मुस्लीम राज्यकर्त्यांची ध्येय-धोरणे व धर्मांधपणा

भारतात मुसलमानी सत्ता स्थापन झाल्यावर ती धर्माने,संस्कृतीने,भाषेने,तत्त्वज्ञानाने व इतर अनेक प्रकारे भिन्न असल्यामुळे त्या सत्तेचा येथील समाजावर विविध प्रकारचा परिणाम होणे अपरिहार्य होते.मुसलमानी सत्ताधारी धर्माने इस्लामी होते,तर शाशित प्रजा धर्माने हिंदू होती.'सर्व धर्माची मूलतत्वे एकच आहेत.' हे विधान सांगण्यास व ऐकण्यास गोड असले तरी ते अतिशय भोंगळ व सत्याचा अपलाप करणारे आहे.एका पद्यात म्हटल्याप्रमाणे 'धरम धरम मे भेद रहत हे' हे विधान अधिक सत्याधीष्ठीत आहे.मुसलमानी राज्यकर्त्यांची आधारभूत तत्वे ही हिंदू तत्वाहून अगदी निराळी होती.येथील समाज सामान्यतः ईश्वरवादी असला तरी,त्याच्या ईश्वरविषयी तत्वज्ञानात पुष्कळ पंथोपंथ होते;एवढेच नव्हे,तर पाखंडी किंवा नास्तिक लोकही त्या समाजात विशेष त्रास न होता राहू शकत.येथे नव्याने आलेले मुसलमान राज्यकर्तेही ईश्वरवादी होते,पण त्यांच्या ईश्वर व धर्मविषयक कल्पनांच्या विरुद्ध जे असेल ती सर्व नास्तिकता व तिचा आचार करणारे ते सर्व काफीर,एवढेच नव्हे तर अशा नास्तिकांना सर्व तऱ्हेने चोपून काढून त्यांचा नाश करणे किंवा त्यांना आपल्या धर्मात आणणे,हे त्यास पुण्यकर्म वाटे.ते पुण्य आपणास मिळावे म्हणून हे राज्यकर्ते समाजावर नानाप्रकारचे निर्बंध घालून त्यांना मेटाकुटीला आणण्याचा किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न करीत.त्यांच्या प्रयत्नांचे स्वरूप असे:-

  1. जो प्रदेश त्यांच्या ताब्यात येत गेला त्यातील महत्वाच्या गावांची नावे बदलून त्यांना मुसलमान नावे देणे (जसे पुण्याचे मुहीयाबाद,मिरजेचे मुबारकबाद किंवा मुर्ताजाबाद,नाशिकचे गुलशनाबाद तसेच औरंजेबाने येथील किल्ले जिंकले तेव्हा त्यांची नावे बदलल्याचे अनेक उल्लेख आहेत.)
  2. ते मूर्तिपूजेचे कडवे विरोधक असल्याने जमेल तसे व हरप्रकारे मूर्ती फोडीत,व त्या मूर्ती ज्या मंदिरात बसविलेल्या असत ती मंदिरेही उध्वस्त करीत असे.मठ,समाधीस्थाने,पाठशाला यांचाही मूर्ती-मंदिरांप्रमाणे नाश करीत.कधी कधी या मंदिरांना मशिदींचे स्वरूप देत.समाधीस्थानांचे दर्गे बनवीत व पाठशाळांचे मदरसे बनवीत.
  3. तलवारीच्या जोरावर काफिरांना एक तर ठार मारीत किंवा बाटवून मुसलमान करत;ठार मारलेल्या लोकांच्या बायका-मुली आपल्या किंवा नातलगांच्या जनानखान्यात घालीत.त्यांच्या मुलांना गुलाम करीत.येथील हिंदू समाजावर जिझिया,जकाते हिंदुवानी,पुजाकर हे कर लावीत तसेच त्यांच्या व्यापारी मालावर अधिक कर बसवीत.
  4. राज्यकर्ते प्रजेची सर्व संपत्ती हरण करून तिच्या जिवावर नाना तऱ्हेचे विलास उपभोगीत.हे सर्व करीत असता मिळालेल्या संपत्तीचा १/५ अंश धर्म केला म्हणजे आपण केलेल्या सर्व पाशवी कृत्यांचा पर्याय झाला असे ते समजत.तसा धर्म ते करीत होते तरी तो स्वधार्मियांच्या पुरता मर्यादित राही.
  5. काफिरांशी वर्तन करताना आपण दिलेली वचने मोडली,केलेले तह मोडले तरी ते समर्थानियचं आहे असे त्यास मनःपूर्वक वाटे.या सर्वाला मुसलमान इतिहासकारांनी जिहाद म्हणून संबोधले आहे.जिहादचा अर्थ धर्मप्रसारासाठी केलेले युद्ध,असा आहे.
मुसलमान सरदार जिंकलेल्या प्रदेशात हिंदू समाजाची मने दुखाविणारे अत्याचार करीत असले तरी वतनदार व जहागिरदारांच्या अधिकाराखाली असलेल्या प्रदेशात फारसे धार्मिक किंवा सामाजिक अत्याचार करीत नसत.वतनदार व जहागिरदारांच्या प्रदेशात जाणूनबुजून मने दुखवणारी कृत्ये करीत नसत.त्या वेळचा समाज,बलिष्ठ सरदार व राज्यकारभारातील मुत्सद्दी हे कसे वागत होते याचे मोठे मार्मिक वर्णन वेंकटाध्वरी या कवीने आपल्या विश्वगुणादर्शचंपूतील महाराष्ट्र-वर्णनात केले आहे.तो म्हणतो की,'राजकारणात गुंतलेले मुत्सद्दी व सरदार हे मुस्लीम संस्कृतीमय झाले असले;तसेच त्यांना त्याबद्दल विशेष खंत वाटत नसली,तरी त्यांच्या प्रदेशात शेर असल्यामुळे त्या प्रदेशातील लोकांचे धार्मिक व सामाजिक आचार सामान्यतः यथापूर्व चालत.त्यात फारसे व्यत्यय येत नसत.एखादा व्यत्यय आलाच,तर हिंदू समाज तो काय करावे मुसलमान राज्य आहे,उपाय नाही ! '

तथापि काही मशिदीतून असे काही लेख आहेत की,ज्यावरून भारतातील इस्लामी राज्यकर्त्यांची धोरणे कशी होती हे समजून येते.उदाहरणार्थ,दिल्लमध्ये कुतुबमिनारच्या जवळ कुब्बतुल-इस्लाम नावाची एक इस्लामी सत्तेच्या आरंभीच्या काळातील मशीद आहे तिच्या बांधणीत हिंदू देवळातील खांब वगैरे सामग्रीचा पुष्कळ वापर केलेला आहे.शिवाय त्या मशिदीतील शिलालेखातही ती मशीद बांधण्यासाठी ज्यांचे मूल्य सत्तावीस लाख देहलीवाल(एक सोन्याचे नाणे) होईल अशा उध्वस्त केलेय देवळांची सामग्री वापलेली आहे,असे नमूद आहे.काशीमध्ये कृत्तिवासेश्वर या नावाचे एक जुने देवालय होते,ते मोडून सध्या तिथे एक लहानशी मशीद उभारलेली आहे.त्या मशिदीत पूर्वी एक शिलालेख होता,आता तो तिथे नाही.तथापि त्या शिलालेखात वरील देवालय मोडून तेथे मशीद बांधल्याचा लेख असल्याचे हिंदीचे प्रसिद्ध पूर्वसूरी श्री हरिश्चंद्र यांनी आपल्या एका लेखात सांगितले आहे.काशीतच विश्वेश्वर व बिंदुमाधव या मंदिरांचे मशिदीत रुपांतर केले हे सर्वज्ञ ज्ञात आहे.अजमेरचे अढाई दिनका झोपडा किंवा मथुरेतील केशवदेव  मशीद ही आणखी उदाहरणे आहेत.
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील घोडे या गावातील मशिदीत एक फारसी शिलालेख आहे.त्यात खोदविणारा म्हणतो की देवाच्या प्रसादासाठी मी तीन देवळे तोडली आणि मग या खराबाबादेत मशिदीचा पाया घातला.या गावाचे जुने नावं घोडे,या गावाच्या जवळच घोडनदी आहे.पण लेख खोदविणारास घोडनदी हे नावं न आवडून त्याने तीस खराब असे नावं दिले.खर या शब्दाचा अर्थ गाढव आणि खराब म्हणजे गाढवाचे मूत.तेव्हा हा लेख खोदाविणाऱ्याच्या मताने घोडनदीऐवजी त्या नदीस गाढवाच्या मुताची नदी म्हणणे उचित आहे असे वाटून तेथे असलेल्या गावास त्याने खराबाबाद असे नाव दिले.

सदर उल्लेखांवरून मुस्लीम राज्यकर्त्यांची मानसिकता व धोरणे दिसून येतात आणि हिंदू लोकांबद्दल मनात आणि जाहीररीत्या असलेले विष दिसून येते.काही मुस्लीम सरदार (अफझलखान) इतके धर्मवेढे होते की त्यांनी स्वतःला 'कातील-इ-मुतमर्रीदान व काफरान' म्हणजे काफिरांची कत्तल करणारा व 'शिकनन्दा-इ-बुतान' म्हणजे मूर्ती फोडणारा अशी विशेषणे (बिरुदे) लावली होती.

©तुषार माने

संदर्भ: महाराष्ट्रमहोदयाचा पूर्वरंग 
           शिवचरित्र साहित्य खंड 

खालील उल्लेख हा मुस्लीम राज्यकर्त्यांनी शिवाचे मंदिर पाडून तिथे मशीद बनवली,परंतु शिवाजी महाराजांनी त्याची पुनःप्रतिष्ठापणा केली याचा आहे.

Comments

Popular posts from this blog

शिवाजी महाराजांचे आरमार

अखेर मातुःश्रींची भेट झाली !

**कर्तव्यकठोर राधाबाई पेशवे**