**अकबर व इतर धर्म**



इस्लामच्या पायाभूत तत्वांबाबत त्यांच्या धर्म पंडितांमध्ये असलेले मतभेद व त्यांच्या आपसातील असलेल्या भांडणांमुळे अकबर वैतागला आणि सत्य जाणून घेण्यासाठी त्याने इतर धर्मांच्या विद्वानांना इ.स.१५७८ च्या शेवटला इबादतखान्यात चर्चेला पाचारण केले.अबुल फझल म्हणतो,"The Imperial Court became the home of piligrims of the seven worlds and the scholars of various religious sects."

१) अकबर व झोरोस्ट्रीयन्स:- झोरोस्ट्रीयन उर्फ पारशी धर्माचा विद्वान धर्मगुरू नवसारीचा दस्तूर मेहरजी राणा याच्याशी अकबराची इ.स.१५७३ मध्ये प्रथम भेट झाली होती. इ.स.१५७८ अकबराने दस्तूर राणाला इबादतखान्यात पाचारण केले.त्याच्या संपर्कामुळे अकबरावर पारशी धर्माचा बराच प्रभाव पडला व अकबराने पारशी धर्माच्या काही तत्वांचा स्वीकारही केला.त्याने
दस्तूर राणाला २०० बिघे जमीन इनाम म्हणून दिली.पारशी धर्माच्या प्रभावामुळे अकबराने त्याच्या महालात अखंड अग्निप्रज्वलन प्रथा सुरु केली,अशा रीतीने अकबराने सूर्य,अग्नि,प्रकाश या देवतांविषयी पूज्यभाव बाळगला.

२) अकबर आणि जैनधर्म:- अकबराचा जैन धर्माशी संपर्क इ.स.१५५८ मध्येच आला.इ.स.१५८२ मध्ये अकबराने गुजरातमधील तपगच्छ येथील जैनमुनी हिराविजय सुरी यास इबादतखान्यात पाचारण केले.हिराविजयशी झालेल्या जैन धर्माच्या चर्चेचा अकबरावर इतका प्रभाव पडला की,त्याने स्वतः मांसभक्षण जवळजवळ बंद केले.वर्षातील केत्येक दिवशी साम्राज्यात पशु-पक्षी हत्येवर बंदी घातली.केत्येक कैद्यांना मुक्त करण्यात आले.अकबराने स्वतः प्राण्यांची शिकार करणे सोडून दिले.

३) अकबर आणि हिंदू धर्म:- इतर सर्व धर्मांपेक्षा हिंदू धर्माचा अकबरावर विशेष प्रभाव पडला.पुरुषोत्तम व देवी या हिंदू पंडितांनी अकबराच्या अनेक गहन समस्यांची समाधानकारक उकल केली.पंडितांच्या प्रभावाने अकबराने रक्षाबंधन,दसरा,दिवाळी,वसंतपंचमी इ. हिंदू सन साजरे करण्यास सुरुवात केली.केत्येकदा तो स्वतःच्या कपाळावर कुंकुमतिलकही लावीत असे.हिंदू प्रथेप्रमाणे तो रोज सकाळी प्रजेला झरोका दर्शन देऊ लागला.तो सूर्यनमस्कारही घालीत असे.स्वतःच्या आईच्या मृत्यूनंतर त्याने श्मश्रू केली व हिंदू प्रथेप्रमाणे सुतक पाळले.थोडक्यात एखाद्या हिंदू राजाप्रमाणे अकबर वर्तन करू लागला.

४) अकबर आणि ख्रिश्चन धर्म:- अकबराने ख्रिश्चन धर्माचे मर्म जाणून घेण्यासाठी गोव्यातून काही पोर्तुगीज धर्मगुरुंना इबादतखान्यात पाचारण केले.इ.स.१५८० मध्ये रिडोल्फो अंकाव्हिक्व्हा, ANTONIO MONSARAT आणि एन्रीक्वेज तर इ.स १५८१ मध्ये एडवर्ड लीओटोन आणि ख्रिस्तोफर-डे-व्हागा इबादतखान्यात आले.जेराम झेवियर,इम्मॅन्युएल पिन्हेरो आणि बेनिडिक्ट-द-गोझ यांना अकबर लाहोर मुक्कानी भेटला.या ख्रिश्चन धर्मगुरुंनी प्रेषित महंमद पैगंबर व कुराणाबद्दल अपशब्द वापरल्याने कट्टर मुसलमानांकडून त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला.त्यामुळे अकबराने त्यांची गोव्याला सुरक्षित रवानगी केली.तरीही या धर्मगुरूंच्या सहवासामुळे अकबराच्या मनात मेरी,येशू आणि येशूच्या बारा अनुयायांविषयी पूज्यभाव निर्माण झाला.त्याने विशेष धार्मिक प्रसंगी चर्चमध्ये जाणे सुरु केले.शिवाय आग्रा आणि लाहोर येथे चर्च बांधण्यास परवानगी दिली.अकबराच्या ख्रिश्चन धर्माप्रती उदार धोरणामुळे ख्रिश्चन धर्मगुरुंना आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या.त्यांनी अकबराला ख्रिश्चन करण्याचाही घाट घातला होता,पण लवकरच त्यांचा भ्रमनिरास झाला.जसा अकबराचा ख्रिश्चन धर्माकडे कल होता तसाच त्याचा इतर धर्मांकडे देखील कल होता हे ख्रिश्चन धर्मगुरूंच्या लक्षात आले.डॉ. स्मिथ म्हणतात,''Akbar went so far in relation than different people had reasonable grounds for affirming him to be a Zorastian, a Hindu,Jain or Christian.''

अकबराने या चारही धर्मातील कोणत्या ना कोणत्या तत्वांचा स्वीकार केला;परंतु कोणत्याही एका धर्माचा त्याने स्वीकार केला नाही.उलट पुढे त्याने दीन-इ-इलाही नावाच्या धर्माची स्थापना केली.दीन-इ-इलाही म्हणजे गूढवाद,तत्वज्ञान आणि निसर्गोपासना ह्या तिघांचे मिश्रण होय.ह्या धर्मात रूढी व परंपरांना स्थान नव्हते असे म्हणता येईल.

संदर्भ:-Akbar the great Mogul
           Mughal Government and Administration
           Mughal Rule in India
           अकबरनामा
           मुसलमानी रियासत
           मोगलकालीन भारत

Ⓒतुषार माने

Comments

Popular posts from this blog

शिवाजी महाराजांचे आरमार

अखेर मातुःश्रींची भेट झाली !

**कर्तव्यकठोर राधाबाई पेशवे**