रोपट्याचे वटवृक्ष !!

भारताच्या आणि विशेषतः दक्खन देशाच्या इतिहासात सतरावे शतक हे फार महत्त्वाचे आहे. चैतन्यहीन बनलेल्या आणि संपूर्णपणे परकीयांच्या हुकुमतीखाली नांदणाऱ्या या खंडप्राय देशाला स्वत्वाची जाणीव करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम हे मराठ्यांनी केले. "याच मराठी सत्तेने मुघल साम्राज्य खिळखिळे करून दिल्लीच्या तख्ताचे नियंत्रण आपल्याकडे घेतले." याचे कारण शिवाजी महाराजांनी आरंभिलेला स्वराज्याचा उद्योग हे होय. शिवाजी महाराजांचा जन्मच झाला नसता, तर या देशाचे काय झाले असते, या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. पण भारतीय इतिहासाचा पुढील क्रम पाहता असे वाटते की भारत स्वत्वाला पारखा झाला असता. स्वराज्य ही काय चीज आहे याची त्याला कल्पनाही आली नसती.
स्वराज्याचा उद्योग हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. स्वराज्याचे कार्य हे आपले कार्य आहे, या भावनेने प्रेरित होऊन जेव्हा माणसे या कामाला वाहून घेतात, तेव्हाच स्वराज्याचे स्वप्न साकार होते. शिवाजी महाराजांनी अगदी लहानपानापासून हा उद्योग सुरु ठेवला. १६४५ साली म्हणजे वयाच्या केवळ १५ व्या वर्षी रोहिडखोऱ्याच्या देशमुखाला धीर देउन आपल्या उद्योगात सामील करून घेण्याचा प्रयत्न केला. "हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे" अशी भावना जनतेत निर्माण करून स्वराज्य स्थापनेला धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिले.
स्वराज्य हे शिवाजी महाराजांचे धेय्य होते, कारण स्वराज्याखेरीज आपल्या प्रदेशातील लोकांना स्वतंत्रपणे जगता येणार नाही आणि आपली उन्नती करून घेता येणार नाही याची त्यांना खात्री होती. शिवाजी महाराजांनी लावलेले स्वराज्य नावाचे रोपटे इतके मजबूत होते की, औरंगजेबाने २५० वर्षांपासून टिकून असलेल्या आदिलशाही व कुतुबशाही यांसारख्या सत्ता गिळंकृत केल्या, पण त्याला स्वराज्याचे रोपटे उखडून टाकता आले नाही. उलट याच स्वराज्याने त्या औरंगजेबाला थडगं बांधायला जागा दिली.
पेशव्यांच्या कारकिर्दीत या रोपट्याचे वटवृक्ष झाले. मराठ्यांची घौडदौड तंजावर पासून ते पेशावर (खैबर खिंड)
पर्यंत होती. मराठ्यांची ताकद इतकी वाढली होती की मुघल सत्तेला मराठ्यांशिवाय दुसरा कोणी वाली नव्हता. पानिपतावर सदाशिवरावभाऊ हे मुघल India साठी लढले (हिंदुस्थानची पातशाही हिंदुस्थानीयांच्या हातात) त्या युध्दात इतका मोठा संहार होऊन पण मराठे पुढच्या १० वर्षांत पुन्हा दिल्लीला पोहोचले. त्या गुलाम कादरला यमसदनी पाठविल्या नंतर मराठ्यांचा भगवा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर डौलाने फडकत होता आणि तरीदेखील बऱ्याच लोकांना मराठे हे फक्त लुटारू दिसतात?
खाली शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा map आणि पेशवेकाळातील मराठ्यांच्या साम्राज्याचा map दिलेला आहे.
- तुषार माने






Comments

Popular posts from this blog

शिवाजी महाराजांचे आरमार

अखेर मातुःश्रींची भेट झाली !

**कर्तव्यकठोर राधाबाई पेशवे**