इतिहासातील चमत्कारिक नोंदी

इतिहास म्हणजे राजकारण व लढाया हा निव्वळ गैरसमज ! कागदपत्रांतून नव्या गोष्टींचा उलगडा होत जातो. इतिहासाचा अभ्यास करताना कागदपत्रात विविध नोंदी मिळतात. त्या बरच काही शिकवतात, वेगळा दृष्टीकोन देतात, कधीकधी हसवतात देखील. आता आपण काही नोंदी पाहणार आहोत. त्याकाळातील लोकांस काही वेगळेपण जाणवले, म्हणून त्यांनी ते लिहिले असावे. ह्या नोंदी चमत्कारिकच आहेत. आजच्या काळात सुद्धा एखादी विलक्षण गोष्ट आपल्या कानी पडली, किंवा आपण पहिली तर आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. काही नोंदी पुढीलप्रमाणे:- फाल्गुन वा|| २ मौणे दोडज तालुके निरथडी येथे वोढ्यात करंगलीएवढा रक्ताचा झरा चार घटका वाहिला म्हणून गांवकरी यांनी रा. नारो अप्पाजी(तुळशीबागवाले) जिल्हेदार यास अर्जदस्त पाठविली. (सदर नोंद १७६० सालची आहे) पुरंदर घेतला आणि निळकंठ महादेव तेथे(सासवडास) गेले होते. तेव्हा गांवजवळ संगमेश्वर देव आहे. तेथील नदीमध्ये विहीरा होता. त्यातील झऱ्यास रक्त येऊ लागले. ते समयी हे स्वतः गेले आणि त्यात अंगवस्त्र टाकिले. ते भिजले तो रक्ताप्रमाणे पाणी! ऐसे तीन दिवस होत होते. करमाळे तालुक्यापैकी टेंभुर्णी येथे...