गनिमी काव्याचे PhD Holder मराठे !!

स्वातंत्र्ययुध्दाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मराठ्यांची युध्दपध्दती. मराठ्यांचा गनिमी कावा मोगलांना कधीच समजला नाही आणि म्हणून मराठे जेव्हा हल्ला करून निघून जात, त्यावेळी त्यांचा पराभव झाल्याचे मोगल सेनानी बादशहाला कळवीत. आपल्या हालचालींविषयी कमालीची गुप्तता राखणे, शत्रूच्या हालचालींची माहिती मिळवणे, शत्रूवर अचानक हल्ला करून जेवढे होईल तेवढे नुकसान करून त्वरेने परत फिरणे, आपले बहुसंख्य लष्कर बिकट जागी लपवून ठेवून कमी संख्येने शत्रूवर हल्ला करून आपला पाठलाग करावयास लावणे आणि शत्रू सैन्याला त्या बिकट जागी आणून त्याचा फडशा पाडणे, शत्रूची रसद तोडणे, शत्रूच्या छावणीच्या आसपासचे पाणी विषारी करणे, आसपासचा प्रदेश वैराण करणे ह्या आणि इतर गोष्टी मराठ्यांच्या गनिमी काव्यात मोडतात. अशा शेकडो गनिमी काव्याच्या लढाया मराठे खेळले. प्रदेशाचे भौगोलिक ज्ञान, काटकपणा, साधेपणा,जनतेची सहानुभूती ह्या गनिमी काव्याच्या यशासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी मराठ्यांकडे होत्या. मोगलांकडे त्या नव्हत्या.

मल्हाररामरावाने या गनिमी काव्याचे सुंदर वर्णन केलेले आहे, "आपले सैन्य थोडे. यास्तव मनुष्य राखून जाया होऊ न देता, मसलतीने त्यांच्या सैन्याभोवती हिंडोन फिरोन त्यास लंगडेतोड करावी; रयतेची मात्र वैरण राखून रानातील वैरण जाळून टाकावी; रसद चालू देउ नये; आपल्या फौजेत मणाची धारण,त्यांच्या लष्करात शेराची धारण; अशा तऱ्हेने फौज किती आहे हा आदमास ध्यानात येउ देउ नयेमोगलांचे घोडे पाण्यावर आले असता पाणी न पीत त्यास मोगली लोकांनी म्हणावे जे, पाण्यात धनाजी व संताजी दिसतो की काय? रात्री दिवसा कोणी कडून येतील, काय करतील असे केले. मोगलाई फौजेत आष्टौ प्रहर भय बाळगीत. पादशाहासी बहुत आश्चर्य झाले की,मराठी फौज बळावत आहे. अकस्मात यावे, बक मच्छ उचलून नेतो तसा घाला घालावा, शिपाईगिरीची शर्थ करावी, प्रसंग पडल्यास माघारे पळून जावे; खाण्यापिण्याची दरकार बाळगीत नाहीत. पाऊस,उन,थंडी व अंधारी काही न पाहता घोड्यावरच हरभरे व भाकरीचटणी,कांदे खाऊन धावतात. त्यास कसे जिंकावे? एका मुलखात फौज आली म्हणोन त्याजवर रवानगी करावी, तो दुसरीकडे जाऊन ठाणी घेतात; मुलूख मारितात; हे आदमी नव्हत, भूतखाना आहेत !"

मराठ्यांनी अक्षरश: मुघलांना त्राहिभगवान करून सोडले. मराठ्यांनी बलशाली सम्राटाशी स्वातंत्र्ययुद्ध खेळले. औरंगजेबाने मराठ्यांना संपवण्यासाठी मुघल लष्करातील एक पिढीच्या पिढीे दक्षिणेत खपवली व स्वतःही इथेच खपला, आणि मराठ्यांच्या स्वातंत्र्यप्रियते समोर झुकला.

(गनीम' हा शब्द मूळ फारसी भाषेतला असून 'गनिमी' हे त्या शब्दाचे षष्ठ्यंतरूप आहे. 'कावा' या शब्दाला लक्षणेने 'फसवणूक', धोकेबाजपणा, कपट हे अर्थ आले आहेत.
गनिमी काव्याचे घटक:-
१. नियोजन व अंमलबजावणी
२. समन्वय आणि नियंत्रण )

(संदर्भ:-
मल्हाररामराव यांचे लिखाण चिटणीस बखरीतील आहे.
राजा शिवछत्रपती:- बाबासाहेब पुरंदरे)
गनिमी कावा

Comments

Popular posts from this blog

शिवाजी महाराजांचे आरमार

अखेर मातुःश्रींची भेट झाली !

**कर्तव्यकठोर राधाबाई पेशवे**