बलकुबल औरंगजेब
दक्षिणेत मराठ्यांच्या मुळावर आलेल्या औरंगजेबाला मराठ्यांनी त्राहीभगवान करून सोडले होते.मराठ्यांनी इतकी लांडगेतोड केली होती की,मुघल अक्षरशः हताश झाले होते.मराठ्यांचे राजकुटुंब हाती सापडूनसुद्धा ताराबाईसारख्या रणरागिणीच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या सळसळत्या समशेरींनी त्याची झोप उडवली.औरंगजेबास जराजर्जर अवस्था प्राप्त झाली आणि तो वैफल्याच्या वाटेने जाऊ लागला.
१७०५-६ च्या सुमारास औरंगजेब पूर्ण हताश झाला होता.त्याला मराठी सैन्य किड्यामुंग्याप्रमाणे सर्व बाजूनी कुरतडत असल्याची जाणीव झाली होती.औरंगजेबाची घमेंड उतरवणारे हे पुढील पत्र आहे,त्यात त्याचा निश्चय किती डळमळला होता हे दिसते.सदर पत्र हे १७०५-६ च्या सुमारास बादशहाच्या आज्ञेने फिरोजजंगाला(निजाम-उल-मुल्क याचा बाप) लिहिले आहे.
"बादशहाच्या आज्ञेप्रमाणे मी (इनायततुल्लाखान) कळवीत आहे की, दख्खनच्या सुभेदाराकडून नरकवासी शिवाजी व त्याचा मुलगा यांचे व इतर बंडखोरांचे पारिपत्य झाले नाही.पंचवीस वर्षापूर्वी आम्ही सैन्यासह अजमीरहून निघालो आणि दक्षिणेत तळ दिला.परमेश्वराच्या मार्गानेच चालण्याची आमची नियत होती.या पंचवीस वर्षांच्या काळात परमेश्वराच्या कृपेने विजापूर,हैद्राबाद ही ताब्यात आली.मुसलमानांचे किल्ले काफरांच्या (मराठ्यांच्या) ताब्यात गेले होते,त्यापैकी बहुतेक किल्ले जिंकून घेण्यात आले.शत्रूंना पुन्हा शिक्षा मिळाली.
सिवा जिवंत असेपर्यंत त्याच्यापाशी बारा हजाराहून अधिक स्वार असल्याचे ऐकिवात नव्हते.आणि आता आम्हाला पुन्हा-पुन्हा कळविण्यात येते की,हलकट गनिमांची तीस-तीस, चाळीस-चाळीस हजार स्वारांची सैन्ये सर्वत्र पसरली आहेत.ही सैन्ये माळवा व गुजरात या प्रांती जात आहेत.आमच्यासमोर येणारी बातमीपत्रे पाहता या प्रतिस्पर्ध्यांचे (मराठ्यांचे) सैन्य दोन लाख स्वारांपर्यंत जावे,हे प्रकरण म्हणजे एक गूढ आहे.तुम्हाला हिमद-उल-मुल्क(फिरोजजंग) अनेक गोष्टींची माहिती आहे.या किड्यामुंग्यांचा (मराठ्यांचा) निःपात व्हावा.मुसलमानांच्या संपत्तीवर व अब्रूवर ते घाला घालीत आहेत.हे आक्रमण संपुष्टात यावे याबद्दल तुम्हाला ज्या योजना योग्य वाटतात त्या सुचवीत चला."
सदर पत्रावरून बादशहाने मराठ्यांचा घेतलेला धसका व तसेच मराठ्यांची हिंदवी स्वराज्य टिकवण्याची जिद्द दिसून येते.
संदर्भ:- मोगल दरबाराची बातमीपत्रे
छत्रपती राजाराम ताराराणी
© तुषार माने
(सदर चित्र हे अन्यत्र कुठेही वापरले आहे असे आढळल्यास कारवाई करण्यात येईल.)
Comments