***महाराजांना_फसवलं***

लेखाचा मथळा बघून वाटेल असं का लिहिलंय पण समाजात जे दिसतंय त्यावरून असं लिहिलंय.त्यामुळे कृपया गैरसमज नसावा.

शिवाजी महाराजांचा जन्म शालिवाहन शके १५५१,फाल्गुन मास, शिशिर ऋतू,हस्त नक्षत्र वद्य तृतीया म्हणजेच १९ फ़ेब्रुवारी १६३० रोजी झाला. आपल्या सर्वांच्या दृष्टीने ह्या गोष्टीला अनन्यसाधारण महत्व आहे. जर शिवाजी महाराजांचा जन्मच झाला नसता तर काय झाले असते?ह्या प्रश्नाला अनेक लोक वेगवेगळी उत्तरं देतील. पण माझा विचारण्याचा उद्देश थोडा वेगळा आहे.इतक्या मोठ्या visionary माणसाचा आपल्याकडे जन्म झाला पण त्याला आपण योग्य न्याय देऊ शकलो का?

महाराजांना आपण अनेक विशेषणे लावतो.पण आपण महाराजांना लावू तितकी विशेषणं कमीच आहेत कारण त्यांचा पराक्रम कितीतरी पटीने मोठा आहे.शिवाजी महाराज हे आपल्या सगळयांचे गोत्र आहे.आपल्याकडे लोक शिवाजी महाराजांचे मोठे भक्त म्हणून मिरवत असतात.गळ्यात लॉकेट,हातात कडे तसेच टॅटू पण काढतात.ह्यावरून तुमचे महाराजांवरचे प्रेम सिद्ध होते का?महाराजांचा उदोउदो करणारे अनेक लोक आहेत.डोक्यावर घेऊन फिरणाऱ्या महाराजांना आपण डोक्यात कधी घेणार?

मुळात इतिहास हा विषय संदर्भासहित अभ्यास करण्याचा आहे.पण हल्लीच्या काळात असे काही दिसत नाही.अनेक लोक कोणताही पाठपुरावा न करता बेधडक वक्तव्य करून लोकांची माथी भडकावण्याची कामे करतात.इतिहासाचे फक्त विकृतीकरण केले जाते.काही लोक तर शिवाजी महाराज त्यांची personal property असल्यासारखेच भासवतात. इतिहासाचा योग्य अभ्यास करून येणारी पुढची पिढी घडवायची असते पण आम्हाला एकमेकांची डोकी व पुतळे फोडण्यातून वेळ मिळाला तर आम्ही इतिहासाचा अभ्यास करणार ना?

कधी कधी वाटतं महाराजांनी अफझलखानाला मारले ही फार मोठी चूक केली.त्या धर्मयुद्धात महाराजांनी त्याला लोळवला आणि आमच्या माणसांनी प्रस्थ कोणाचे वाढवले त्या अफझलचे! तो तर मनातून कायम खूष होत असेल की बरं झालं मला शिवाजीच्या हातून मरण आले,कारण माझे नाव चिरकाल लोकांच्या तोंडी राहणार... ह्या युद्धातून आपल्या लोकांनी काय घेतले 'जातीय द्वेष'

महाराजांचा अभ्यास करावा तितका कमी आहे पण तो भावनेच्या आहारी न जाता तटस्थपणे केला तर उत्तम. आज उत्तरेतील मुघल इतिहासकार महाराजांना नको त्याप्रकारे रंगवतात तेव्हा आपले लोक गप्प का? तेव्हा कुठे जाते महाराजांवरचे प्रेम? मी म्हणत नाही त्या इतिहासकारांची टाळकी फोडा पण कागदपत्रांचा योग्य अभ्यास करून त्यांना त्यांचा खोटेपणा सिद्ध करून दाखवा.आणि हे सहज शक्य आहे पण आम्हाला जातीभेद,जातीय द्वेष यातून वेळ मिळाला तर आम्ही ते करणार!

राजकारण्यांनाही शिव्या घालण्यात काय अर्थ आहे,कारण त्यांनी आपली नस बरोबर ओळखली आहे.ते आपल्याला महाराजांचे नाव घेऊन काही प्रलोभन दाखवतात आणि आपण ये रे माझ्या मागल्या सारखे चालू पडतो.मला तर नेहमी वाटतं महाराज नेहमी जेव्हा वरून आपल्याकडे बघत असतील तेव्हा त्यांना नेहमी एक गोष्ट जाणवत असेल की, मी ह्या राजकारण्यांची कायमस्वरूपी सोय करून टाकली महाराष्ट्रात जन्म घेऊन! महाराजांची किंमत कमी करून टाकली आहे आपण याउलट मला तर वाटत किंमत ठेवलीच नाही आपण त्यांना!

महाराजांचे नाव घेऊन धडधडीत खोटं कसं बोलावं याचे classes पण लवकरच सुरू होतील.
समर्थ रामदास स्वामी संभाजी महाराजांना लिहितात,
शिवराजाचे आठवावे रूप|शिवराजाचा आठवावा प्रताप|
शिवराजाचा आठवावा साक्षेप|या भूमंडळी||
शिवराजाचे कैसे बोलणे|शिवराजाचे कैसे चालणे|
शिवराजाचे सलगी देणे|कैसी असे||
ह्या गोष्टी फक्त संभाजी महाराजांनाच लागू होत्या का?आता आपल्याला लागू होत नाहीत का?महाराजांनी काय केले आणि आपण काय करतो?

समर्थच लिहितात,
आहे तितके जतन करावे|पुढे आणिकही मेळवावे
महाराष्ट्र राज्य करावे|जिकडे तिकडे||
स्वतः च पुरत नाही त्यामुळे दुसऱ्याच ओरबाडून घेण्याची सवय लागल्यामुळे महाराष्ट्राचे सुराज्य करण्यास वेळ कैसा मिळे?

महाराजांना आपण सपशेल फसवलं आहे.तरीदेखील त्यांचं नाव बदनाम होणार नाही असं कुठलंही कृत्य करणार नाही याची काळजी तरी घ्यावी. महाराजांचं काही देणं लागतो असं वाटतं असेल तर,
त्याहून करावे विशेष|तरीच म्हणवावे पुरुष
याउपरी आता विशेष|काय लिहावे?||

©तुषार माने

Comments

Popular posts from this blog

शिवाजी महाराजांचे आरमार

अखेर मातुःश्रींची भेट झाली !

**कर्तव्यकठोर राधाबाई पेशवे**