** कुणबिणी किंवा बटिकी**
#भाग_१
जगाच्या पाठीवरील जवळजवळ सर्व प्राचीन संस्कृतीत ‘गुलामगिरी अथवा दास्यत्वाची’ पद्धती आढळते. मध्ययुगातही ती मोठ्या प्रमाणावर चालू राहिली. युरोप-आफ्रिका खंडातही अशा लोकांना विकलेली अनेक उदाहरणे सापडतात. तशा जाहिराती सुद्धा आढळतात. त्याचप्रमाणे हिंदुस्थानात देखील ही गोष्ट राजरोसपणे चालत होती. महाराष्ट्रात सुद्धा पुरुष गुलामांपेक्षा स्त्री गुलामांची संख्या मोठी होती.
जगाच्या पाठीवरील जवळजवळ सर्व प्राचीन संस्कृतीत ‘गुलामगिरी अथवा दास्यत्वाची’ पद्धती आढळते. मध्ययुगातही ती मोठ्या प्रमाणावर चालू राहिली. युरोप-आफ्रिका खंडातही अशा लोकांना विकलेली अनेक उदाहरणे सापडतात. तशा जाहिराती सुद्धा आढळतात. त्याचप्रमाणे हिंदुस्थानात देखील ही गोष्ट राजरोसपणे चालत होती. महाराष्ट्रात सुद्धा पुरुष गुलामांपेक्षा स्त्री गुलामांची संख्या मोठी होती.
‘कुणबी’ हा शब्द व्यवसायवाचक आहे. हा शब्द जातीवाचक सुद्धा आहे. मराठी
कागदपत्रात कुणबीण हा शब्द ‘स्त्री-गुलाम’ या अर्थाने येतो.
तत्कालीन लोक दासींना कुणबिणी किंवा बटिकी म्हणत. श्रीमंत, सरदार, राजेरजवाडे व सुखवस्तू लोक आपल्या पदरी कुणबिणी
व बटकी बाळगीत. पुरुष गुलामांना ‘पोरगे’ म्हणत व त्यांचा जन्म स्त्री गुलाम म्हणजे
कुणबिणींच्या पोटीच झालेला असे. असे पोरगे आपल्या आईबरोबरच विकले जात. कुणबिणी व
बटिकी विकणे हा हेडे, चारण इ. लोकांचा धंदा होता.
कुणबिणी/बटिकी
संबंधी येणारी माहिती:-
“लढाईत कोणी पुरुषास
धरीत नाहीत व गावगाना लुटीचे समईही कोणी पुरुषास धरीत नाहीत. गावगाना लुटीचे समई
बायकास अगर मुलीस मात्र धरून आणितात. परंतु सलुकाने देत नाहीत. बायका व मुली लुटून
आणिल्या त्या कुणबिणी होतात. त्यास देशी आल्यावर विकतात. पुरुष कोणी सलुखाने
बोलीकरिता देतात अथवा मातबर पाहून बोली धरून आणितात. हे काही गुलामासारखे नव्हेत.
बोली धरून नेल्यास देशी गेल्यावर विकीत नाहीत. बोलीच्या खंडाचा यैवज आल्यावर
सोडतात.” यावरून दिसून येते की गावे लुटली जात, त्यावेळी स्त्रियांना व मुलींना
पकडून त्यांना गुलाम म्हणून विकले जाई. पुरुषांना खंडणीच्या लोभाने पकडले जाई.
खंडणी भरली की त्यांची सुटका होई.
एखाद्या स्त्रीवर बद्कर्म केल्याचा आरोप सिद्ध झाल्यास तिला सरकारमार्फत
कुणबीण केले जाई. “शूद्र वगैरे नीच जातीची स्त्री छिनाल्यास सापडली असता, तिच्या भ्रतारास आगर
तिजला दंड द्यावयास सामर्थ्य नसल्यास, विशेष प्रसिद्धीच्या ग्रहस्ताची नसल्यास, क्वचित कोठे येखादा
मक्तेचा मामलदार कुणबीण करून कोठीत ठेऊन कोणास देत होता अथवा विकीत होता. यास
शास्त्र नाही. काही दंड काही प्रायश्चित आसे आहे, त्यांत दंडायैवजी कुणबीण करतात
जुलमाने.” छिनाल स्त्रीला कुणबीण करीत असत. प्रतिष्ठित घराण्यातील स्त्रीच्या
संदर्भात तिच्याकडून सरकारी गुन्हेगारी म्हणून जबर रक्कम घेऊन प्रकरण मिटवीत.
१७५९-६० सालातील बाळाजी बाजीराव पेशेव यांच्या रोजनिशीत एक नोंद आहे-
“अंदाई पाटलीण मौजे वडगाव कर्यात निंबसोड माईणी हिने झगडपुरी गोसावी वस्ती
पुसेसावळी याशी बदमल केला. याजकरिता हरदुजणास हुजूर आणविली होती. त्यास बाळभट
वस्ती वडगाव निसबत माहादेव गोसावी यांनी हुजूर येऊन, हरदुजणांविशी विनंति
अन्याय माफ करावयाविषयी करून, हरदुजणांकडे गुन्हेगारी करार रुपये ७०००
यमाजी शिवदेव याचे मार्फतीने करार करून हरदुजणांचे नांवे अभयपत्रे की, सदरहू ऐवजाचा वसूल
सरकारांत देऊन पावलीयाचा जाब घेऊन सुखरूप राहणे, कोणेविशी ज्याजती
उपसर्ग लागणार नाही म्हणून अभय पत्रे:-
१
अंदाई घारगी पाटलीन मौजे वडगाव
१
झगडपुरी गोसावी मौजे पुसेसावळी
सदरील ऐवजाचा हवाला यमाजी शिवदेव यांजकडे मुदत.”
“कुणबिणीचे काम म्हणजे घरसारवण, भांडी घासणे, धुणे धुवावे, शेतकाम करावे, गुराची चाकरी करावी व
हरयेक पडले काम धणी हुकूम करील दलण-कांडणसुद्धा करावे. येखादा धणी आपल्या
इष्काकरिताही ठेवतो.”
बटकीला किंमत
सुमारे साठ रुपयापर्यंत पडावी. बटिक व तिचा पोरगा विकायचा झाल्यास दीडशे रुपये
पडल्याचे देखील उदाहरण आहे. बटकीच्या पोटास शेर देण्यात येई. तिला जरूर ते वस्त्र
मिळत असे. सरकारही बटकीची गणना प्रायः जनावरात करी. कारण चारण लोक ज्यावेळी बटिक
विकावयास आणीत, त्यावेळी सरकार त्यापासून कर वसूल करी.
काही बटकीना त्यांचे मालक पागेतच राहवयास जागा देत. दुष्काळात आई-बापाला
कोंडा, भाकर देऊन ज्या मुली व मुलगे कोणी लोक घेत, ते त्यास लहानाचे मोठे केल्यावर
बटकी व पोरगे या नात्याने विकून टाकीत. एखादा गरीब माणूस आपली मुलगी किंवा मुलगा
व्यंग असल्यास त्यास कोणास तरी विकत किंवा फुकट देई. ‘पदाजी कारका याची लेक आंधळी
होती. तीस पदाजीने बटीक करून दिले.’ कोकणात स्त्रियांना फसवून अगर क्वचित खुषीनेही
धरून आणून त्यांची विक्री करण्याचा मुसलमानांचा धंदा होता. त्यासंबंधी पेशवे दफ्तर
४३ मध्ये एक सवाई माधवराव यांचे आज्ञापत्र आहे. सदर आज्ञापत्र १५ मार्च १७८० या
तारखेचे आहे.
“आज्ञापत्र राजश्री पंत प्रधान त|| लालखान व मलिकखान व पीरखान व दाऊदखान व
लाल वस्ती मौजे देवठाण परगणे सिरसाले राघू वगैरे चारण यांनी तुम्हांपासून कुलबिणी
म्हणोन खरिदी करून, ताज्या बराबर कोकणात पेणचे बंदरी नेऊन, ब्राह्मणास वगैरे लोकास
विकीत होते; परंतु त्या गर्ती बायका असे पेणचे जकाते यास व हुजूराचे गाडदी तेथे
होते त्यांस कलले. त्यावरून त्याणी बायका व चारण यास सरकारात आणून हवाली केल्या.
त्याची चौकसी करिता बायकाचे जबानीत लिहिले घडले की आम्हांस चारणानी फिताऊन नेले,
आणि विकीत होते. त्याजवरून चारणास पुसता त्याणी लेहून दिल्हे की आम्ही लालखान व
मलिकखान वगैरे देवठाण तकर याजपासून खरिदी केल्या आहेत ते दाखऊन देतो; म्हणोन
त्याजवरून हे आज्ञापत्र सादर केले असे; तरी येविसीची चौकसी करावी लागते.”
कुणबीण घरात ठेवली असता एखादे वेळी ती अतिशूद्र जातीची निघाली की,
प्रायश्चित घ्यावे लागे. असा प्रसंग बाजीराव मोरेश्वर भावे याजवर १७९५ साली
पुण्यात गुदरला. भावे यांची कुणबीण जातीने चांभार असल्याचे चार महिन्याने उमगले.
पण चार महिने संसर्ग घडला असल्याने त्यांस व त्यांचे घरी बिऱ्हाडाने राहणारास
प्रजापत्य प्रायश्चिते सांगण्यात आली. भावे राहत होते त्यांच्या शेजारच्या
घरामध्ये व भावे यांच्या घरामध्ये समाईक विहीर असल्यामुळे शेजारच्या नरहर गोपाळ
नामक ब्राह्मणासही प्रायश्चित भोगावे लागलेच.
सन १७४६ मध्ये आवजी कवडे नामक सरदाराने सातारचे छत्रपती शाहू महाराजांकडे
कुणबिणी व दोन पोरगे पाठविल्याची देखील नोंद आहे. शाहू महाराजांनी कोकणातील
अधिकाऱ्यांकडून कुणबिणी मागविल्याचा देखील उल्लेख आहे. १७४८-४९ मध्ये गोविंदपंत
बुंदेले यांनी उत्तर भारतातून पेशव्यांकडे दहा कुणबिणी पाठविल्याची देखील नोंद
आहे. इंग्रज, फ्रेंच वगैरे युरोपियन लोक देखील हिंदुस्थानात असता बटकी बाळगीत. Mr.Malet
याने पुण्यास ६५ रुपयास एक कुणबीण खरेदी केल्याची नोंद आहे. फरासिसाकडील वकील
पुण्यास आले आहेत. त्यांनी पुणे येथे माळ्यापासून एक कुणबीण शंभर रुपयास खरेदी
केली. अशी बरीच उदाहरणे आहेत.
सणवार व मंगलकारक प्रसंगी कुणबिणींना लुगडी चोळखण किंवा रोख रकमा देऊन
संतुष्ट करीत असत. इ.स. १७६२-६३ च्या नोंदीत १९७ कुणबिणींची एक मोठी यादी मिळते.
त्यांना दसऱ्याच्या निमित्ताने लुगडी व चोळीसाठी खण देण्यात आले. त्यासाठी १३०० रु
इतका खर्च आला. कुणबिणीला गहाण टाकल्याची देखील उदाहरणे आहेत. कुणबिणी पळून गेल्याच्या
देखील नोंदी सापडतात. त्या सापडल्यावर त्यांस पुन्हा त्यांच्या मालकाकडे सुपुर्द
करण्यात येत असे.
कुणबिणींना त्यांच्या दास्यातून मुक्त केल्याची उदाहरणे देखील आहेत. शाहू
महाराजांनी तापी व जनी या बायांना दास्यातून सोडवून चरितार्थासाठी पाबळच्या बाजूस
शेतजमीन इनाम दिली होती. कुणबीणींना मुक्त करताना एका विशिष्ट पद्धतीचा उल्लेख
येतो. त्यांच्या डोक्यावर तेल घालून त्यांना मुक्त केले जाई. या विधीशी थोडाफार
मिळताजुळता एक विधी नारदस्मृती मध्ये मिळतो. त्यानुसार मालकाला ज्यावेळी एखाद्या गुलामाची
सुटका करायची असेल तेव्हा त्याने त्या गुलामाच्या खांद्यावरून पाण्याने भरलेला
मातीचा एक घडा घेऊन तो फोडावा. नंतर अक्षता आणि फुले घेऊन ते पाण्यात भिजवून
गुलामाच्या डोक्यावर शिंपडावे. त्यानंतर ‘तु आता गुलाम नाहीस’ हे शब्द तीन वेळा
उच्चारून त्याची पाठवणी करावी. कुणबीणींना मुक्त केल्यावर त्यांचे आयुष्य कसे
असावे याबद्दल जवळजवळ काहीच सापडत नाही.
संदर्भ:-
१. पे.द. खंड ८
२. पे.द. खंड ४३
३. बाळाजी बाजीराव पेशवे
यांची रोजनिशी
४. थोरले माधवराव पेशवे
यांची रोजनिशी
५. पेशवेकालीन महाराष्ट्र
६. मराठेशाहीचे अंतरंग
७. पेशव्यांचे विलासी जीवनⒸ तुषार माने
Comments