**श्रीमंत सदाशिवरावभाऊ पेशवे**
एक कुशल प्रशासक आणि धडाडीचा सेनापती असणारी पेशव्यांच्या घरातील आसामी म्हणजे श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवे! हिंदुस्थानचा कारभार हिंदुस्थानी लोकांच्या हातात असाच आग्रह धरणारा सदाशिवरावभाऊ हा इथल्या सांस्कृतिक आणि राजकीय एकात्मतेच महत्व ओळखणारा पहिला माणूस असला पाहिजे.
सदाशिवरावभाऊ यांचा जन्म भाद्रपद शुद्ध द्वितीय,श्री शालिवाहन शके १६५२,साधारण नाम संवत्सरी,सोमवारी म्हणजेच ४ ऑगस्ट १७३० रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव रखमाबाई होते. त्यांचे वडील चिमाजीआप्पा हे उत्कृष्ट सेनानी होते. सदाशिवरावभाऊंच्या जन्मामुळे बाजीरावांना खूप आनंद झाला(चिमाजीआप्पांचा पहिलाच पुत्र)पुण्यात साखऱ्या वाटण्यात आल्या. बाळाचे बारसे १४ ऑगस्ट रोजी करण्यात आले. बाळाची आजी म्हणजे राधाबाई यांनी त्याचे नाव "सदाशिव" ठेवले. हेच पुढे सदाशिवरावभाऊ उर्फ भाऊसाहेब या नावांनी ओळखले जाऊ लागले. भाऊंच्या जन्मानंतर त्यांच्या आई रखमाबाई यांची तब्येत ढासळत गेली. औषधे चालू होती पण कसलाच फरक पडला नाही. ३१ ऑगस्ट १७३०,सोमवारी रात्री त्या मृत्यू पावल्या. आपल्या आईचा केवळ एका महिन्याचा सहवास त्या बाळास लाभला. त्यांच्या आईच्या मागे सदाशिवरावभाऊंचे संगोपन त्यांच्या काकू काशीबाई आणि आजी राधाबाई यांनी केले. भाऊंची मुंज १२ फेब्रुवारी १७३६ रोजी झाली. 'फाल्गुन सुध १२, द्वादसी,गुरुवारी राजश्री चिमाजीअप्पांचे पुत्र सदोबा यांचा व्रतबंध जाला.' सदाशिवरावभाऊ लहानपणापासून तरतरीत व पाणीदार होते.
चिमाजीअप्पांच्या मृत्यूनंतर, ११ वर्षांच्या 'सदोबाने' ब्रह्मेंद्रस्वामी धावडशिकराना लिहिलेल्या पत्रावरून त्यांची लहान वयातील परिपक्वता व परिस्थितीची जाणीव स्पष्ट दिसून येते.या पत्रात भाऊसाहेब म्हणतात,'तीर्थरूप राव व आपा होते(त्यावेळी) आपा थोर होऊन जे रायांनी कर्तव्य संपादावे तैसे आपा संपादू लागले,ते रायासही मान्य होत गेले.तैसेच आम्हपासून घडून येणे ते स्वामींचेच कृपा कटाक्षे करून घडेल.' नानासाहेबांना (बाजीराव पेशव्यांचे पुत्र)पेशवाई मिळाल्यावर सदाशिवरावभाऊ हे काही वर्ष साताऱ्याला होते. लहानपणापासून सातारा दरबारात रामचंद्रबाबा सुखटणकर(शेणवी) यांसारख्या मुत्सद्दी लोकांच्या तालमीत तयार झाल्याने राजकारण त्यांच्या अंगवळणी पडलेले होते. या काळात त्यांची चलाखी,निःस्पृहता,करारी वृत्ती,शुद्ध आचरण,न्यायी वृत्ती,हिशेबी वृत्ती,दक्षता इत्यादी गुण शाहू महाराजांच्या लक्षात आले होते. सदाशिवरावांचे लग्न महादजी नारायण भानू यांची कन्या उमाबाई यांच्याशी ७ फेब्रुवारी १७४० रोजी करण्यात आले.
सन १७४२-४३ मध्ये काशीबाई रामेश्वर यात्री गेल्यावर त्याच वर्षा अखेरीस नानासाहेब, सदाशिवरावभाऊ, रघुनाथराव, जनार्दनपंत हे नाशिक येथे कुंभमेळा असल्याने गंगा स्नानासाठी २० डिसेंबर १७४२ रोजी पंचवटी येथे गेल्याची नोंद आहे.

दिनांक २२ नोव्हेंबर १७४६ रोजी सदाशिवरावभाऊ व उमाबाई यांना पुत्ररत्न झाले. याचे नाव 'कृष्णराव' असे ठेवण्यात आले. परंतु कृष्णराव फार काळ जगू शकले नाहीत.
देशमुखांनी तुंगभद्रा दुआबातील उठवलेली पेशव्यांची ठाणी काबीज करण्यासाठी ५ डिसेंबर १७४६ ला महादजीपंत पुरंदरे यांसोबत सदाशिवरावभाऊ कर्नाटक मोहिमेवर रवाना झाले. जानेवारी सन १७४७ ला भाऊंनी आजऱ्याला पहिली लढाई मारली. बहादूरभेंड्याचा किल्ला घेतला. तुंगभद्रेपर्यंत जाऊन सावनुरकर नवाब, देसाई व बंडखोरांना जरब बसविली. सावनूरच्या नवाबाकडून पाच्छापूर, बदामी, नवलगुंद, उंबल, गिरी, तोरगळ, कित्तूर, परसगड, गोकाक, यादवाड, बागलकोट, हल्ल्याळ, हरिहर, बसवपट्टण वगैरे ३६ परगणे भाऊंनी काबीज केले. त्याच काळात शाहूमहाराजांनी काही लोकांच्या कटकटीमुळे ९ मार्च १७४७ रोजी नानासाहेबांना पेशवे पदावरून दूर केले. नानासाहेबांनी ही विनातक्रार पेशवे पद सोडून दिले. पण पेशवे पदाच्या तोडीचा एकही मनुष्य न दिसल्याने शाहूमहाराजांनी नानासाहेबांनाच पुन्हा पेशवे पदाची वस्त्रे दिली. ३० जुलै १७४८ रोजी भाऊसाहेब व उमाबाई यांना मुलगा झाला, पण तो बारशापर्यंतही जगू शकला नाही.
अनेक घटना घडतच होत्या, त्यावेळेस शाहू महाराजांनी नानासाहेबांनपासून 'पेशवाई' ही भट घराण्याकडे वंशपरंपरागत करून दिली आणि अखेरची निरवानिरव करून दि.१५ डिसेंबर १७४९ रोजी साताऱ्यात मृत्यू पावले. नानासाहेबांनी राजाराम महाराजांचे नातू शिवाजीपुत्र राजाराम(दुसरे) यांना गादीवर बसवून ४ जानेवारी १७५० रोजी राज्याभिषेक केला.

२२ मार्च १७५० गुरुवारी सदाशिवरावभाऊ यांच्या पत्नी उमाबाई यांचा मृत्यू झाला. शास्त्राप्रमाणे पुन्हा मंगल कार्य एका महिन्याच्या आत करावे लागत असल्याने वैशाख शुद्ध द्वितीया शके १६७२ प्रमोदनाम संवत्सरी गुरुवारी, म्हणजेच दिनांक २६ एप्रिल १७५० रोजी भाऊसाहेबांचा पार्वतीबाई (कोल्हटकर घराणे)यांच्याशी विवाह झाला. भाऊसाहेब हे लहानपणापासून शूर व कर्तबगार असल्यामुळे नानासाहेबांची त्यांच्यावर फार मर्जी असे. भाऊसाहेब आपले वडील तसेच प्रसिद्ध रणधुरंधर मुत्सद्दी रामचंद्रबाबा शेणवी यांच्या तालमीत तयार झाले होते. या काळात महादजीपंत पुरंदरे हे दिवाणपदावर होते, म्हणून भाऊसाहेबांनी नागपूरकर भोसल्यांची दिवाणगिरी पत्करली. दत्तक रामराजा मध्ये कुवत नसल्याने सातारकर छत्रपतींची गादी कोणी चालवावी याबद्दल वाद उत्पन्न झाला. रामचंद्रबाबा शेणवी यांनी कोल्हापूरकर संभाजीला साताऱ्याच्या गादीवर न बसवता भाऊसाहेबांनाच कोल्हापूरची पेशवाई मिळवून द्यावी असे सुचवले. ही मसलत नानासाहेबांनी मान्य केली नाही. सप्टेंबर १७५० मध्ये सदाशिवरावभाऊंनी सांगोल्यावर स्वारी करून यमाजी शिवदेवाचे बंड मोडून काढले. कोल्हापूरकर संभाजी महाराजांनी कायमच सातारा राज्यात फूट पाडण्याचा प्रयत्न चालवला होता.सांगोल्याच्या स्वारीहून(सन १७५०)परतल्यावर, कोल्हापूरकारांशी संधान बांधून भाऊसाहेबांनी तिकडची पेशवाई-वस्त्रे, पारगड, कल्लानिधी, चंदनगढी हे तीन किल्ले आणि सालीना ५० हजार रुपये उत्पन्नाची जहागिरी मिळविली. दिवाणगिरीच्या मुद्द्यावरून भावा-भावात तंटा होऊ नये म्हणून महादजीपंत पुरंदरे यांनी आपखुषीने दिवाणपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच भाऊसाहेब हे नानासाहेब पेशव्यांचे दिवाण झाले.
तुंगभद्रा कोरगाव लढायात १७५१-५२ साली भाऊसाहेब हजर होते. १७५२ साल हे मराठ्यांच्या राजकारणाच्या दृष्टीने फार महत्वाचे होते. १२ एप्रिल १७५२ रोजी सफदरजंगाने बादशहाच्या वतीने मराठी सरदारांशी करार(अहमदनामा) केला. त्यानुसार इथल्या व परकीय आक्रमणांपासून मोगल बादशहाचे रक्षण करण्याची जबाबदारी पेश्व्यावर पडली.१७५२ मध्ये अब्दालीने केलेल्या स्वारीमुळे तो करार झाला होता. त्या करारामुळे मराठे आता मोगल हिंदुस्थानाचे संरक्षक बनले होते. १७५४ साली कर्नाटकात जाताना नानासाहेबांनी कोल्हापूरकर संभाजींची भेट घेऊन, भाऊसाहेबांना प्रधानकीची वस्त्रे देवविली. १७५७-५८ मधील दक्षिणेकडील मोहिमा यशस्वीपणे पार पडल्या.
पण उत्तरेकडील वारे मात्र फार वेगळे होते. जानेवारी १७५७ मध्ये अहमदशहा अब्दालीने दिल्ली व आसपासच्या प्रदेशावर स्वारी केली. नजीबखान रोहिला हा अब्दालीला सामील असल्यामुळे दिल्लीचा कारभार त्याच्या हातात सोपवण्यात आला. बादशहा जिवंत असूनही अब्दालीच्या नावाचा खतबा(प्रार्थना)पढण्यात आला. अब्दालीला खूप मोठी लूट मिळाली. मोठ्या प्रमाणावर अन्याय व अत्याचार करण्यात आले.अब्दालीने मथुरा व वृंदावन येथे चाल करून खूप मोठ्या प्रमाणावर हिंदूंची कत्तल केली. अंताजी माणकेश्वरांनी रघुनाथरावास लिहिले की त्यांनी अब्दालीचा कर्नाल पर्यंत तरी पाठलाग करावा पण त्यांनी तसे केले नाही. कदाचित त्यांच्याकडे पुरेसे सैन्य बळ नव्हते?
१६ मार्च १७५७ ला भाऊसाहेबांना उत्तरेतून पत्र आले. त्यात लिहिले होते,'राजश्री समशेर बहाद्दर व नारोशंकर,अंताजी माणकेश्वर आग्र्यावर आहेत.श्रीमंत दादासाहेब व मलहारजीबाबा रामपुरात आहेत.फौज जमा झाली नाही.' ऑगस्ट १७५७ मध्ये मराठ्यांच्या हल्ल्याला सुरुवात झाली. जानेवारी १७५८ मध्ये मराठ्यांनी पंजाबवर हल्ला केला. तिथे अब्दालीचा मुलगा तैमूरशहा होता. तो मराठ्यांच्या धास्तीने पळून गेला. मराठ्यांनी त्याचा पाठलाग सुरु केला. ते सरहिंदहून लाहोरकडे निघाले. १९ एप्रिल १७५८ ला लाहोरचा पाडाव झाला. मराठे सिंधू नदीच्या तीरावरच्या अटकला पोहोचले. मराठ्यांच्या कर्तुत्वाने कळस गाठला. अब्दालीच्या पडावासाठी इराणच्या बादशाहाने मराठ्यांना साथ देण्याची तयारी दाखविली. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे साम्राज्य झाले होते.अहद तंजावर ते तहद पेशावर पर्यंत मराठ्यांची सत्ता प्रस्थापित झाली होती.
ऑक्टोबर १७५९ पासून सदाशिवरावभाऊ हे निजामाच्या मोहिमेवर होते. ७ नोव्हेंबर १७५९ ला त्यांनी अहमदनगरचा किल्ला काबीज केला. मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख मुझ्झफरखान गाडदी आणि भाऊ याचे कधीच पटले नाही. त्याच्या नेमणुकीला भाऊचा विरोध होता. भाऊनं बुसीकडे तयार झालेला आणि पूर्वी निजामाच्या तोफखान्याचा प्रमुख असलेला मुझ्झफरखानाचा पुतण्या इब्राहिमखान गाडदी याला सेवेत सामावून घेण्याकरिता हालचाली सुरु केल्या. इब्राहिमखानाचा दर्जा तोफखान्याचा प्रमुख म्हणून मुझ्झफरखानापेक्षा कमी होता, पण मराठ्यांच्या लेखी मुझ्झफर पक्का दगलबाज होता. निजामअली व निजाम सलाबतजंग यांच्यातल्या सलोख्याच्या कराराचे वेळी निजामअलीनं इब्राहिमला सेवेतून काढलं पाहिजे अशी अट सलाबतजंगाने घातली होती. त्यामुळे इब्राहिमची नोकरी गेली. हे कळल्यावर भाऊने आपल्या तोफखान्यातला अनुभवी पानसे याला इब्राहिमला इकडे आणण्याची कामगिरी दिली. हे काम फत्ते झाले. इब्राहिमखान आपल्या तोफा आणि एक हजार सैनिकांनिशी पेशव्यांच्या सैन्यात दाखल झाला. या सर्व घटनेमुळे मुझ्झफरखानाने भाऊला मारायचे ठरवले. त्यानं आपला जावई हैदरखान याला भाऊला मारण्यासाठी त्याच्या वानवडीच्या छावणीत पाठवलं. २८ ऑक्टोबर १७५९ या दिवसाच्या सायंकाळी भाऊ बेसावध असताना हैदारखानानं त्याच्या पाठीवर जंबियाने वार केला. भाऊसाहेबांची कैफियत नुसार,'पुढे कलमदान होते,शाई घ्यावयास हात पुढे गेला,तो पुढे संधान चुकले.' हा कट निजामाच्या सांगण्यावरून मुझ्झफरखानाने रचला अशी कबुली हैदर खानाने दिली. मुझ्झफर खानाला फाशीची शिक्षा देण्यात आली व हैदर खानाची देहांत सजा निशाणाच्या जागेवर अमलात आणली. या हल्ल्यामुळे भाऊंना व्यायाम बरेच दिवस बंद ठेवावा लागला. याबद्दल ते नानासाहेबांना लिहितात,'माझी प्रकृत प्रस्तुत बरीच आहे. दोहोतीही दिवसांआड एकदा जेवतो. सांभाळून जेवावे लागते. पथ्य अगदी नाही. जड मात्र फार खात नाही. औषध पहिले चालते तेच आहे. जखमेचे कातडे अजून बळकट झाले नाही. शिरेवर(जखम)म्हणून अंग थोडेसे दुखत असते. शक्ती अजून चांगली येत नाही. पाठीमुळे दंड-नमस्कार नाहीत. ते चाली लागल्या,याहून बरे वाटेल. थोडा थोडा प्रारंभ आहे.' सदाशिवरावभाऊ, विश्वासराव, बळवंतराव मेहेंदळे, विसाजी कृष्ण बिनीवाले आणि गोपाळराव पटवर्धन हे आपल्या सैन्यासह एकत्र उदगीरकडे निघाले. वाटेत भाऊने भीमा नदीवरचा बहादूरगड जिंकला. निजामाची छावणी उदगीरला होती. या ठिकाणी दोन्ही सैन्यात युद्ध होऊन ३ फेब्रुवारी १७६० रोजी निजाम शरण आला. त्याने पेशव्याच्या सगळ्या अटी मान्य केल्या. त्यानं पेशव्याला विजापूर आणि औरंगाबाद ही शहरं, अशिरगड, बुऱ्हाणपूर, मुल्हेर हे किल्ले आणि ६० लाखांचा मुलुख दिला. निजामाचा दौलताबादचा किल्ला देखील मिळाला.भाऊच्या नेतृत्वाची सर्वांनी प्रशंसा केली. इब्राहिम खानच्या तोफखान्यानं चोख काम केलं होतं. त्यामुळे भाऊ प्रभावित झाला होता.
उत्तरेतली परिस्थिती सारखीच बदलत होती. अब्दाली नोव्हेंबर १७५९ मध्ये पुन्हा हिंदुस्थानावर चालून आला. जयपूरच्या माधोसिंगाचा अब्दाली व नजीब खानशी बराच काळ पत्रव्यवहार सुरु होता. अब्दालीने योग्यरीतीने दत्ताजी शिंदेला चकवत नजीबला जाऊन मिळण्यासाठी जगध्रीला यमुना ओलांडली. मदतीसाठी दत्ताजीने मल्हाररावास निरोप पाठविला होता, पण ते लवकर आले नाहीत. ते जयपूरच्या मोहिमेत अडकून बसले होते. होळकरांनी २ जानेवारी १७६० रोजी जयपूर सोडले आणि दिल्लीकडे वाटचाल करायला सुरुवात केली. अब्दाली यमुनेच्या डाव्या तीरावर लुनी इथं होता. स्वतः दत्ताजी दिल्लीच्या उत्तरेला मजनू-का-टीला इथं होता. अब्दालीने यमुना ओलांडू नये म्हणून त्याने ठिकठिकाणी चौक्या-पहारे बसविले होते. १० जानेवारी १७६० मकर संक्रांतीच्या दिवशी अब्दालीने बुराडी येथे यमुना ओलांडली. काळ थंडीचा असल्याने धुके मोठ्याप्रमाणावर होते, त्यामुळे काही कळायच्या आत रोहिले बंदुकधारी सैनिक नदीचे रुंद पात्र ओलांडून आले. तिथे साबाजी शिंदे ७०० सैनिकांनिशी होता. मराठ्यांवर मोठ्या प्रमाणावर गोळीबार होऊ लागला. ह्या बातम्या दत्ताजीला कळल्यावर त्याने साबाजी शिंदेचा मुलगा बयाजी याच्या बरोबर पाच हजार सैनिक बुराडीला पाठवले. लवकरच बयाजी ठार झाला व मराठे पळत आहेत अशी बातमी दत्ताजीला मिळाली. तेव्हा दत्ताजीने घोड्यावर उडी मारली व जनकोजीला मागे राहायला सांगून काही सैनिकांबरोबर तो बुराडीकडे गेला. पण दत्ताजी पडल्यावर मराठ्यांचे अवसान गळाले. जनकोजीच्या देखील दंडात गोळी लागल्याने त्याला रणातून बाहेर काढण्यात आले. नजीबच्या सैन्याने मराठ्यांचा पाठलाग सुरु केला. मराठे चीजवस्तू टाकून देऊन छावणी सोडून गेले. दत्ताजीला गोळी लागून तो मरण पावला असावा. 'ईश्वराचा शिपाई 'या लढाईत पडला.
१४ मार्च १७६० ला फौजेने पतदूरहून कूच केले. नानासाहेब पेशवे मोहिमेला जाणार होते पण तब्येत ठीक नसल्याने ते गेले नाहीत. भाऊसाहेबांबरोबर विश्वासराव, बळवंतराव मेहेंदळे, यशवंतराव पवार, समशेर बहादूर, विठ्ठल शिवदेव, दमाजी गायकवाड, मानाजी पायगुडे, सटवोजी जाधवराव, इब्राहिमखान गाडदी, तुकोजी पवार, रामराव देवकांते, नाना पुरंदरे, नाना फडणीस, सोनजी भापकर, नरोजी निंबाळकर, गोजोजी रणवरे, हणमंतराव सोनसकर, लिंगोजी नारायण,विसाजी रुद्र, नेमाजी माने इत्यादी सरदार व लोक गेले होते. निजामाने पण जावे असे पेशव्याचे मत होते पण त्याने अंग काढून घेतले. भाऊ सुमारे ५० हजाराचे सैन्य घेऊन निघाले. यातले वीस हजार पेंढाऱ्यांची दुय्यम फौज होती आणि कसलेलं सैन्य तीस हजार होते. यामध्ये इब्राहिमखानाचे ८ हजार गारदी आणि तोफखाना, हुजुरातीचे दहा हजार नावाजलेले घोडेस्वार आणि इतर सरदारांचे बारा हजार सैनिक होते. फौजेबरोबरच इतर कामांसाठी अनेक लोकांची गरज पडायची. त्या बीन लढाऊ माणसांना बुणगे म्हणत. मराठ्यांनी लढाई मध्ये तोफखान्याचा वापर योग्यरीतीने केला असला तरी ते तंत्र १७६० साली बाल्यावस्थेतच होते. त्यात बऱ्याच अडचणी होत्या. सगळ्यात महत्वाची म्हणजे या तोफा अवजड होत्या आणि युद्धाचे वेळी तोफखाना, पायदळ आणि घोडदळ यांच्यात समन्वय ठेवणे आवश्यक होते. उदगीरच्या विजयानंतर तोफखान्याचं महत्व वाढलं, पण भाऊच्या अब्दालीवरच्या मोहिमेची सुरुवात उदगीरनंतर लगेचच झाली. त्यामुळे हे नवीन तंत्र मराठ्यांच्या अंगवळणी पडले नव्हते. पेशव्यानं भाऊला खर्चाकरिता सहा लाख रुपये आणि इंदूर आणि उज्जैन इथल्या सावकारांकडे वटवण्याकरिता दोन लाखांच्या हुंड्या दिल्या होत्या. याउपर मराठ्यांनी उत्तरेत खंडणी व चौथाई यांच्या रूपाने पैसे मिळवायचे होते. उत्तरेतल्या सत्तांकडून दक्षिणेत पैसा आणायचा ही जुनी परंपरा होती. शिवाय पेशव्याने गोविंदपंत बुंदेले यांना भाऊला मदत करण्यास सांगितले होते. उदगीरच्या लढाई नंतर सैनिकांना थोडीही उसंत मिळाली नव्हती आणि युद्धत सैनिक व घोडे यांची झालेली हानी भरून काढण्याकरिता अजिबात वेळ मिळाला नव्हता. इतक्या कमी अवधीत होईल तितक्या चांगल्या दर्जाचं सैन्य भाऊला दिलं गेलं. भाऊची उत्तरेत जाण्याची ही पहिलीच वेळ होती.
उत्तरेकडे निघालेल्या भाऊचे धोरणं हे अगदी स्पष्ट होते,'आम्हास तर चकतेयाची(चुगताई वंश) पातशाही राखणे.अबदालीशी सलूख करणे नाही.तैमुरियाची पातशाही;याचा बंदोबस्त कळेल तसा आम्ही राजश्री पंतप्रधान यांच्या इतफाकाने करू तुम्ही या गोष्टीत न पडावे.अब्दालीची जड हिंदुस्थानचे पातशाहीत रुतो देणे अयोग्य' अब्दालीचे हे हिंदुस्थानावरचे सहावे आक्रमण होते त्यामुळे त्याला इथली भौगोलिक परिस्थिती उत्तम प्रकारे माहित होती. अब्दालीला इथल्याच नजीब खान, फरुकाबादचा नवाब अहमदखान बंगश यांसारख्या अजून काही घरभेदींची मदत होती. सदाशिवरावभाऊंची अयोद्धेचा नवाब शुजा-उद्-दौला याला आपल्या पक्षात आणण्याची नीती होती पण ती नजीब खानामुळे फळास आली नाही. भाऊन शुजाला लिहिले होते की मोगल तख्ताच्या रक्षणासाठी आमच्या बाजूला येणे, कारण तुला वजीर होण्याची इच्छा आहे. हे जमणार नसेल, तर कमीतकमी तटस्थ रहा. पण शुजाकडून कुठलेच आश्वासन मिळाले नाही. याउलट तो नजीब खानामुळे अब्दालीला जाऊन मिळाला.
मराठ्यांच्या फौजा बऱ्हाणपूर मार्गे हंडियाचा घाट ओलांडून भोपाळ-सिरोंज-नरवरच्या घाटाने ग्वाल्हेर-घौलपूर-मथुरा करत दिल्लीच्या रोखाने निघाल्या. भाऊकडे भारी तोफखाना असल्याने त्याची चाल संथ होती. चंबळ नदी ओलांडल्यावर त्याची गाठ मल्हारराव होळकरांशी पडली. जूनच्या अखेरीस जनकोजी शिंदे त्यांना मिळाला. भाऊचा उदगीर ते दिल्लीला(पानिपत)जाण्याचा मार्ग:
मल्हारराव व जनकोजीने भाऊला सुरु असलेल्या वाटाघाटींची माहिती दिली.हलक सैन्य घेऊन शत्रूला जेरीस आणण्याची पारंपारिक पद्धत वापरावी असे मल्हाररावांनी सांगितले. खुल्या मैदानातील युद्ध त्यास पसंत नव्हते. भाऊंचा तोफखान्यावर विश्वास होता. मराठे खुल्या मैदानातील लढाईच्या तयारीने आले होते. युद्धाच कोणतं तंत्र वापरावे यावर बराच उहापोह झाला. पण मल्हाररावांच्या गनिमी काव्याला अफगाण सेनेने आश्चर्याचा धक्का दिला होता. अब्दालीने शिंदे आणि होळकरांच्या सैन्यात भीती निर्माण केली होती हे भाऊने पाहिले होते. भाऊ जाटाच्या मुलुखात आला तेव्हा सुरजमल जाट दहा हजार सैनिक घेऊन मराठ्यांकडे आला आणि त्यांच्या बरोबर दिल्लीकडे निघाला. पावसाळा सुरु झाल्याने यमुना दुथडी भरून वाहू लागली होती; नदी ओलांडून युद्ध करणे कोणत्याच पक्षाला शक्य नव्हते. १४ जुलै १७६० रोजी भाऊ आगऱ्याला पोहोचला. दिल्लीवर कब्जा करायचा हे निश्चित झाल्यावर भाऊने होळकर, शिंदे, मेहेंदळे, सुरजमल, इमाद-उल-मुल्क यांना सेना देऊन पुढे पाठविले.
तीन दिवसांच्या लढाईनंतर, मराठ्यांनी २२ जुलै १७६० रोजी दिल्लीवर कब्जा केला. याकुबअली खानाने किल्ला लढवला होता. भाऊ स्वतः २९ जुलैला दिल्लीला पोहोचला. इब्राहिमखानाच्या तोफा किल्ल्यावर बरसत होत्या. भाऊकडून आश्वासन मिळाल्यावर याकुबअली खानाने आपले लोक व सामानसुमान घेऊन किल्ला सोडला. मराठ्यांनी दिल्ली जिंकली(काय वाटले असेल मराठ्यांना आणि भाऊंना?ज्या औरंगजेबाने स्वराज्याचे तख्त फोडले आज त्याचेच दिल्ली मराठ्यांनी जिंकले.पण काय नियतीचा खेळ मराठे त्या मुघल हिंदुस्थानासाठी लढत होते.) दिल्ली जिंकल्याने भाऊचा नावलौकिक वाढला, पण खजिन्यात फारशी भर पडली नाही. अब्दाली व मराठे यांच्यात तह व्हावा यासाठी प्रयत्न सुरु होते. यात शुजाचा प्रमुख सहभाग होता. अब्दालीने तीन मागण्या पुढे केल्या; या दोन सत्तांमधली सरहद्द सरहिंदला असावी, मराठ्यांनी दिल्लीतून निघून जावं आणि चंबळच्या उत्तरेला येऊ नये आणि शहा आलम द्वितीय याला तख्तावर बसवून शुजाला वजीरकी आणि नजीबला मीरबक्षी देण्यात यावी. दुसरीकडे भाऊने सिंधू नदी ही हद्द असावी आणि दिल्लीचा ताबा मराठ्यांकडे असावा असा आग्रह धरला. कुणीही दुसऱ्याच ऐकायला तयार नव्हता. इमाद आणि सुरजमल यांचे भाऊशी बिनसल्याने ते छावणी सोडून गेले. मराठ्यांचा एकमेव साथीदार त्यांना सोडून गेल्याने ते एकटे पडले. भाऊकडे पैशाची चणचण होती, त्यामुळे मराठ्यांनी दिल्ली दरबारातल्या रुप्याच्या छताचा भाग काढला. ८ ऑगस्टला त्यापासून ९ लाख रुपयांची नाणी रोजच्या खर्चाकरिता पाडण्यात आली. होळकर व नजीब यांचे आतून सख्य होते. शिंदे-होळकरांचे कारभारी शुजा, इमाद, सुरजमल यांच्याशी वाटाघाटी करत होते. मराठ्यांवर आणीबाणीचा प्रसंग ओढवल्यावरही या मंडळींचे नेहमीचे उद्योग सुरु होते.
पावसाळा त्यामुळे यमुनेला पूर, तसेच मराठा छावणीत पैशाची चणचण व धान्य साठा संपत चालला होता. परिस्थिती इतकी खालावली होती की जनावरांना चारा मिळत नव्हता. याउलट अब्दाली दुआबात होता. त्याच्याकडे साधनसामग्रीचा तुटवडा नव्हता. भाऊने पेशव्याला मदतीसाठी पत्रे लिहिली होती. सप्टेंबरचा महिना उलटला आणि परिस्थिती आणखी खालावली. १ सप्टेंबरला भाऊने पेशव्याला लिहिले,'छावणीत उपासमार होत आहे.पण कर्ज मिलत नाही.कुणी पैसे द्यायला तयार नाही.सैनिकांना फाके पडत आहेत.' भाऊंनी गोविंदपंत बुंदेले यांना पण बरीचशी पत्रे लिहिली होती. परंतु ते ही फार मदत करू शकले नाहीत. भाऊची आणि सैन्याची परिस्थिती खालावत चालली होती. पैशाची नड हे कारण पुन्हा समोर येत होते. याउलट अब्दाली अनूपशहरला सुखात होता. दिल्लीच्या उत्तरेला १२० किलोमीटर अंतरावर यमुनेच्या पश्चिम तीरावर कुंजपुरा हे एक महत्वाचं ठिकाण होतं. तिथं नाजाबतखानाचा किल्ला होता. अब्दस समदखान आणि कुतुबखान मोठ्या फौजेसह यमुनेचा पूर उतरण्याची वाट बघत येथे थांबले होते. त्यांना नदी ओलांडून शहादऱ्याला अब्दालीकडे जायचे होते. इथलं अफगाण सैन्य व साधनसामग्री याची खबर भाऊला लागल्यावर त्यांनी कुंजपुऱ्यावर हल्ला करण्याचे ठरवले. १७ ऑक्टोबर १७६० ला मराठ्यांनी कुंजपुरा काबीज केला. इब्राहिम खानाच्या तोफखान्याने खूप मोठे काम केले. १९ ऑक्टोबरला दसरा होता. कुंजपुऱ्याच्या लढाईत मराठी फौजांना ७ हजार घोडी, ७ लाख रुपये, उंट, बंदुका, प्रचंड दारुगोळा आणि दहा हजार खंडी धान्य सापडले. त्यामुळे मराठ्यांचा दसरा धुमधडाक्यात साजरा झाला. पुढे अब्दालीच्या कामी किल्ला येऊ नये म्हणून भाऊंनी तो किल्ला उध्वस्त केला. तिथून कुरुक्षेत्र जवळ असल्याने २५ ऑक्टोबर १७६० ला कुरुक्षेत्री जाण्याकरिता भाऊने कुंजपुरा सोडला. कुंजपुऱ्याच्या लढाईत हजारो अफगाण व तीन महत्वाचे सरदार मारले गेले होते त्यामुळे अब्दालीची तळपायाची आग मस्तकात गेली होती. त्यामुळे आता अब्दालीने यमुना ओलांडायची ठरविली. पण नदीच्या पूर्व तीरावर कुठेही उतार सापडत नव्हता. शेवटी गुलाबसिंग गुजर याने गौरीपूर येथे उतार दाखवला. अब्दाली नदी ओलांडत असल्याची बातमी २५ ऑक्टोबरला संध्याकाळी मराठ्यांना कळाली. २६ ऑक्टोबरला अब्दालीने सर्व सैन्यानिशी यमुना ओलांडली व तो नदीच्या पश्चिम तीरावर आला.
यमुनेच्या तीरावर एक हजार मराठा सैनिक होते. अफगाण सैनिकांनी २८ ऑक्टोबरला बेसावध मराठ्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारले. आता अब्दाली ३१ ऑक्टोबरला संभलका इथं पोहोचला. त्याच्या छावणीचा तळ पानिपतपासून पाच मैलांवर पडला. भाऊने कुरूक्षेत्राहून दक्षिण दिशेला दिल्लीकडे मार्गक्रमण सुरु केले होते. भाऊ शत्रूपासून तीन मैलांवर थांबून आता परिस्थितीचा आढावा घेत होता. इब्राहिम खानाच्या सल्ल्यानुसार भाऊने पानिपत पाठीवर ठेवेले व छावणी भोवती खंदक खणला. पानिपत हे यमुनेच्या पश्चिमेस १० कि.मी. अंतरावर होते. तिथे एक गोड पाण्याचा कालवा देखील होता. शहराभोवती आणि पश्चिमेला दाट जंगल होतं. आता दोन्ही प्रतिस्पर्धी समोरासमोर उभे ठाकले होते.
दीड हजार कि.मी. अंतरावरून आलेले मराठे, उत्तरेतल्या कडाक्याच्या थंडीत उभे होते. त्यांची घराकडची वाट एका बलाढ्य शत्रूने अडवली होती. दोन्ही प्रतिस्पर्ध्यानी युद्ध करण्याची घाई केली नाही. कारण कुणाचीच बाजू वरचढ नव्हती. दोन्ही सैन्यात वाटाघाटी सुरु होत्या. त्या सफल झाल्या नाहीत तर युद्ध निश्चित होतं. मराठ्यांचा तोफांवरील विश्वास वाढला होता. अफगाण सैन्याकडे लहान आकाराच्या तोफा होत्या. त्यांच्याकडे बंदुका आणि उंटावरचे बंदुकधारी स्वार यांची संख्या जास्त होती. अफगाण सेनेत बरेच स्वार आणि तुर्की घोडदळ होते. भाऊने गोविंदपंतास पत्रे पाठवून पैशांची मागणी केली होती आणि अब्दालीची रसद तोडण्यास सांगितली होती. पण यातले कुठलेच काम गोविंदपंतास जमले नव्हते. पानिपत शहराभोवती जो खंदक खणला गेला त्यातून काढलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर तोफा उभारल्या गेल्या. आता अब्दाली दोन कोसांवर होता, तरीदेखील तो हल्ला करायचे टाळत होता. १५ नोव्हेंबरला भाऊने गोविंदपंतास पत्र लिहून बंदुकीच्या दारूची मागणी केली. काशीराज शिवदेव पंडित हा बाजीरावांकडे सेवेत होता नंतर तो शुजच्या सेवेत गेला. तो पानिपतला शुजच्या छावणीत होता. यावेळी त्याचे वय बहुतेक ६० असावे. त्याने दोन्ही सैन्याची वर्णने दिली आहेत. त्यानुसार अब्दालीकडे ८०००० तर मराठ्यांकडे ७०००० लढाऊ सैनिक होते. इतरत्र वेगवेगळे आकडे आहेत. मराठ्यांच्या सरदारांची कुटुंबे त्यांच्या बरोबर होती, तर दुसऱ्या बाजूला अब्दालीचा जनाना त्याच्या बरोबर होता. पार्वतीबाई ह्या भाऊंबरोबर होत्या.
२२ नोव्हेंबरला मोठी चकमक झाली पण अंधार पडल्याने लढाई थांबली. नाहीतर आपण मोठा विजय मिळवला असता असं मराठ्यांना वाटलं. पैशाची चणचण असली तरी पगार वेळेवर मिळाला पाहिजे असा गारद्यांचा आग्रह होता. त्यामुळे मराठा सैन्यात नाराजी होती. कारण त्यांना पगार मिळत नव्हता. होळकरांनी मी गिलच्यांचा समाचार घेतो असं भाऊला सुचवलं. त्यांनी शहावली खानावर हल्ला करून त्याचे दोन हजार सैनिक मारले. नोव्हेंबरच्या शेवटला झालेल्या त्या लढाईत एक हजार मराठे कामी आले. पैसा, दाणागोटा संपत होता. गोविंदपंतांना अब्दालीची रसद तोडणे जमत नव्हते. भाऊसाहेबांच्या कैफियातीत त्यांचा व नानासाहेबांच्या पत्रव्यवहाराचा उल्लेख आला आहे. मराठा छावणीची अवस्था वाईट होत चालली होती. मराठे उपासमारीला बळी पडू लागले होते. तरीदेखील भाऊ खंबीरपणे सर्व सांभाळत होते. विश्वासरावाने पेशव्याला इकडच्या बातम्या कळवायला भाऊने मनाई केली होती. तरीही भाऊच्या नकळत विश्वासरावाने वडिलांना लिहिलं,'गिलच्यांचा पेच भारी पडला आहे.उलगडत नाही.भाऊसाहेब तो अभिमानी पुरुष,यातच गर्द होतील,परंतु व्यंगोत्तर लिहिणार नाहीत.यास्तव संकटात आणखी ५० हजार फौज व १ क्रोड रुपये खजिना असे पाठवता तरी तुमची आमची दर्शने होईल.नाहीतर पत्री लिहिली हीच भेट समजावी.आम्हासारखे पुत्र आहेत व पुढेही होतील,परंतु भाऊ सारिखा बंधू मिळणार नाही.अशा प्रसंगी खांसानिशी येऊन कुमक करावी.' (यावरून विश्वासरावाचे चुलत्यावरचे प्रेम दिसते). कैफियातीनुसार नानासाहेबांनी रघुनाथरावाला बरोबर घेऊन पुणे सोडले. अब्दाली मध्ये असल्याने मराठ्यांचा दिल्लीशी संपर्क तुटला होता. आता अब्दालीने मराठ्यांची रसद तोडायला सुरुवात केली. मराठ्यांचे पत्र-व्यवहार देखील त्याने बंद पाडले होते.एकादं पत्र अफगाणांच्या विळख्यातून सुटून जात असे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्याने छावणी हलवून यमुनेच्या तीरावर नेली. रसद मिळवणे व शुद्द पाणी मिळवण्यासाठी त्यांनी छावणी हलवली असावी. थंडीचा कडाका असल्याने मराठ्यांचे तोकडे कपडे या थंडीला तोंड द्यायला अपुरे होते. याउलट अफगाण चामड्याचे अंगरखे वापरत असत.
पानिपतला येऊन पाच आठवडे झाले तरी भाऊचा आत्मविश्वास दांडगा होता. मराठ्यांनी छाजपूर येथे एक रणखांब उभारला होता. ७ डिसेंबर १७६० ला जोराची चकमक उडाली नजीबखानाच भाऊ सुलतानखान हा सात हजार रोहिले आणि पठाणांना घेऊन चालून आला. मोठी झुंज झाली, ह्या लढाईत बळवंतराव मेहेंदळे यांचा मृत्यू झाला. भाऊसकट संपूर्ण छावणीला याचा जबर धक्का बसला. बळवंतरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई ह्यांनी सती जाण्याचे ठरविले. भाऊने त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आप्पा बळवंत ह्याला भाऊच्या हाती सोपवून त्या सती गेल्या. ७ डिसेंबरच्या युद्धात मराठ्यांची सरशी झाली असली तरी बळवंतरावांच्या मृत्यूनं त्या विजयावर विरजण पडलं. ह्या चकमकीनंतर पुन्हा वाटाघाटी सुरु झाल्या. पाच-सहा दिवस चर्चा झाली, पण सरहद्द कुठे असावी हे काही ठरले नाही. त्यामुळे काहीही निष्पन्न झाले नाही. पुन्हा एकदा दोन्ही बाजूंकडून गोळीबाराच्या फैरी झडू लागल्या. मराठ्यांची रसद अब्दालीने बंड केल्याने त्यांचे हाल होऊ लागले. तसेच दिल्लीहून पैसे येत नव्हते. गोविंदपंतांकडून काहीच मदत होत नव्हती. त्यामुळे त्यांनी भाऊचा रोष ओढवून घेतला होता. गोविंदपंत पैसे गोळा करण्यासाठी दुआबात शिरले. तेथील स्थानिक जेता गुजर याच्याकडून खंडणी येणार असल्यामुळे गोविंदपंत त्याची वाट बघत गाझियाबाद जवळ थांबले. जेता गुजराने ही खबर अब्दालीस पोहोचवली. अब्दालीने अताईखानास त्यांचा समाचार घेण्यास पाठविले. बेसावध असलेल्या गोविंदपंतांवर हल्ला करण्यात आला व त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. २२ डिसेंबर रोजी अब्दालीने ते शीर भाऊकडे पाठवलं. गोविंदपंतांच्या मृत्यूमुळे भाऊचा अब्दालीची रसद तोडण्याचा मनसुबा धुळीस मिळाला. मराठ्यांचा पैशाचा प्रश्न सुटत नव्हता. मराठ्यांनी स्वतःकडचे सोन्याचांदीचे दागिने वितळवून नाणी पाडली आणि त्या नाण्यांना भाऊशाही, जनकोशाही, मल्हारशाही अशी नावं दिली. त्यामुळे काही दिवसांचा प्रश्न मिटला.
२२ डिसेंबरला कृष्णराव बल्लाळ याच्या बरोबर गोळा केलेली दहा हजार रुपयंची रक्कम दिल्लीहून पाठवली गेली. ती रक्कम सुखरूप छावणीत पोहोचली. ३० डिसेंबरला अब्दालीने पुन्हा छावणी हलवली.आता तो पानिपतच्या आग्नेयेला मोगल शहा राह मार्गावर गेला. दादाजी पराशर यांच्याकडे गोळा केलेले दिड लाख रुपये होते. ते घेऊन १ जानेवारी १७६१ ला दिल्लीहून निघाले. पण त्यांना अब्दालीने छावणी हलविल्याचे माहित नव्हते. त्यामुळे ते लोक चुकून अब्दालीच्या छावणीत घुसले. अफगाणांनी हल्ला करून त्यांना लुटलं. पेशवा दख्खनेतून निघाला होता पण त्याची तब्येत ठीक नव्हती. मराठ्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या होत्या. तरी त्यांची लढण्याची क्षमता कमी झाली नव्हती. १० जानेवारी १७६१ ला मराठ्यांनी मकर-संक्रांत साजरी केली. त्यावेळेस नानासहेब पेशव्याचा मुक्काम एलीचपूरजवळ होता. युद्धाचे डावपेच ठरवण्याकरिता मराठे सरदार एकत्र जमले.सदाशिवरावभाऊ, विश्वासराव, जनकोजी शिंदे, मल्हारराव होळकर, विठ्ठल शिवदेव, दमाजी गायकवाड, यशवंतराव पवार, इब्राहिम खान गारदी, मानाजी पायगुडे ह्या सगळ्यांनी उपासमारीपेक्षा लढून मरणे श्रेयस्कर असे ठरवले. भाऊवर स्त्रियांची जबाबदारी होती.इब्राहिमखानच्या मते, सैन्याची चैकोनाकृती रचना करून त्याच्या मध्यभागी बाजारबुणगे ठेवावेत आणि त्यांच्या भोवती तोफांचा चौकोन निर्माण करावा. असा चौकोन आठ मैल मार्गक्रमण करून यमुनेपर्यंत जाईल आणि मग नदी पाठीशी घेऊन, अफगाणांना वळसा घालून दिल्लीला जाता येईल. १३ जानेवारी १७६१ च्या रात्रीपर्यंत खलबत चालली होती. संपूर्ण छावणीत संदेश गेले आणि उरलं-सुरलं धान्य जमवून सर्वांना पोटभर जेवण देण्यात आले.
पौष शुद्ध अष्टमी शके १६८२, बुधवार दि.१४ जानेवारी १७६१ चा दिवस उजाडला. मराठी सैन्य पहाटेच जागे होऊन सर्व विधी उरकून युद्धास सज्ज झाले. मराठ्यांनी ठरलेल्या आखणीप्रमाणे आपले सैन्य उभे केले. मराठ्यांचे तोंड आग्नेयेकडे होते. बाजारबुणगे मधे होते. सदाशिवरावभाऊ व विश्वासराव हत्तीवर अंबारीत बसले होते. जनाना व बाजारबुणग्यांच्या मागे जनकोजी शिंदे व पेंढारी होते आणि सर्वात मागे मल्हारराव होळकर होते. अब्दालीच्या टेहळणी पथकांनी मराठ्यांच्या हालचालींची खबर अब्दालीला दिली त्याप्रमाणे त्याने स्वतःच्या सैन्याची पूर्व-दक्षिण अशा चंद्रकोरीच्या आकाराची सैन्यरचना केली. हुजुरातीच्या समोर अब्दाली आणि त्याचा वजीर शहावली खान होते. उजवीकडे आमिरखान व बहादूरखान होते. डावीकडे शुजा तर शिंदे यांच्या समोर खासा नजीब होता. नजीबच्या डाव्या बाजूला शहापसंदखान होता. १४ जानेवारी १७६१ ला सकाळी ९ वाजताची सैन्याची रचना:-
पहिला प्रहर उजाडताच युद्धाला सुरुवात झाली. मराठ्यांनी अफगाण व रोहील्यांची पाचावर धारण केली. इब्राहिम खानच्या तोफांनी रोहील्यांच्या तुकडीला खिंडार पाडले. गारद्यांनी वीस-बावीस हजार रोहिल्यांचा धुव्वा उडवला. पेशव्यांच्या सैन्याने शहवालीखानावर जोरदार हल्ला केला. त्यात एक चूक झाली, शत्रूला मारण्याच्या नादात भाऊसाहेब आग्नेयेकडून दक्षिणेकडे वळले. मराठ्यांचा हल्ला इतका जोरदार होता की वजिराचे सैन्य पळून जायला लागले. ते पाहून शहावालीखन तोंडात माती घालत होता. अब्दालीने राखीव फौज त्या पळालेल्या सैन्याला माघारी आणण्यास पाठविली. त्याने शहावलीला नव्या सैन्यानिशी पुन्हा हुजुरातीवर हल्ला करण्यास पाठविले, ह्या हातघाईत भाऊ व विश्वासराव अंबारीतून उतरून घोड्यावर स्वार झाले. भाऊ परी नावाच्या घोड्यावर तर विश्वासराव दिलपाक नावच्या घोड्यावर होते. गोविंदपंतांना मारणारा शहावालीचा पुतण्या अताईखान ठार झाला. मराठ्यांचा हल्ला इतका जबरदस्त होता की अफगाणी फौजेची दाणादाण उडाली. दुपारी एक वाजेपर्यंत अब्दालीची उजवी आणि मधली फळी नाममात्र शिल्लक होती. दुपारी एक वाजताची परिस्थिती:-
दुपारी तीनच्या आसपास घोड्यावर बसलेल्या विश्वासरावाला छातीत गोळी लागली आणि तो जागीच ठार झाला. भाऊ जवळच होता. पुतण्या पडल्यावर त्याचा शोक अनावर झाला. बखरीनुसार,'अमोल्य मदिमोल्या पेक्षा विश्वासराव गतःप्राण झाले.श्रीमंत राजश्री प्रधानपंताचे प्राणाचा ही प्राण विश्वासराव ईश्वरे परम खेद सिधु भाऊस प्राप्त करविला.सदसिवपंताची वीरश्री संपदा अगदी लायते पावली.भाऊची वीरश्री लक्षुमी तेजहीन जाली.भाऊ अंतरी दुखानले,दुखंड जाहले. 'विश्वासरावाचा मृतदेह अंबारीत ठेवण्यात आला. भाऊंचा धीर सुटला व ते युद्धाच्या खाईत घुसले. विश्वासरावाच्या मृत्यूची बातमी छावणीत पसरली व पळापळीला सुरुवात झाली. मराठ्यांच्या सेनेत असलेल्या पठाणांनी मराठे हरले आहेत असा गोंधळ उडवून दिला. पळापळीला ऊत आला, त्यावेळेस विठ्ठल शिवदेव पळाले. कदाचित दमाजी गायकवाड त्यांच्या बरोबर होता. होळकरांनी युद्धभूमी कधी सोडली कळत नाही पण ते युद्ध संपण्यापूर्वी निघून गेले होते. भाऊ निकरान लढत होता. समशेर बहादूर त्याच्या जवळ होता. यशवंतराव पवार लढताना पडले. अब्दालीचे उंटावरील बंदुकधारी आता मराठ्यांच्या वेध घेऊ लागले. युद्धाचे पारडे फिरले.
जखमी झालेल्या इब्राहिम खानाला रोहिल्यांनी कैद केले. सोनजी भापकर देखील युद्धात पडले. भाऊने आपल्या पत्नीची जबाबदारी विसाजी कृष्ण जोगदंड याच्या हाती सोपवली होती. युद्धात हरले तर, शत्रूच्या हाती पडण्याआधी तिचा शिरच्छेद करावा अशी आज्ञा दिली होती. पण विसाजी आणि त्याच्या माणसांनी तिला मागे ठेवून आधीच पळ काढला. जानू भिंताडा या खिजमतगारान तिला संकटातून सोडवले. भाऊच्या सैन्यातले नामवंत सरदार पडले. बरेच पळून गेले. स्वतः भाऊ धुमश्चक्रीत बेपत्ता झाला. इब्राहिम खानाचा मुलगा व जावई ठार झाले. समशेरबहाद्दर जखमी होऊन जाटाच्या मुलुखात दीग ला पोहोचला, पण औषध उपचार मिळूनही जखमांमुळे त्याचा अंत झाला. अंताजी माणकेश्वराचा बलुची जमीनदाराने वध केला. जनकोजी शिंदे जिवंत कैद झाला. नाना फडणीस व महादजी शिंदे यातून वाचले. दुपारपर्यंत मराठ्यांच्या हातात असलेली वीरश्री ही जणू मृगजळच होते असे झाले. अफगाणी सैनिकांनी मराठी छावणी पुरी लुटली. जे लोक शिल्लक राहिले होते त्यांची कत्तल केली. अब्दालीने वीस कोसांच्या परिघातल्या मराठ्यांची कत्तल करण्याची परवानगी दिली. या काळात बीनलढाऊ नऊ हजार लोक मारले गेले. युद्ध कैद्यांची संख्या बावीस हजारावर गेली. शुजानं अफगाण सैनिकांना दोन हजार रुपये देऊन विश्वासरावाचा मृतदेह ताब्यात घेतला. शुजानं बऱ्याच मराठी सरदारांचे मृतदेह ताब्यात घेऊन त्याचे अंत्यसंस्कार केले. दुसऱ्या दिवशी भाऊचा मृतदेह शोधण्याकरिता शुजाने काही लोक पाठवले. तेव्हा तिथे एक धड सापडले, त्याखाली सात मोती पडलेले आढळले. तो मृतदेह काही मराठी लोकांना दाखवण्यात आला व जन्मखुणा व मुझ्झफर खानाने केलेल्या वाराच्या व्रणावरून ओळख पटली. त्यानंतर पठाणाकडून भाऊचे शीर ताब्यात घेतले व काशीराज आणि अनुपगीर गोसावी यांनी क्रियाकर्म पार पाडले.
सदाशिवरावभाऊ सारख्या सेनानीचा असा दुर्देवी अंत झाला. 'हिंदुस्थानी लोकांची सत्ता हिन्दुस्थान्यांच्या हातात' यावरूनच भाऊचा दृष्टीकोन दिसतो. त्याने कधीही मोठेपणाची हाव केली नाही आणि त्यागही केला. राज्यचं कल्याण हे त्याचे एकमेव ध्येय होते. त्याला कुणी वारस नव्हते. भाऊ युद्धातून निसटला असा लोकांचा समज होता. त्यामुळे पुढच्या काळात त्याचे तोतये आले पण ते सगळे खोटेच होते. भाऊ साहेबांचे चोख कारभार, दृढनिश्चय, प्रचंड बुद्धिमत्ता, तडफ, निरलसता इत्यादी गुणांत भाऊसाहेबांची बरोबरी करेल असा पुरुष म्हणजे उत्तर पेशवाईत थोरले माधवराव पेशवेच!
भाऊंना खोटेपणा अजिबात खपत नसे.त्यांची वागणूक जरबेची असे. ते महत्वाकांक्षी होते. महादजीपंत पुरंदरे यांचे भाऊ बद्दलचे काही उद्गार आहेत,'भाऊ हा आपल्या बापाप्रमाणे तापट व इरेस पडणारा आहे.ज्या गोष्टीचा अभिमान तो धरील ती तो मेला तरी सोडणार नाही'
भाऊसाहेबांनी केलेली मद्यपानबंदी(सन १७५४) पुष्कळ दिवस होती. हिंमत, साहस, जरब या गुणांमध्ये भाऊसाहेब नानासाहेबांपेक्षा वरचढ होते. २३ फेब्रुवारी १७६१ ला नाना पुरंदरेंना नानासाहेबांनी लिहलं,'येक भाऊवाचून दुनिया दौलत व्यर्थ आहे.त्याचे हातचे पत्र पाहीन तेव्हा माझे बायकोस मला जीव येईल.आता तो वेडेपणा आहे.लेक अल्पायुषी होता.सूर्यमंडळ भेदून गेला.चिरजीव भाऊ वाचून दुनिया व्यर्थ आहे.' भाऊच्या आणि विश्वासरावाच्या जाण्याने पेश्व्यावर खूप मोठा दुखःचा डोंगर कोसळला. त्यांच्या जाण्याने पुढच्या राजकारणाची सगळी समीकरणे बदलली. काशिराजाच्या बखरीला प्रस्तावना लिहिणाऱ्या प्रो.एच.जी.रॉलीन्सन याने त्या प्रस्तावनेत लिहिलं आहे,'पण शेवटी,जो सेनापती विजयी होतो,त्यानं कमी चुका केलेल्या असतात.वेलिंग्टन आणि नेपोलियन यांनी waterloo च्या मोहिमेत जितक्या चुका केल्या,त्याच्या दशांशानंही भाऊन चुका केल्या नाहीत.तो हरला,पण या पराभावाच कारण भाऊ कमअस्सल सेनापति होता हे नसून त्याचा प्रतिस्पर्धी त्याच्यापेक्षा सरस होता हे आहे.' पानिपतच्या युद्धाचा जेता अब्दाली त्या युद्धानंतर पुन्हा हिंदुस्थानावर चालून येऊ शकला नाही यातचं भाऊचा विजय आहे.
कित्येक इंग्रजी लेखकांचे मत असे आहे की पानिपतच्या प्रसंगाने मराठ्यांचा अधःपात न होता त्यात त्यांच्या लौकिकाचा वृद्धींगत झाला.मेजर इव्हान्स बेल लिहितो,'Even the battle of Panipat was a triumph and a glory for the Marathas.They fought in the cause of'"India for the Indians"while the great Mohamedean Princes of Delhi,of Oude and the Deccan stood aside,intriguing and trimming.And though the Marathas were defeated,the victorious Afghans retired and never again interfered in the affairs of India'
१८७७ साली राम सतवा या कवीने भाऊ वर पोवाडा लिहिला त्यातील काही ओळी:

पेशवा अहमदनगर इथे उदगीरचा विजयोत्सव साजरा करत असताना,१३ फेब्रुवारी १७६० ला त्याला दत्ताजीच्या मृत्यूची बातमी कळली. त्यानं आपल्या मुख्य सरदारांना औरंगाबादच्या जवळ असलेल्या पतदूर(परतूर) इथं बोलावलं. शिंदे-होळकर सोडून सर्व सरदार आले आणि १३ मार्च नंतर पुढे काय करावे याची चर्चा सुरु झाली. रघुनाथरावास मोहिमेस पाठवणे योग्य ठरणार नाही असे चर्चेत दिसून आले. त्याने मोहिमेसाठी १ कोटी व ८० हजार घोडदळ अशी मागणी केली होती. आधीच्या मोहिमेत रघुनाथरावाने कर्ज केले होते. त्यामुळे सदाशिवराव भाऊकडून त्याची खरडपट्टी होत असे. रघुनाथरवानं भाऊला पुढच्या मोहिमेला तुम्ही जाऊन 'चांगली कामगिरी करून दाखवा'असा टोमणा मारला होता.भाऊने त्यास उत्तर दिलं,'स्वारीस जाऊन पैका घरात आणावा किंवा कर्ज घेऊन घरास यावे?अशी कोठे चाल पहिली नाही' त्यामुळे उदगीरच्या मोहिमेचा विजेता सदाशिवरावभाऊ यांची सर्व संमतीने निवड करण्यात आली. शिंदे आणि होळकरांनी अब्दाली कडून मार खाल्ला होता. सरदारांना भाऊ विषयी आदर होता. रघुनाथरावालाही भाऊच्या युद्धकौशल्याबद्दल आदर होता. त्रस्त झालेल्या दुसऱ्या आलमगीर बादशाहाने २० ऑगस्ट १७५९ ला थेट भाऊला फर्मान पाठवलं. त्यात त्याने भाऊला 'सदुराव भाऊजी बहादूर'असं संबोधून बादशहाच्या प्रांताचा कारभार हाती घेऊन स्वतःच्या वेतनाची व्यवस्था करावी असं लिहिलं आहे.

भाऊसारखा मोहरा | आम्हावर का रुसला पंचीप्यारा ||धृ||
चेतली जणु खूप झाली लढाई | मार होती सवाई ||
त्याचा रांग बारगीर बिलाई | गिलचा करितो घाई ||
झाला मोड पळती कुळशाही | पालखीस गणती नाही || एक एक पळून माघारा आला | रणी राहिला बिचारा ||धृ||
संदर्भ: मराठा रियासत
Solstice At Panipat
पेशवाई
मराठ्यांच्या इतिहासाची साधने
बखर पानिपतची
पेशवे घराण्याचा इतिहास
पुण्याचे पेशवे
पेशवेकालीन महाराष्ट्र
पेशव्यांची बखर
भाऊसाहेबांची कैफियत
भाऊसाहेबांची बखर
नाना फडणीस यांची बखर
ऐतिहासिक पोवाडे
काव्येतिहास संग्रह
पुरंदरे दफ्तर
महाराष्ट्र इतिहास मंजिरी
(लेखात दिलेली नकाशा चित्रे ही डॉ.उदय कुलकर्णी लिखित Solstice At Panipat मराठी आवृत्ती ह्या पुस्तकातून घेतलेली आहेत.)
Ⓒतुषार माने

Comments