इतिहासातील चमत्कारिक नोंदी
काही नोंदी पुढीलप्रमाणे:-
- फाल्गुन वा|| २ मौणे दोडज तालुके निरथडी येथे वोढ्यात करंगलीएवढा रक्ताचा झरा चार घटका वाहिला म्हणून गांवकरी यांनी रा. नारो अप्पाजी(तुळशीबागवाले) जिल्हेदार यास अर्जदस्त पाठविली. (सदर नोंद १७६० सालची आहे)
- पुरंदर घेतला आणि निळकंठ महादेव तेथे(सासवडास) गेले होते. तेव्हा गांवजवळ संगमेश्वर देव आहे. तेथील नदीमध्ये विहीरा होता. त्यातील झऱ्यास रक्त येऊ लागले. ते समयी हे स्वतः गेले आणि त्यात अंगवस्त्र टाकिले. ते भिजले तो रक्ताप्रमाणे पाणी! ऐसे तीन दिवस होत होते.
- करमाळे तालुक्यापैकी टेंभुर्णी येथे रा. केशवराव काशिनकर यांचे शेतात एक लिंबाचे झाड आहे. त्याचे वरचे फाट्यातून पौष शु|| ४ मंगळवारी दिवसा १० वाजता आकाशात मोठा आवाज झाला. त्या दिवसापासून सदरचे फाट्यातून पाणी वाहण्यास प्रारंभ झाला आहे. थेंब थेंब सारखे गळत आहे व ते पाणी पहाण्यास पुष्कळ लोक जात आहेत व बाटल्या भरून नेत आहेत. ते पाणी पांढरे असून कडू लागते. त्या झाडापासून रात्री रडल्यासारखा ध्वनि होतो; म्हणून शेतकरी लोक सांगतात ही आश्चर्याची गोष्ट आहे. (१८८१ सालची नोंद)
- शहादेकर बातमीदार कळवितो की ता. ८ जुलै रोजी दोन प्रहरी शहादे तालुक्यातील हिंगणे गावी रा. पितांबरभाईदास वाणी यांचे शेतात सरासरी २ पांड जमिनीवर विलक्षण मौक्तिक(मोत्यांची) वृष्टी झाली. मोत्याचे दाणे बाजरीच्या दाण्यापेक्षा थोडे मोठे असून, त्यांचा जमिनीवर चांगला पांढरा थर जमला होता. हा चमत्कार गावातील पुष्कळ लोकांनी पाहिला. काही लोकांनी मासल्याकरता मे. कलेक्टर साहेबाकडे काही मोत्ये पाठविली. मोत्यांचा रंग पांढरा शुभ्र चमकदार होता. २-४ दिवसांनी त्या मोत्याचे पापुद्रे गळून पडले. त्या पापुद्र्यांच्या आत काळसर रंगाचा वाटोळा भाग आहे. (१८८१ सालची नोंद)
संदर्भ:- इतिहासातील टेहळणी
काव्येतिहाससंग्रह
Ⓒ तुषार माने
Comments