**हिंदुस्थान अमर आहे नि अमर राहील**
स्वदेशावरील वा मानवजातीवरील प्रेम अंतःप्रेरित असेल तर ते उदात्त ठरते नि चिरकाल टिकते. परंतु केवळ बाह्य प्रेरणेतून निर्माण झालेली देशभक्ती नि मानवसेवेची वृत्ती लवकरच कोमेजते आणि लोप पावते.अंतःप्रेरित भक्ती मानवजातीच्या प्रगतीवरील किंवा मानवी जीवनाच्या पावित्र्यावरील श्रद्धेतून उदय पावलेली असते.पण जे कोणत्याही विशिष्ट देशाचे नसून साऱ्या जगाचेच झालेले असतात, अशा निः स्वार्थी देशभक्तांच्या उज्वल मालिकेत सावरकरांची गणना होते.
१९४१ सालात मद्रासला भरलेल्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनात जिनांनी हिंदुमहासभेवर कडाडून हल्ला चढविला. हिंदुमहासभेत कसलीही सुधारणा होण्याची काडीमात्र अशा उरलेली नाही असे त्यांनी मत व्यक्त केले.आणि ब्रिटिश सरकारला अशी धमकी दिली की,"तुम्ही जर पाकिस्तानी राज्यांचा गट निर्माण करण्याची आमची मागणी पुरवली नाहीत, तर दुसरे लोक पुढे होऊन आमची इच्छा पुरी करतील." जिनांनी हिंदुमहासभेविषयी काढलेल्या उद्गारांचे स्वागत करून सावरकर म्हणाले की,"आमच्या निष्कलंक देशभक्तीचाच हा निर्भेळ गौरव आहे." काँग्रेसला इशारा देऊन सावरकर पुढे म्हणाले,"काँग्रेस पक्षानेही पाकिस्तानच्या मागणीची स्पष्ट घोषणा नीट डोळे उघडून न्याहाळावी.मुस्लिम लीगच्या मागणीचा स्पष्ट अर्थ समजून न घेता त्याचा वेगळा अर्थ लावून काँग्रेसने स्वतःची फसवणूक करून घेऊ नये आणि देशाची दिशाभूल करू नये.मुस्लिम लीग पाकिस्तानसाठी आकाशपाताळ एक करणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. "
जिनांना उत्तर देताना सावरकर पुढे म्हणाले,"जिनांनी आपल्या पाकिस्तानला क्रोट राज्यांचा दाखला देऊन आपलीच बाजू लंगडी करून घेतली.आपल्या विशाल राष्ट्रीयत्वाला विसरून या सवत्यासुभ्याची स्वप्ने उराशी बाळगल्यानेच शेजारच्या प्रबळ राष्ट्रांच्या समर्थ्याखाली त्यांना सदैवच चिरडावे लागले हेच नेमके जीनाशहा विसरले."
अशा प्रत्येक लहान जमातीने क्रोट लोकांच्या जमातीपासूनच हा धडा घ्यावयास हवा की, जोपर्यंत ही लहान लहान राष्ट्रे आपल्या शेजारच्या प्रबळ राष्ट्रांशी तादाम्य पावत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या दैवी सदैव वनवास आणि पारतंत्र्यच ठेवलेले आहे! जर्मनीची पाठ फिरताच दुसऱ्या प्रबळ साम्राज्याने जोपर्यंत धाड घातली नाही तोपर्यंत आजचे हे जर्मनदत्त स्वातंत्र्य क्रोट लोकांना उपभोगता येईल.हिंदुस्थानात येणाऱ्या पाकिस्तानच्या योजनेच्या कपाळी क्रोट जमातीचेच भवितव्य येईल ही गोष्ट बॅ. जीना यांनी नकळतच सांगून टाकलेली आहे.
असल्या पाकिस्तानच्या पावसाळी छत्रीप्रमाणे असणारे जन्म हे काही हिंदू राष्ट्राला नवे नाहीत.गेली १०,००० वर्षांच्या हिंदू राष्ट्राने आपले संघटन आणि संवर्धन करताना अशा अनेक शकस्थानांना नि हूणस्थानांना आपल्या बळकट मगरमिठीत कवटाळून नामशेष केलेले आहे.तुमचे अगदी जवळचे असे मोगली साम्राज्यसुद्धा मराठ्यांनी हा हा म्हणता स्थानभ्रष्ट केले.काय घडते आहे हे लक्षात येण्यास पुरेशी उसंतसुद्धा त्या साम्राज्याला मराठ्यांनी दिली नाही.तुमची पाकिस्तान कल्पना यदाकदाचित प्रत्यक्षात आली तरी अल्पकालीन जीवनानंतर तिचीसुद्धा वरीलप्रमाणेच गती झाल्यावाचून राहणार नाही.जिवंत इतिहास हीच गोष्ट उद्घोषित करीत आहे की, अशी छप्पन पाकिस्ताने येतील आणि जातील; पण हिंदुस्थान हे अमर आहे, नि अमर राहीलसुद्धा.
म्हणून हिंदुस्थानातील मुसलमानांना आपली जाती टिकवून शांतता नि सुबत्ता उपभोगण्याचा, अखंड हिंदुराष्ट्रात समाविष्ट होऊन नांदण्याचा, हा एकच मार्ग आहे आणि त्यालासुद्धा पुढील शर्ती आहेत:-
- हिंदुस्थानचे स्वातंत्र्य त्यांना मान्य असले पाहिजे.भारतखंडाचे आणि हिंदू राष्ट्राचे अविभाज्यत्व त्यांनी मान्य केले पाहिजे.
- लोकसंख्येच्या प्रमाणातच प्रतिनिधित्व स्वीकारण्यास त्यांनी सिद्ध असले पाहिजे.
- सरकारी चाकऱ्या या केवळ गुणनिष्ठच राहाव्यात हे त्यांनी मान्य केले पाहिजे.
हिंदुस्थानची भावी घटना याच मूलभूत तत्वाचा आधार घेऊनच मग रचली गेली पाहिजे.भावी भारतीय शासनसंस्थेची ही मूलभूत तत्वे होत.ती सर्वांना सारखीच न्याय देणारीही आहेत.केवळ या आणि याच अटीवर मुसलमान येत असतील तर त्यांच्यासह, ते येत नसतील तरीही त्यांच्यावाचून आणि ते आडवे येतील तर त्यांचा प्रतिकार करून हिंदुस्थानच्या एकसंध अशा स्वातंत्र्यासाठी झगडण्याचा निर्धार हिंदूंनी केला आहे!!!"
संदर्भ:- स्वातंत्र्यवीर सावरकर:-धनंजय कीर
ऐतिहासिक निवेदने
Comments