रतनपूरची लढाई भाग २
(रतनपूरची लढाई ४ मार्च १७०६ रोजी झाली आणि या लढाईत मराठ्यांनी मुघल सैन्याला धूळ चारली पण अजूनही ह्या युद्धात गुजरातचा नायब सुभेदार अब्दुल हमीदखान स्वतः सैन्यानिशी सामील झाला नव्हता.)
अब्दुल हमीदखान हा रतनपूरच्या दिशेने येत आहे अशी खबर मराठ्यांना लागली.मराठ्यांना वाटले की रतनपूरच्या लढाईच्या बातमी नंतर अब्दुल हमीदखान न जाणो,परत जाईल अगर आपल्या छावणीचा बंदोबस्त कडक ठेवील.असे करण्यास त्याला वेळ देऊ नये या विचाराने मराठ्यांनी रातोरात बाबापियारा उताराजवळ नर्मदा पार केली.अब्दुल हमीदखान त्याच दिवशी बाबापियारा उताराजवळ पोहोचला होता.त्याने आपली छावणी तयार केली होती.अब्दुल हमीदखानाबरोबर सफदरखान बाबी याची मुले महंमदशेर व महंमद सलाबत,महंमद अश्रफ,महंमद असद गानी,खलीलखान,मुसाहीबखान,मासूमकुली,आज्जमाबादेचा सुभेदार सय्यद मुझ्झफर उर्फ सय्यद मस्तू,पेठापूरचा ठाणेदार मीर अब्दुल्बहाब हे सरदार आणि अधिकारी होते.त्याच्याजवळ चार हजार स्वार व चार हजार पायदळ होते.
मराठ्यांनी अब्दुल हमीदखानाच्या छावणीवर रात्रीच हल्ला केला.मोगाल्यांच्या सैन्यात हाहाःकार उडाला.अनेक लोक पाळत सुटले,रात्रीच्या अंधारात पळून जाणे सोईचे झाले.पहाट झाली तसे युद्ध जुंपले.मोगलांचे अनेक लोक मारले गेले व बरेच जखमी झाले.मराठ्यांची संख्या प्रचंड होती.त्यांनी मोगलांच्या सैन्यावर चहूकडून हल्ले करून एकच गोंधळ उडवून दिला.मोगल सैन्याची शिस्त व रचना कोलमडली.मोगलांकडची भित्री माणसे सुरुवातीपासून पळून जाऊ लागली.बरेच लोक मारले गेले किंवा मराठ्यांच्या कैदेत सापडले.काही माणसे सहीसलामत त्या प्रसंगातून सुटली.महंमद सलाबतखान,महंमद असद,महंमद अश्रफ,महंमदशेर बाबी ह्यांनी पहिले की मराठ्यांचे सैन्य मोठे आहे व आपले सैन्य मोडल्यामुळे आपला टिकाव लागणार नाही म्हणून ते शिस्तीने मैदानातून बाहेर पडले.मराठ्यांनी त्यांचा पाठलाग केला त्यात महंमदशेर जखमी झाला व मराठ्यांनी त्याला जमिनीवर पाडले.महंमद अश्रफ हा महंमदशेराच्या मदतीला धावून गेला.त्याचा घोडा मारला गेला,तरी तो महंमदशेराचे रक्षण करीत राहिला.तोपर्यंत संध्याकाळ झाली.मराठे मैदानातून निघून गेले.महंमदशेराला हालचाल करण्याची शक्ती राहिली नव्हती.महंमद अश्रफने त्याला खांद्यावर घेतले व मोठ्या कष्टाने तो कर्नालीचानोंद जवळील मादबा या खेड्यात पोहोचला.
महंमद सलाबत व महंमद असद हे अहमदाबादेत जाऊन दाखल झाले.ख्वाजा अब्दुल हमीदखान व इतर लोक लढत राहिले त्यास मराठ्यांनी कैद केले.सय्यद मुझ्झफर हा जखमी होऊन मैदानातून बाहेर पडला.मीर अब्दुल्बहाब हा लढाईत मारला गेला.मासूमकुली हा जखमी होऊन मराठ्यांच्या तावडीत सापडला.कलबअली नावाचा एक मोगल हा मराठ्यांच्या सैन्यात होता.मासूमकुलीचा बाप काजीमबेग याची आणि कलबअली याची ओळख होती.कलबअलीने मराठ्यांच्या तावडीतून मासूमकुलीची सुटका करविली,आणि त्याची शुश्रुषा करून त्याला भडोचला पाठविले.अब्दुल हमीदखान व त्याचे सहकारी यांना कैद केल्यानंतर मराठ्यांनी त्यांचा सर्व सरंजाम लुटला.त्यांनी तिथेच काही दिवस मुक्काम करून आसपासच्या इलाख्यातून खंडणी वसूल करण्यास सुरुवात केली.
गुजरातच्या सुभ्यात विलक्षण गोंधळ उडाला.कोळी जमातीचे लोक आतापर्यंत फौजदार व ठाणेदार यांच्या भयाने दबून होते त्यांनी आपले डोके वर उचलले.(वनातून वाघ नाहीसा झाला की कोल्हे शेर होतात)कोळ्यांनी ठिकठिकाणी लुटालूट करण्यास सुरुवात केली.दोन दिवस ते बडोदे लुटीत होते.अब्दुल हमीदखानाच्या पराभवाची बातमी अहमदाबादेस आली.सुभ्याचा बक्षी नेमानखान,न्यायाधीश शेख महंमद अक्रमुद्दिन आणि मुख्य काजी अबुल्फरह यांनी आपापसात सल्लामसलत केली.त्याच वेळी महंमद बेग खान याची सोरठच्या फौजादारीवर नेमणूक झाली.तो सोरठाकडे जाण्यास निघाला होता त्यावेळेस त्याचा मुक्काम अहमदाबादेपासून तीन कोसांवर सरखेज येथे होता.वरील तीन अधिकार्यांनी महंमद बेग खानाला अहमदाबादेच्या संरक्षणासाठी आणले.त्याने सरकारी खजिन्यातून रक्कम घेऊन शहराची तटबंदी करणे,नवीन सैन्य उभारणे इत्यादी कामे सुरु केली.सुभ्याचे बक्षी व काजी यांनी सर्व तपशील औरंगजेबाला कळविला.
इकडे मराठ्यांनी कैद झालेल्या मोगल अधिकाऱ्यांबद्दल चौकशी करून प्रत्येकावर सुटकेची खंडणी लादली.(हा मराठ्यांचा उत्तम business होता.असले प्रकार करून मराठ्यांनी औरंगजेब व त्याच्या सरदारांना हैराण केले होते.)सफदरखान बाबी याने आपला मुलगा महंमद सलाबत याला मराठ्यांच्याकडे ओलीस ठेविले.भडोचला जाऊन त्याने आपली खंडणीची रक्कम उभी केली आणि ती मराठ्यांना देऊन त्याने आपल्या मुलाची सुटका करविली.इतर अधिकाऱ्यांनीही शक्य ते प्रयत्न करून आणि आपापल्या खंडणीच्या रकमा भरून आपापली सुटका करून घेतली.अब्दुल हमीदखान व नजरअलीखान हे दोघे मातबर सरदार होते.नजर अलीखान हा अब्दुल हमीदखानच्या आधी सुटून अहमदाबादेस आला.त्याने किती खंडणी भरले हे समजले नाही.मराठ्यांनी अब्दुल हमीदखानावर तीन लाख रुपयांची खंडणी लादली.ही रक्कम उभी करून पाठवा म्हणून अब्दुलने आपला चिटणीस कानदास आणि इतर लोकांना पत्रे लिहून अहमदाबादेस पाठविली.पण रक्कम बरीच होती.अब्दुल हमीदखानाजवळची संपत्ती,जडजवाहीर,सोने,चांदी ही सर्व एकत्र करून मराठ्यांकडे पाठविण्यात आली.पण तीन लाखांची काही भरपाई होऊ शकली नाही.
औरंगजेबाने आपला नातू बेदारबख्त(हा माळव्याचा सुभेदार होता) यास अहमदाबादेस जाऊन सुभ्याचे काम पाहण्याची आज्ञा केली.महंमद बेग खान यास औरंगजेबाकडून निक्षून लिहिण्यात आले,अब्दुल हमीदखानाच्या सुटकेसाठी सरकारी खजिन्यातून एकही पै देण्यात येऊ नये(यावरून बादशाहाचे त्याच्या अधिकाऱ्यांबद्दलचे धोरण दिसते) अब्दुल हमीदखानाने अहमदाबादहून आलेली रक्कम मराठ्यांकडे भरली.उरलेल्या रकमेची भरपाई करावी म्हणून त्याने आपला पुतण्या मुहम्मदखान व भाचा मीर गुलाम महंमद यांना मराठ्यांजवळ ओलीस ठेवले.तो स्वतः अहमदाबादेस आला.मराठ्यांनी आपला एक अधिकारी मुजफ्फर हुसेन याला त्याच्या बरोबर पाठविले.अब्दुल हमीदखानाने अजून काही रक्कम मराठ्यांकडे पाठविली.अद्याप थोडी रक्क शिल्लक होती.अब्दुल हमीदने मुजफ्फर हुसेन याला निरोप दिला.त्याला पकडावे असे महंमद बेग खानाने ठरविले होते,पण न जाणो या कामात अब्दुल हमीदखान हा अडथळे आणायचा या विचाराने तो गप्प बसला.मुज्जफर हुसेन हा अहमदाबादेतून बाहेर पडला नसेल तोच त्याला पकडून शहजादा बेदारबख्त याच्या हवाली करावे असा औरंगजेबाचा हुकुम आला.मुज्जफर हुसेन हा अहमदाबादेहून तीन कोसांवर बतवा या गावी होता.तेथे तो आणि त्याच्या सहकाऱ्यांना पकडण्यात आले.पुढे तो मोगलांच्या चाकरीत शिरला.लढाईत आज्जमाबादेचा फौजदार सय्यद मुझ्झफर याला जखमा झाल्या होत्या,तो या सुमारास मरण पावला.अब्दुल हमीदखानाचा पुतण्या व भाचा हे मराठ्यांच्याकडे ओलीस होते;ते संधी साधून याच सुमारास पळून भडोचला पोहोचले.
शहजादा बेदारबख्त हा बादशहाच्या आज्ञेप्रमाणे गुजरातकडे रवाना झाला होता.१ जुलै १७०६ रोजी तो अहमदाबादेस पोहोचला.मराठ्यांना त्याच्या येण्याची बातमी लागली.पावसाळाही जवळ आला होता,म्हणून मराठ्यांनी आसपासच्या इलाख्यातून खंडणी गोळा केली आणि ते दक्षिणेकडे परतले.ह्या लढाईचे श्रेय धनाजी जाधवाचे होय.धनाजीच्या या धाडशी पराक्रमाने मराठ्यांनी गुजरातेत प्रवेश मिळविला.(मराठ्यांनी नावाजलेल्या मोठमोठ्या मोगल सरदारांना तलवारीच्या पात्याची चव चाखावयास लावली.मराठ्यांचा औरंगजेबाच्या जिहाद विरुद्ध स्वातंत्र्याचा लढा हा नेटाने सुरूच राहिला.)
रतनपूरच्या लढाईसंबंधीचे औरंगजेबाच्या अखबारतील उल्लेख:-
(गुजरातचा सुभेदार आज्जम याने २५ नोव्हेंबर १७०५ रोजी अहमदाबाद सोडले.) मराठ्यांचे(धनाजी जाधव) आक्रमण फेब्रुवारी १७०६ चे. अहमदाबादेचा नायब सुभेदार व दिवाण ख्वाजा अब्दुल हमीदखान हा पराभूत होऊन मराठ्यांच्या तावडीत सापडला. अहमदाबादेत राहिलेले अधिकारी म्हणजे बक्षी आणि वाकेनवीस मीर नोमानखान, न्यायाधीश शेख मुहम्मद अक्रमुद्दीन, मुख्य काजी अबुल फरह, सोरठचा फौजदार मुहम्मद बेग. मागील पत्रात आज्जमाबादचा फौजदार सय्यद मुजफ्फर(उर्फ सय्यद मस्तू) हा रतनपूरच्या लढाईतील जखमांमुळे मेला. (१७०६)
संदर्भ: श्री छत्रपती नि त्यांची प्रभावळ
A SHORT HISTORY OF AURANGZIB
असे होते मोगल
औरंगजेबाचा इतिहास
सेनापती धनाजी जाधव
नियतीच्या विळख्यात औरंजेब
©तुषार माने
Comments