राजाराम महाराजांचा कुटुंबकबिला जिंजीत [चंदी] दाखल



राजाराम महाराजांचा जिंजीचा प्रवास अत्यंत खडतर होता व त्यात त्यांच्या जीवासही बराच धोका होता. महाराज या प्रवासास निघाले तेव्हा त्यांनी त्यांचा कुटुंबकबिला मागे विशाळगडावर ठेवला होता. विशाळगडाहून जिंजीस जाणे आणि स्त्रियांनी प्रवास करणे, ते सुद्धा गुप्तपणे, ६०० मैलांचा प्रवास ही अतिशय कठीण गोष्ट होती.१ रामचंद्रपंतांनाही राण्यांना महाराजांकडे कसे पोहचवायचे असा प्रश्न पडला होता. तो सोडविण्यासाठी विशाळगडाहून काही विश्वासू माणसे त्यांनी जिंजीकडे पाठविली आणि राण्यांच्या प्रवासाची एक योजना महाराजांना कळविली.२ त्यांना सुखरूपपणे जिंजीकडे आणण्याची जबाबदारी राजाराम महाराजांनी लिंगो शंकर तुंगारे व विसाजी शंकर तुंगारे ह्या सावकारी पेशाच्या गृहस्थांवर सोपविली. हे दोघे बंधू म्हणजे खंडो बल्ल्लाळ चिटणीस यांचे मामा असून, त्यांची तारवे किनारपट्टीवर व्यापारी मालाची ने-आण करत असत.३

खंडो बाल्लाळांचे दोघेही मामा राजापूर येथे राहून सावकारी करीत होते. दोघेहीजण विश्वासू आहेत असे पाहून रामचंद्रपंतांनी ठरवले की महाराणी ताराबाई, राजसबाई वगैरे राजघराण्यातील लोकांनी त्यांच्या मदतीने प्रथम समुद्रामार्गे होनावर पर्यंत जावे आणि तिथून पुढे खुष्कीच्या मार्गाने जिंजी गाठावी.४ त्यांनी राण्यांच्या समुद्रप्रवासाची उत्तम व्यवस्था केली. विशाळगडाहून खाली कोकणात उतरून दोन्ही राण्या यशवंतगडाच्या बंदरात तारवात बसल्या व कारवारच्या किनारपट्टीवरील होनावर बंदरात उतरल्या.५ तेथून बेदनूरच्या राणीच्या प्रदेशातून गुप्तपणे प्रवास करून त्या जिंजीस पोहोचल्या.६

या प्रवासात राणी चन्नमाचीही त्यांना मदत झाली असावी. यापूर्वी देखील राजाराम महाराजांच्या जिंजी प्रवासात राणीने औरंगजेबाच्या शिक्षेचा धोका पत्करून त्यांना मदत केली होती.७ इ.स. १६९१ च्या सुरुवातीला यशवंतगडजवळील बंदरातून सुरु झालेला हा प्रवास त्याच वर्षाच्या मार्च-एप्रिल दरम्यान संपला.८

जिंजीचा हा कठीण प्रवास खंडो बल्लाळांच्या मामांसारख्या विश्वासू माणसांमुळे अगदी सुखरूप पार पडला. या त्यांच्या महत्वाच्या कामगिरीबद्दल पुढे १९ ऑक्टोबर १६९४ रोजी राजाराममहाराजांनी लिंगो शंकर व दामाजी अनंत यांना वृत्तिपत्र दिले. त्यातील मजकूर पुढीलप्रमाणे:-

                                                नकल

     ९“स्वस्ति श्रीराज्याभिषेक शके २१ भावा संवत्सरे कार्तिक श्रुध्ध द्वाद्सी स्थिरवासरे(शनिवार) क्षेत्रियकुलावतंस श्रीराजाराम छत्रपती स्वामी याणी राजश्री दामाजी अनंत व लिंगो शंकर प्रभु मुकाम कसबे बंदर राजापूर यांसी दिल्हे वृत्तिपत्र यैसेजे स्वामी देशीहून स्वार होऊन कर्नाटक प्रांते आलियावर स्वामींचा राणीवसा दुसरा वाडा(ताराबाई) यांची रवानगी राजश्री रामचंद्र पंडि[त] अमात्य त्यांच्या पत्रावरून तुम्ही केली. ताम्राची(मुघलांची) ठाणी राजापूर प्रांती बैसली असता कोठे उमज पडो नेदिता युक्तीने संकट प्रसंगामध्ये आपले जाहाज व लोक देऊन समुद्रातून येकेरी(इक्केरी)च्या राज्यातून होनावरास पाठविले. ती(कुटुंबकबिला) स्वामीसंनिध सुखरूप पावली. स्वामींच्या पायांसी येकनिष्ठता धरून राणीवासाची सेवा बहुतप्रकारे केली हे वर्तमान वेदमूर्ति रामभट पटवर्धन व गणोजी झेंडे राणीवासाकडे होते यांणी विदित केले. त्याजवरून तुम्ही स्वामीचे सेवेसी येकनिस्ट आहा. यैसे जाणून तुम्हावरी स्वामी कृपाळू होऊन तुम्हास वडिलांच्या वौंशपरंपरेने चाले यैसे इनाम देऊन चालवावे हे स्वामीच्या मनात येऊन इनाम दख्त लारी”

तेरीख ११ माहे रबिलावल
सु|| खमस तिसेन अलफ

हे पत्र नकल असले तरी त्यास चिटणीस बखरीतून आधार मिळतो हे महत्वाचे आहे. ह्या अशा विश्वासू माणसांच्या जीवावर स्वराज्य मुघलांशी लढून तग धरून राहिले.


संदर्भ:-

१. छत्रपती राजाराम व ताराराणी:- डॉ. सदाशिव शिवदे पृ.४६ 

२. करवीर रियासत:- स.मा.गर्गे

३. शिवपुत्र छत्रपती राजाराम:- डॉ. जयसिंगराव पवार पृ.३५६
  
४. किल्ले जिंजी:- महेश तेंडुलकर

५. शिवपुत्र छत्रपती राजाराम:- डॉ. जयसिंगराव पवार पृ.३५७

६. थोरले राजाराम महाराज यांचे चरित्र पृ.४६-४८, शिवपुत्र छत्रपती राजाराम:- डॉ. जयसिंगराव पवार पृ.३५७

७. शिवपुत्र छत्रपती राजाराम:- डॉ. जयसिंगराव पवार पृ.३५७

८. शिवपुत्र छत्रपती राजाराम:- डॉ. जयसिंगराव पवार पृ.३५७, किल्ले जिंजी:- महेश तेंडुलकर, छत्रपती राजाराम व ताराराणी:- डॉ. सदाशिव शिवदे पृ.४७

९. करवीर रियासत:- पृ.२८, किल्ले जिंजी:- महेश तेंडुलकर    

ⓒ तुषार माने                         

Comments

Popular posts from this blog

शिवाजी महाराजांचे आरमार

अखेर मातुःश्रींची भेट झाली !

**कर्तव्यकठोर राधाबाई पेशवे**