हटून बसला तर राज्याचे तुकडे पडतील.पुढचे भवितव्य टाळण्यासाठी बाजीराव-मस्तानीला एकमेकांपासून दूर केले पाहिजे,हा चिमाजीआप्पा व राधाबाईंचा आग्रह होता.मस्तानी विरोधक अशी राधाबाईंची प्रतिमा जनमानसात झालेली आहे.पण त्यांनी व्यक्तिगत मस्तानीचा कधीही द्वेष केल्याचे आढळत नाही.मस्तानीला समशेर बहाद्दर नावाचा पुत्र १७३४ सालच्या सुरुवातीला झाला.बाजिराव व चिमाजीआप्पा लष्करी मोहिमांच्या निमित्ताने पुण्याबाहेर होते.त्यावेळी राधाबाईंनी प्रत्यक्ष पुढे न होता,थोरली सून काशीबाई यांच्या मार्फत मस्तानीच्या बाळंतपणाची सर्व काळजी घेतली होती.'पुण्यातील मेहूणपुऱ्यातील पेशवेकालीन रास्तेवाड्यात समशेरबहाद्दरचा जन्म झाला.मस्तानीच्या बाळंतपणापूर्वी काही आठवडे राधाबाई,काशीबाई व मस्तानी त्या वाड्यात राहत असत.याबद्दल हेतुपूर्वक गुप्तता बाळगण्यात आली होती.' अशी एक आख्यायिका आहे.मस्तानीला ब्राह्मण वर्गाचा सामाजिक,धार्मिक कारणांसाठी विरोध होता.पण पेशवा परिवाराचा राजकीय व पारिवारिक कारणांसाठी विरोध होता.'राज्याहिताचे रक्षण' हे त्यामागचे सूत्र होते.या संदर्भात वाद टोकाला गेल्यावर राधाबाई आप्पांना लिहितात:'चिरंजीव राजमान्य राजश्री आपा यांप्रती राधाबाई आसीर्वाद उपरी.येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहित असिले पाहिजे.विशेष,चिरंजीव राजश्री राव याजपासी बहुत युक्तीच्या विचारे जो विचार करणे तो करून देणे.चालीवरी नजर देऊन जे कर्तव्य ते करावे.बहुत काय लिहिणे हे आसीर्वाद'

पेशवा हे राज्यकर्ते असल्यामुळे त्यांचा घरगुती वाद हा कौटुंबिक पातळीवर न राहता या संपूर्ण प्रकरणाला सार्वजनिक रूप प्राप्त झाले होते.ब्राह्मण वर्गाने पेशवा परिवारावर बहिष्कार टाकायची भाषा सुरु केली.पुण्यातील ब्रह्मवृंदानी बहिष्कार चालू ठेवला तर पेशवे वाराणसीहून ब्राह्मण घेऊन येतील व सर्व धर्मकृत्ये चालवतील असे राधाबाईंनी ब्राह्मणांना रोकठोक सुनवायला कमी केले नाही.ब्राह्मणांनी बहिष्कार टाकायची भाषा केली तरी तसे केल्याचे दिसत नाही.बाजीरावांचा मुलगा राघोबादादा याची मुंज ४ फेब्रुवारी १७४० व धाकटा मुलगा जनार्दन याची मुंज २६ मार्च १७४० ला,सदाशिवरावभाऊ याची मुंज २६  फेब्रुवारी १७३६ ला व पहिले लग्न ७ फेब्रुवारी १७४० ला ही सर्व कार्ये पार पडली नसती.

१७४० साली बाजीराव,चिमाजीआप्पा,मस्तानी यांचे मृत्यू,धाकटी सून अन्नपूर्णाबाई(चिमाजी आप्पांची पत्नी) यांचे सती जाणे असे चार आघात राधाबाईंना एका वर्षात सोसावे लागले.हे सर्व त्यांनी धीरोदात्तपणे सोसले असेल यात शंका नाही.१७३१ मध्ये चिमाजी आप्पांचे दुसरे लग्न झाले होते.पेशव्यांच्या घरात अनेक सुखदुखःच्या गोष्टी घडत होत्या.राजकीय व लष्करी आघाड्यांवर पेशवे दरबाराला यश मिळत होते.बाजीरावांच्या मृत्युनंतर २५ जून १७४० रोजी राधाबाईंचे थोरले नातू नानासाहेब यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली.१७४२ मध्ये नानासाहेबांचे थोरले पुत्र विश्वासराव यांचा जन्म २२ जुलै १७४२ मध्ये झाला.पणतु जन्मल्यामुळे राधाबाईंना आनंद झाला.विश्वासरावाच्या पाठोपाठ १६ फेब्रुवारी १७४५ रोजी दुसरा पणतु थोरले माधवराव पेशवे यांचा जन्म झाला.

परिवाराकडे लक्ष असतानाच राधाबाईंचे सामाजिक व राजकीय गोष्टींकडेही लक्ष असे.दुष्काळ पडला असताना,लोकांना पिण्यासाठी दैनंदिन वापरासाठी पाणी पुरवण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष करून त्र्यंबक मामा पेठे आपल्या खासगी बागेला पाणी देत राहिले होते.राधाबाईंनी त्र्यंबकराव पेठ्यांना बजावले:'लोक तहानलेले राहून बागेला पाणी देणे योग्य नाही.लोकांना पाणी घेण्याची बंदी करू नये.बाग पावसाळ्यात पुन्हा करता येईल.' १७४६ साली सरदार गोविंद हरी पटवर्धनांच्या घरची एक बटीक (दासी)क्षुद्र जातीची आहे असे उघडकीस आल्यामुळे ब्राह्मणवर्गात खळबळ माजली.समाजाने पटवर्धन परिवाराला जाती बहिष्कृत केले.या प्रसंगी राधाबाईंनी बहिष्कार घालू नये असे ब्राह्मणांना सुनावले.धर्माज्ञेबाहेर जाता येत नाही,त्यासाठी परमेश्वराची आज्ञा पाहिजे,असा समस्त ब्राह्मणांना जवाब दिला.स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी पटवर्धनांना प्रायश्चित्त देवविले.यावेळी नानासाहेब साताऱ्याला होते.पंडितरावांनी ढवळाढवळ करून याप्रकरणात शाहूचे मन कलुषित करू नये याची राधाबाईंनी पुरेपूर काळजी घेतली होती.

राधाबाईंना समुद्रस्नान करण्याची इच्छा होती.पुरेसा पाऊस पडावा म्हणून त्या समुद्रस्नानाचा नवस बोलल्या होत्या.त्याप्रमाणे चिमाजीआप्पांनी राधाबाईंना समुद्रस्नान घडविले होते,समुद्रस्नानाबद्द्ल चिमाजीआप्पांनी नानासाहेबांना लिहिलेले पत्र उपलब्ध आहे.राधाबाईंना दीर्घायुष्य लाभले होते.त्यांनी अनेक सुखदुखःचे चढउतार पहिले होते.पतीनिधन व दोन उत्तम सेनानी असे वाघाचे काळीज असणाऱ्या पुत्रांचे निधन हे राधाबाईंच्या आयुष्यातले मोठे दुखः असावे.बाळाजी विश्वनाथांना नाटकशाळा होती,कारण भिकाजी शिंदे नावाचा त्यांचा एक लेकावळा होता.तत्कालीन समाजातील रूढी व मानसिकतेचा विचार करता यात काही गैर नव्हते.भिकाजीचा जन्म कुठे झाला याबद्दल माहिती नाही.तो बाजीरावांसारखा पराक्रमी व बेडर होता.बाळाजीपंतांनी स्वतः त्याला मौजे हिंगणगाव हा कमाल तेरजी रु.१५३९ आणि ८ वसूलाचा गाव पागेच्या सरंजामासाठी लावून दिला होता.

'सातारकर छत्रपती शाहू महाराज हे आपले खावंद.त्यांची मर्जी कधीही तीळमात्र मोडू नये' ही राधाबाईंची आपल्या मुलांना व सरदारांना ताकीद होती.त्या स्वाभिमानी,बाणेदार होत्या तशाच प्रेमळही होत्या.राधाबाईंनी धर्माचरण,राज्यहिताचा विचार,कर्तव्यकठोर वृत्ती कधीही सोडली नाही.सर्वांवर आपला प्रभाव गाजवण्याची त्यांची वृत्ती होती.तशाच त्या आग्रही देखील होत्या.परिवारातील लेकी,सुना व इतर स्त्रिया कोणालाही राधाबाई अस्तित्वात असेपर्यंत जणू स्वतंत्र अस्तित्व नव्हते.मस्तानी प्रकरणात देखील ते जाणवून येते,कारण काशीबाई यांचे फारसे अस्तित्व जाणवत नाही.१५ जुलै १७५१ ला नानासाहेबांनी पुण्यात राधाबाईंची तुला केली होती.त्यांची तुला केल्यानंतर दोन वर्षांनी वृद्धापकाळाने राधाबाईंची प्रकृती बिघडली.श्रीमुखनाम संवत्सर चैत्र वद्य २ शके १६७५ या दिवशी म्हणजे १९ एप्रिल १७५३ गुरुवारी,राधाबाई पुणे मुक्कमी निवर्तल्या.मृत्यू समयी त्यांचे वय ८० वर्षांचे असावे असा तर्क आहे.गणेशभट कर्वे आणि गोविंद कृष्ण गोखले यांच्याबरोबर राधाबाईंच्या अस्थी महायात्रेला पाठविल्याची १७ जून १७५४ ची नोंद आहे.राधाबाई स्वभावाने कडक,करारी होत्या,तशाच दिलदार होत्या.त्यांचे व्यक्तिमत्व व कर्तुत्व फार मोठे होते.राधाबाई ह्या मराठ्यांच्या इतिहासातील एक मोठ्या राजकारणधुरंधर होत्या हे निश्तिच!

राधाबाईंचे हस्ताक्षर
सदर चित्र बाळाजी विश्वनाथ पेशवे पुस्तकातून साभार


संदर्भ: पेशव्यांची बखर
          मराठी रियासत खंड ३
          मराठी रियासत खंड ४
          मराठी रियासत खंड ५
          काव्येतिहास संग्रह
          महाराष्ट्र इतिहास मंजिरी
          ब्रह्मेंद्रस्वामी चरित्र
          महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास
          ऐतिहासिक गोष्टी
          पुरंदरे दफ्तर
          मराठ्यांची बखर
          मराठ्यांची इतिहासाची साधने
          बाळाजी विश्वनाथ पेशवे
          पेशवे घराण्याचा इतिहास
          पेशवाई
          पुण्याचे पेशवे
          पेशवेकुलीन स्त्रिया

Ⓒतुषार माने 

Comments

tajsadaenzer said…
How to make money on slots online - drmcd
Slot machines are 평택 출장마사지 played on a set 경상남도 출장샵 of fixed fixed stakes. 세종특별자치 출장마사지 But 전라북도 출장마사지 the game selection is much more complex. A fixed Dec 9 광주광역 출장샵 - Dec 13Definitively, The Best Casino Sites for
Anonymous said…
खूप छान लिहिलं आहे आपण. हा एक परिपुर्ण लेख आहे राधाबाईंवर.

Popular posts from this blog

शिवाजी महाराजांचे आरमार

अखेर मातुःश्रींची भेट झाली !