रतनपूरची लढाई भाग १


मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धात संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांचे पराक्रम चिरस्मरणीय ठरले आहेत.आपल्या पराक्रमाने त्यांनी मोगलांच्या मनात खूप मोठी दहशत निर्माण केली.संताजीच्या मृत्यूनंतर मोगलांविरुद्ध चाललेला लढा यशस्वीपणे शेवटास नेण्याचे श्रेय धनाजी जाधवाचे होय.इ.स.१६९७ पासून १७०७ पर्यंत धनाजीने मुघलांना सळो की पळो करून सोडले.या काळातच मराठ्यांनी माळवा व गुजरात या सुभ्यांवर आक्रमणे केली.गुजरातेवरील आक्रमणाचे नेतृत्व धनाजीकडे होते.रतनपूरची लढाई ही मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्वाची घटना होय.४ मार्च १७०६ रोजी धनाजी जाधवाने रतनपूरच्या लढाईत मोगलांचा पराभव केला.या युद्धानंतर मराठ्यांना गुजरातचे दार मोकळे झाले.यानंतर पन्नास वर्षे गुजरातेत सतत युद्धे करून मराठ्यांनी गुजरातेतून मोगलांना नाहीसे केले,आणि तो प्रांत त्यांनी आपल्या ताब्यात आणला.इ.स.१७०१ पासून १७०५ च्या अखेरपर्यंत औरंगजेबाचा मुलगा शहजादा आझम हा गुजरातचा सुभेदार होता.गुजरातेहून आपली बदली करण्यात यावी अशी त्याने औरंगजेबाला विनंती केली.त्याप्रमाणे औरंगजेबाने काश्मीरचा सुभेदार इब्राहीमखान याची गुजरातेवर नेमणूक केली.तो येऊन रुजू होण्यास अवकाश असल्याने शहजादा आझम याने सुभेदार पदाचा ताबा गुजरातचा दिवाण अब्दुल हमीदखान यास देऊन यावे अशी औरंगजेबाने आज्ञा केली.त्यानुसार शहजादा आझम याने २५ नोव्हेंबर १७०५ रोजी अहमदाबाद सोडले.त्याच्या जागी ख्वाजा अब्दुलहमीदखान हा गुजरातचा हंगामी सुभेदार म्हणून काम पाहू लागला.

याच काळात धनाजी जाधवाने गुजरातेत प्रवेश केला.मराठ्यांच्या या मोहिमेबद्दल मराठी साधनांत विशेष माहिती उपलब्ध नाही.पण हसनअली उर्फ महंमदखान याने १७६१ मध्ये फारसी भाषेत गुजरातचा इतिहास लिहिला.या ग्रंथाचे नावं मिराते अहमदी असे आहे.वयाच्या आठव्या वर्षी तो त्याच्या बापाबरोबर गुजरातेस आला होता.अहमदाबादेत त्याला चांगल्या अधिकारी पदाच्या नोकऱ्या मिळाल्या.शेवटी तो गुजरातचा दिवाण झाला.त्याचा हा फारसी ग्रंथ मुद्रित झाला असून त्याचे इंग्रजी भाषांतर उपलब्ध आहे.या ग्रंथात रतनपूरच्या लढाईचे वर्णन दिले आहे.

शहजादा आझम निघून गेल्यावर अब्दुल हमीदखान हा गुजरातचा हंगामी सरदार म्हणून काम पाहू लागला.त्या काळात मराठे चहूकडे धामधूम करीत होते.त्यांना काढून टाकण्यासाठी बादशाही सैन्ये नेमण्यात आली होती.सुभेदार आणि फौजदार यांना हुकुम देण्यात आले होते ते हे:-मराठ्यांनी आक्रमणे केली आणि धामधूम सुरु केली तर सर्व अधिकाऱ्यांनी एक होऊन राजमार्गाचे संरक्षण करावे आणि मराठ्यांना काढून लावण्याच्या कामात झटावे.या आज्ञेस अनुसरून, मराठ्यांनी आक्रमण केली अशी बातमी अहमदाबादेस येऊन पोहोचली की गुजरातचा सुभेदार आणि इतर सरदार हे मराठे येऊन दाखल होण्यापूर्वीच नर्मदेच्या बाबापियाराच्या उतारावर आणि सुरतेपर्यंत जाऊन पोहोचत.त्याचप्रमाणे वऱ्हाड व खानदेश या प्रांताचे सुभेदार आणि गुजरातच्या सरहद्दीवरील मोगल फौजदार याच कामगिरीसाठी आपल्या ठाण्यातून बाहेर पडत.शहजादा आझम गेल्याने गुजरातेत कोणी मोठा सरदार नाही ही बातमी मराठ्यांस लागली,त्यामुळे धनाजी जाधवाने जवळ जवळ ऐंशी हजार(हा आकडा बरोबर नसावा)सैन्यानिशी गुजरातेकडे मोर्चा वळविला.ही बातमी सुरत बंदराच्या अधिकाऱ्यांकडून अहमदाबादेस नायब सुभेदार ख्वाजा अब्दुलहमिदखानास कळविण्यात आली.अब्दुलहमिदखानाने पुढील अधिकारी नेमले  १)नजर अलीखान, २)सफदरखान बाबी(जुनागडच्या नबाब घराण्याचा मूळ पुरुष), ३)इल्तिफातखान, ४)सय्यद इद्रिसखान(नडियादचा फौजदार), ५)महंमद बेग खानाचा मुलगा अली मर्दान इतर फौजदार,मनसबदार व ठाणेदार यांना आज्ञा करण्यात आली की, सुरतेपर्यंत पोहोचून मराठ्यांचा प्रतिकार करावा.मुहम्मद पुरदील शेरानी हा बडोद्याला सुभेदार होता.त्याला तिकडूनच रवाना होऊन वरील सरदारांना जाऊन मिळण्याविषयी लिहिण्यात आले.

त्याप्रमाणे सर्व सरदारांनी नर्मदेच्या बाबापियारा उतारावर आपला तळ दिला.मराठ्यांच्या हालचालींचा शोध घेण्यासाठी त्यांनी हेर नेमले.पण मराठे कोठे आहेत हे त्यांना न कळल्यामुळे ते बाबापियारा उतारावर दीड महिना मजेत रेंगाळत राहिले.या सुमारास हेरांच्याकडून सतत बातम्या येऊ लागल्या की,बाबापियारा उताराच्या समोरच्या बाजूला सुरतेच्या दिशेने मराठे पसरले आहेत.ही बातमी खरी असल्याची खात्री झाल्यावर नजर अलीखान याने आपल्या सरदारांबरोबर सल्लामसलत केली.मराठे आले आहेत आणि त्यांची संख्या इतकी आहे असे समजते,अशा अर्थाचे पत्र अब्दुल हमीदखानाकडे पाठविण्यात आले.अब्दुल हमीदखान हा सैन्याची जमवाजमव आणि तोफांची तयारी इत्यादी कामात गुंतला होता.ही बातमी कळताच त्याने फौजदार व ठाणेदार यांना बोलावणे पाठविले.कुमकेसाठी म्हणून तो घाईघाईने फौजेची जमवाजमव करू लागला.त्याने नजर अलीखान आणि इतर सरदारांना कळविले की मी लवकरच चांगली फौज आणि तोफखाना घेऊन येत आहे.पण तुम्ही काहीही न करता मजा करत रेंगाळत राहिला ते बरे केले नाही.

अब्दुल हमीदखानाचा स्वभाव मोठा उतावळा होता.मराठ्यांचे बळ अधिक आहे आणि आपले सैन्य कमी आहे हे त्याने विचारात घेतले नाही.जितके काही सैन्य जमले आणि सरंजाम घेऊन तो बाहेर पडला.कित्येक लहानमोठ्या मनसबदारांपाशी स्वारीसाठी घोडे नव्हते.पण अब्दुल हमीदखानच्या ताकीदीमुळे त्यांना भाड्याच्या गाड्या करून निघावे लागले.नर्मदेच्या काठावर असलेल्या सरदारांना अब्दुल हमीदखानाचे पत्र मिळाले व त्यांनी सुरतेची वाट धरावी असे ठरविले.वास्तविक पाहता या सरदारांकडे फार थोडे सैन्य होते.स्वार आणि प्यादे मिळून ते सैन्य पुरते दोन हजार पण नव्हते.या सैन्यातील प्रत्येक सरदाराला मीच श्रेष्ठ असल्याचा गर्व चढला होता.त्या सरदारांनी अब्दुल हमीदखानाची वाट पाहणे योग्य होते.पण तसे केले तर आपला भित्रेपणा दिसून येईल असे त्यांना वाटले.त्यांचा काळच ओढवला होता म्हणून की काय त्यांनी कूच करण्याचे ठरविले.त्यांनी त्याच दिवशी नर्मदा ओलांडली आणि पलीकडच्या तीरावर तळ दिला.दुसऱ्या दिवशी ते सात कोस पुढे चालून गेले.नर्मदेच्या काठावर रतनपूर(भडोचच्या पूर्वेस चौदा मैलांवर) या गावी त्यांनी छावणी कायम केली.प्रत्येक सरदाराने आपल्याला योग्य वाटलेल्या जागेवर आपला तंबू ठोकला.सर्वांनी एकच तळ द्यावा ही साधी सावधगिरीची योजना त्यांनी अमलात आणली नाही.

मोगलांची छावणी व्यवस्थितपणे कायम झाली नव्हती.मोगलांचे सैन्य थोडे आणि त्यात दम नाही हे मराठ्यांना कळले.मराठ्यांची आघाडीची पथके मोगलांच्या दृष्टीस पडली त्यास हुलीचे स्वार म्हणतात.गुजरातच्या सैन्याला मराठ्यांशी लढण्याचा योग आला नव्हता आणि त्यांची लढण्याची पद्धत त्यांना माहित नव्हती.मराठे येत आहेत असे कळताच मोगलांनी तातडीने तयारी केली आणि त्यांचे सरदार मराठ्यांवर चालून गेले.थोड्याशा मारामारीनंतर हुलीची पथके मैदानातून ओढण्याची मराठ्यांची पध्दत असे.मराठ्यांनी तसेच केले आणि मोगलांना वाटले आपला जय झाला.त्यांनी मराठ्यांचा थोडा वेळ पाठलाग केला,त्यानंतर ते आपल्या तळावर आले.मोगलांनी लष्करातील उंट चरण्यास पाठविले आणि त्याबरोबर त्यांचे एक पथक होते.मराठी स्वारांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि ते उंट पळवून नेले.मोगलांनी त्यांचा पाठलाग केला आणि काही उंट सोडवून आणले.

मोगलांना दम खायला थोडाही वेळ मिळाला नव्हता,तोच त्यांना मराठ्यांचे प्रचंड सैन्य त्यांच्यावर चालून येत असलेले दिसले.मोगलांची घाबरगुंडी उडाली.त्यांची छाती धडधड करू लागली.सफदरखान बाबी याचा तळ इतर मोगल सरदारांपासून थोडा दूर असल्याने मराठे त्याच्या तळावर चालून गेले.सफदरखानाने लढा दिला पण त्यात त्याचा मुलगा महंमद उस्मान व इतर अनेक लोक मारले गेले.स्वतः सफदरखान जखमी झाला,मराठ्यांनी त्याला कैद करून त्याचा सगळा सरंजाम लुटला.सफदरखानाचा पुतण्या महंमद आझ्झ्म याचा घोडा मारला गेला होता.तो मोठ्या कष्टाने त्याच्या काही सहकाऱ्यांबरोबर नजर अलीखानाच्या तळावर पोहोचला.

मोगल सरदार पुरदील शेरानी याचा तळ काही अंतरावर होता,त्यामुळे मराठे त्याच्यावर तुटून पडले.मोठी निकराची लढाई झाली यात बरेच लोक मारले गेले.बाकीचे लोक पळून गेले.पुरदील शेरानी हा मैदानातून निघाला. त्याने नदीत उडी घेतली आणि तो निसटला.इल्तिफातखान याच्याजवळ काही स्वार राहिले होते.त्याने स्वारांबरोबर घोडे नदीत घातले व तो पलीकडच्या तीरावर पळून गेला.मराठ्यांनी नजर अलीखान व इतर मोगलांवर पाळत ठेवली आणि रात्री त्याच ठिकाणी मुक्काम केला.मोगल घाबरून गेले होते.ज्यांना जमले ते पळून गेले.काहीजण मराठ्यांच्या तावडीत सापडले.हे सर्व पाहून नजर अलीखानाने आपल्या तंबूला व इतर सरंजामाला आग लावली.मोगलांची अतिशय दुर्दशा झाली होती.त्यांचे सैन्य तहानेने व्याकूळ झाले होते ,त्यामुळे नजर अलीखान व इतर सैन्याने नदीवर जाऊन पाणी पिण्याचा बेत केला.तोपर्यंत समुद्राच्या भरतीचे पाणी नदीत घुसल्याने नदीला पूर आला.त्यामुळे मोगल सैन्यातील काहीजण पुरात बुडून मेले.मोगल सैन्य कशीबशी वाट काढून भडोचला जाऊन पोहोचले.भडोचचा सुभेदार अकबरकुली याने त्यांची व्यवस्था केली.

नजर अलीखान आपल्या थोड्या सैन्याबरोबर सकाळ होण्याची वाट पाहात होता.लढण्याची तयारी त्याने केली.आपल्या नशिबी मरण आले हे तो धरूनच चालला होता.पहाटेच ४ मार्च १७०६ रोजी मराठे मोठ्या संख्येनिशी मोगलांवर तुटून पडले.त्यांनी नजर अलीखानाकडे आपला मोर्चा वळविला.मरेपर्यंत त्याचा लढण्याचा निर्धार पाहून मराठ्यांनी काही मातबर माणसे त्याच्याकडे पाठविली.मराठ्यांनी त्याला सांगितले ते हे- काळाच्या प्रभावाने अनेक लोकांवर असे प्रसंग येतात.या जगाची ही रीतच आहे.कधी खोगीरावर आपण तर कधी खोगीर आपल्यावर,तुम्ही मर्दुमकी करायची ती केली.आता संख्येने प्रचंड असलेल्या मराठ्यांशी लढणे अदृष्टीचे ठरेल.त्यांच्यावर तुटून पडून जीव गमावणे यात काही अर्थ नाही.नजर अलीखानाबरोबर जे शिपाई होते त्यांनी मराठ्यांचा हा निरोप ऐकला.या अस्मानी संकटातून आपण जीवानिशी सुटू अशी आशा त्यांना वाटू लागली.त्याच्या सैन्याने नजर अलीखानाचे मन वळविले आणि ते सैन्य मराठ्यांपाशी गेले.मराठ्यांनी त्यांना सन्मानाने वागविले.त्यांना आपल्या ताब्यात घेतले.
(या वरील सर्व प्रसंगावरून दिसून येते की मुघलांची काय दाणादाण उडाली होती.सरतेशेवटी ते मराठ्यांना शरण आले व मराठ्यांनी त्यांना सन्मानाने वागविले हे मुघली साधनांतच आले आहे.यावरून मराठ्यांचे मोठेपण दिसते.शत्रू शरण आला तरी त्यास योग्य रीतीची वागणूक मराठे देत.मुघलांचे वागणे शरण आलेल्या शत्रूशी बरोबर याउलट असे.)

क्रमशः

संदर्भ: श्री छत्रपती नि त्यांची प्रभावळ
           A SHORT HISTORY OF AURANGZIB
          असे होते मोगल
          औरंगजेबाचा इतिहास
          सेनापती धनाजी जाधव
          नियतीच्या विळख्यात औरंगजेब

© तुषार माने

Comments

Popular posts from this blog

शिवाजी महाराजांचे आरमार

अखेर मातुःश्रींची भेट झाली !

**कर्तव्यकठोर राधाबाई पेशवे**