राजाराम महाराजांचा कुटुंबकबिला जिंजीत [चंदी] दाखल
राजाराम महाराजांचा जिंजीचा प्रवास अत्यंत खडतर होता व त्यात त्यांच्या जीवासही बराच धोका होता. महाराज या प्रवासास निघाले तेव्हा त्यांनी त्यांचा कुटुंबकबिला मागे विशाळगडावर ठेवला होता. विशाळगडाहून जिंजीस जाणे आणि स्त्रियांनी प्रवास करणे, ते सुद्धा गुप्तपणे, ६०० मैलांचा प्रवास ही अतिशय कठीण गोष्ट होती.१ रामचंद्रपंतांनाही राण्यांना महाराजांकडे कसे पोहचवायचे असा प्रश्न पडला होता. तो सोडविण्यासाठी विशाळगडाहून काही विश्वासू माणसे त्यांनी जिंजीकडे पाठविली आणि राण्यांच्या प्रवासाची एक योजना महाराजांना कळविली.२ त्यांना सुखरूपपणे जिंजीकडे आणण्याची जबाबदारी राजाराम महाराजांनी लिंगो शंकर तुंगारे व विसाजी शंकर तुंगारे ह्या सावकारी पेशाच्या गृहस्थांवर सोपविली. हे दोघे बंधू म्हणजे खंडो बल्ल्लाळ चिटणीस यांचे मामा असून, त्यांची तारवे किनारपट्टीवर व्यापारी मालाची ने-आण करत असत.३ खंडो बाल्लाळांचे दोघेही मामा राजापूर येथे राहून सावकारी करीत होते. दोघेहीजण विश्वासू आहेत असे पाहून रामचंद्रपंतांनी ठरवले की महाराणी ताराबाई, राजसबाई वगैरे राजघराण्यातील लोकांनी त्यांच्या मदतीने प्रथम समुद्रामार्गे होन...