रतनपूरची लढाई भाग १

मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धात संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांचे पराक्रम चिरस्मरणीय ठरले आहेत.आपल्या पराक्रमाने त्यांनी मोगलांच्या मनात खूप मोठी दहशत निर्माण केली.संताजीच्या मृत्यूनंतर मोगलांविरुद्ध चाललेला लढा यशस्वीपणे शेवटास नेण्याचे श्रेय धनाजी जाधवाचे होय.इ.स.१६९७ पासून १७०७ पर्यंत धनाजीने मुघलांना सळो की पळो करून सोडले.या काळातच मराठ्यांनी माळवा व गुजरात या सुभ्यांवर आक्रमणे केली.गुजरातेवरील आक्रमणाचे नेतृत्व धनाजीकडे होते.रतनपूरची लढाई ही मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्वाची घटना होय.४ मार्च १७०६ रोजी धनाजी जाधवाने रतनपूरच्या लढाईत मोगलांचा पराभव केला.या युद्धानंतर मराठ्यांना गुजरातचे दार मोकळे झाले.यानंतर पन्नास वर्षे गुजरातेत सतत युद्धे करून मराठ्यांनी गुजरातेतून मोगलांना नाहीसे केले,आणि तो प्रांत त्यांनी आपल्या ताब्यात आणला.इ.स.१७०१ पासून १७०५ च्या अखेरपर्यंत औरंगजेबाचा मुलगा शहजादा आझम हा गुजरातचा सुभेदार होता.गुजरातेहून आपली बदली करण्यात यावी अशी त्याने औरंगजेबाला विनंती केली.त्याप्रमाणे औरंगजेबाने काश्मीरचा सुभेदार इब्राहीमखान याची गुजरातेवर नेमणूक केली.तो येऊन रुजू ह...