**बॉर्न फायटर लोकमान्य टिळक**

आधुनिक भारताचे जनक
                         

दोन दशकांहून अधिक काळ राजकीय क्षेत्र आणि सार्वजनिक जीवनावर लोकमान्य टिळकांनी अधिराज्य गाजवले.Among the political leaders who dominated the thoughts and activities of their countrymen during this period the foremost place must be given to Mr.Tilak.
ज्या काळात भारतीय सुशिक्षित लोक ब्रिटिशांच्या राजवटीचे गोडवे गात होते, जनता सुस्त आणि आपल्या अधोगतीबद्दल उदासीन बनली होती, आणि भारताला अंधकाराने घेरले होते, तेव्हा क्षितिजावर टिळकांचा उदय झाला आणि आत्मसन्मानाचे स्फुलिंग लोकांच्या मनात चेतवून स्वतःच्या अधिकारांसाठी उभे राहण्याचे धैर्य टिळकांनी त्यांना दिले.

भारतातील ब्रिटिशांची सत्ता हे ईश्वरी वरदान आहे तसेच ब्रिटिशांची न्यायबुद्धी भारताची राजकीय प्रगती घडवून आणील असे काही विद्वान लोकांना वाटत असल्याने ते कधीही जनतेकडे गेले नाहीत.आपल्या शक्तीचा खरा उगम लोकांच्या ठायी आहे हे वास्तव त्यांनी कधीच ध्यानात घेतले नाही.लोक घाम गाळत राहिले आणि कुठलीही आशा न धरता सोसत राहिले.तेव्हा परकीय राजवटीच्या राजकीय गुलामगिरीच्या विरोधात लोकांना उभे करणे हे टिळकांनी आपले कार्यक्षेत्र व जीवनोद्दिष्ट बनविले.जोपर्यंत जनतेचे पाठबळ मिळत नाही तोपर्यंत त्यांचे उद्दिष्ट साध्य करता येणार नाही.सनदशीर चळवळ ब्रिटिशांवर काही जास्त परिणाम करणार नाही हे स्पष्टपणे सांगणारे टिळक हे पहिले नेते होते.राजकारण व सामान्य माणूस यांनाही एकत्रित आणणारे टिळक हेच पहिले नेते होते.

राष्ट्राचे मानबिंदू, राष्ट्राचा स्वाभिमान आणि राष्ट्रगौरव यांबद्दल लोकजागृती करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय उत्सव आणि समारंभांचा प्रारंभ केला.स्वदेशीची चळवळ सुरू करणारे ते पहिले पुढारी होते.परंतु त्यांना काही जुन्या लोकांनी विरोध केला.टिळकांना स्वतःचा मार्ग स्वतः खोदावा लागला.ज्याप्रमाणे शिवाजी राजांनी शून्यातून ब्रह्माण्ड निर्मिती केली, त्याचप्रकारचे कार्य टिळकांनी केले.रानडे आणि भांडारकरांसारख्या बुद्धिमान नेत्यांपासून फिरोजशहा मेहतांपर्यंतच्या पुढाऱ्यांशी टक्कर देणे ही सोपी गोष्ट नव्हती. एका बाजूला बलाढ्य सरकार होते, दुसऱ्या बाजूला अर्ज विनंत्या करून सरकारकडून राजकीय सुधारणा करवून घेता येतील यावर श्रद्धा ठेवणारे विद्वान लोक देखील होते.आपली लेखणी, आपले वृत्तपत्र आणि आपले व्यासपीठ यावरून त्यांना सरकारविरुद्ध लढा द्यावा लागला.

कित्येक देशांस तर स्वतंत्रतेचा अधिकार मिळविण्यासाठी हातात शस्त्र घेणेही भाग पडले. कॅनडा,केप कॉलनी,न्यू साऊथ वेल्स वगैरे देशातील लोकांनी हाती शस्त्रे घेऊन उग्र स्वरूप जेव्हा धारण केले तेव्हा कोठे त्यास स्वतंत्र राज्यरीतीचा अधिकार प्राप्त झाला ! इतिहासावरून प्राय: असे निश्चित झाले आहे की लोकांनी उग्र रूप दाखविल्याखेरीज त्यास असला अधिकार मिळत नाही.तेव्हा यावरून सहजच असे अनुमान निघते की हिंदुस्थानच्या लोकांस जर स्वातंत्र्य पाहिले असेल तर त्यांनी विद्येने व शारीरिक शक्तीने आपण त्याचा लाभ करून घेतलेल्या देशातील लोकांच्या बरोबर आहो असे दाखविले पाहिजे.

भारतातील राजकीय कैद्यांच्या तुरुंगातील कष्टमय जीवनाची धार त्यांच्या यातनांनी बोथट झाली, स्वराज्य प्राप्तीसाठी लढणाऱयांकरिता खंदक खोदणाऱ्या आणि तटाखाली सुरुंग पेरणाऱ्या बिनीच्या शिपायांचे लोकमान्य टिळक पुढारी ठरले.आपल्या अखंड कृतीशीलतेने, निर्भयतेने, निःस्वार्थीपणामुळे त्यांनी आपल्या मागून येणाऱ्या, आपल्याला पाठिंबा देणाऱ्या आणि मातृभूमीसाठी मरण पत्करण्यासाठी तयार होणाऱ्या पिढीमध्ये साहसाचे रोपण केले.धारिष्ट्य, निर्णय क्षमता, निर्भयता, उद्दिष्टाशी निष्ठा हे सर्व गुण टिळकांच्या अंगी होते.

भीती हा शब्द कदाचित त्यांच्या शब्दकोशात नसावा. 'मनात आणले तर मी बंडाचा झेंडा फडकवीन' असे त्यांनी एका ब्रिटिश राज्यपालाला सांगितले ! दुष्काळाच्या दिवसांत एक महाराज्यपाल भारतभर दौरे काढून मेजवान्या झोडत होता तेव्हा ते संतप्त झाले आणि खेदाने म्हणाले,'असल्या राज्यकर्त्यांना जाब विचारण्याची हिंमत भारतीयांमध्ये नाही!' त्यांचा प्रभाव जसजसा वाढू लागला तसतसे ब्रिटिश सरकार पुढील आव्हान अधिक व्यापक होऊ लागले, सरकारला त्यांची दहशत वाटू लागली. The passion for freedom was the ruling motive of his life.

ब्रिटिश सरकारविरुद्धच्या या संघर्षामुळे छळणूक, खटले, कारावास, निंदानालस्ती यांसारख्या अनेक गोष्टी टिळकांच्या वाट्याला आल्या, पण ते कधीही डगमगले नाहीत.टिळक हे ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात आशियात बँड करणारे भारतीय पुढारी नव्हते, परंतु पाश्चात्य साम्राज्यवादाच्या टाचेखाली दबल्या जाणाऱ्या आशियाई राष्ट्रांना आणि पुढाऱ्यांना स्फूर्ती देणारे धगधगती मशाल होते.आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी टिळक, गांधी आणि दादाभाई नौरोजी यांपासून स्फूर्ती घेतली असे आपल्या मुंबईतील एका भाषणात इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. सोकार्नो म्हणले होते.

देशकार्यासाठी आपले प्राण पणाला लावणे हा सर्वोच्च त्याग होय हे टिळक जाणून होते.ते भंपक शांततावादी नव्हते किंवा नेभळट नैतिकतावादीही नव्हते.ब्रिटिश सत्तेविरुद्ध जगभरात विद्वेष निर्माण करण्यासाठी आणि स्वराज्याची कल्पना लोकप्रिय करण्यासाठी काँग्रेसची संघटना हे सर्वोत्तम साधन आहे अशी त्यांची खात्री होती.ते सशस्त्र बंडालाही सनदशीर मानत. बॉम्बची माहिती पुस्तिका पाठविण्याकरिता त्यांनी सेनापती बापट यांना दिलेला गुप्त निरोप, दामोदरपंत चापेकरांना चिथावणी देणारा त्यांचा मार्मिक शेरा, हैद्राबादच्या जंगलात लपून दिवस काढणाऱ्या बाळकृष्ण चापेकरांची त्यांनी घेतलेली काळजी, लाला लजपतरायांना हद्दपारी झाल्याची बातमी ऐकताच त्यांनी व्यक्त केलेली स्फोटक प्रतिक्रिया, नेपाळमध्ये दारूगोळ्याचा कारखाना काढण्यासाठी धडपडणाऱ्या त्यांच्या एका सेनानीच्या हालचाली आणि राष्ट्रीय शिक्षणाच्या बुरख्याखाली 1915 मध्ये त्यांच्या अनुयायांनी गोव्यात केलेल्या हालचाली या गोष्टी लपून राहिल्या नव्हत्या.

वासुदेव बळवंतांचे अपयश हा टिळकांना एक इशारा वाटला आणि म्हणूनच सनदशीर मार्गाने लोकांना परक्या राजवटीच्या विरोधात उठवण्यासाठी खुल्या चळवळीची वाट त्यांनी चोखाळली.जनतेची परिस्थिती सुधारण्याची खरी शक्ती लोकेच्छा हे त्यांनी जाणले होते.त्यांना स्वातंत्र्य लढ्याच्या क्रांतिकारक आणि सनदशीर अशा दोन्ही बाजू प्रिय होत्या.

राजकीय निर्बंधापासून आपल्या देशबांधवांची मुक्तता करण्यासाठी त्यांनी पुकारलेला चिरंतन संघर्ष आणि मातृभूमीच्या सेवेसाठी त्यांनी केलेला त्याग आणि परिश्रम यांबद्दल हे राष्ट्र टिळकांचे कायम ऋणी राहील.काँग्रेसच्या चळवळीची बरीचशी बांधणी त्यांनीच केली आणि जनतेला सुप्तावस्थेतून बाहेर काढण्याचे काम केले.ब्रिटिश राजवटीचे गोडवे गणाऱ्यांबद्दल ते तिरस्काराने, संतापाने अवमानकारक विशेषणे वापरून त्यांना नाउमेद करत.टिळकांइतकी कडवट आणि भयंकर वादळे आधुनिक भारतातील दुसऱ्या कोणत्याही पुढाऱ्याने उठवली नाहीत.

टिळकांच्या अंगी उदारपणा पितृवत होता.ते साधे गृहस्थ होते पण भोळसर नव्हते.त्यांना फसवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या हेतूने कोणी लबाड स्तुतिपाठक आले की त्यांचा कावा उघडकीस आणून त्यांना परत पाठवले जाई. 'आपण मला पाचशे रुपये दिल्याचा स्वप्नात दृष्टांत झाला असे एका लबाड माणसाने एकदा त्यांना सांगितले, तेव्हा मलाही तसाच दृष्टांत होईपर्यंत मी काहीही करणार नाही' असे सांगून टिळकांनी त्याचे तोंड बंद केले!
पैशाची त्यांनी कधी काळजी केली नाही.आपल्या कायदेविषयक कुशाग्रतेचा वापर करून जर त्यांनी वकिलीचा व्यवसाय स्वीकारला असता तर त्यांची भरभराट झाली असती, परंतु राष्ट्रसेवेपुढे त्यांच्या लेखी कोणत्याच गोष्टीला अती महत्व नव्हते.

गणित आणि खगोलशास्त्रात प्रवीण असणारे अव्वल दर्जाचे व्यासंगी टिळक जगातील कोणत्याही विद्वद सभेत सर्वश्रेष्ठ ठरले असते.ते खूप मोठे वक्ते होते तसेच संस्कृत वाङमय, ज्योतिषशास्त्र आणि इतिहास यांसारख्या विषयांची जेथे चर्चा होई अशा अनेक सभांमध्ये टिळकांमधील उच्च कोटीच्या विद्वत्तेचे दर्शन घडत असे.पट्टीची विद्ववत्ता आणि प्रभावी लोकनेतृवत्वाचे मिश्रण त्यांच्या ठायी होते.देशी भाषेतून लेखन करून वृत्तपत्र चालवून त्यायोगे आत्मसन्मान आणि राष्ट्रीय चळवळ या गोष्टी जनतेपर्यंत थेट पोहोचविणाऱ्या आद्य भारतीय पत्रकारात टिळकांचा समावेश होता.त्यांची भाषणेही तितकीच शक्तिशाली व परिणामकारक असत.

वाहून घेतलेले आयुष्य, वैयक्तिक सुरक्षितता आणि ऐषारामाची कमालीची नावड, लोकहितासाठी सोसलेला त्रास, विशुद्ध आणि उदात्त खाजगी आयुष्य, कामाची चिकाटी ही त्यांच्या लोकमानसातील प्रभावाची इंगिते होती.खऱ्या अर्थाने ते 'लोकमान्य' होते. 'टिळक हे भारतीय असंतोषाचे जनक होते' असे सर व्हॅलेंटाईन चिरोलेने त्यांना दिलेले दूषण हे सुयोग्य भूषण ठरले!
१९२० मधील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष सी.विजय राघवाचारियर यांनी टिळकांच्या तेजाला किती अचूक शब्दात सलामी दिली पहा:- 'देशकार्यामध्ये झोकून देऊन निःस्वार्थपणे यातना भोगण्यात आपले उभे आयुष्य घालविलेल्या भारतमातेच्या या सुपुत्राच्या नावाच्याआधी राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याच्या बखरीमध्ये क्वचितच कुणाचे नाव लिहिले जाईल.' पंडित नेहरूंनी त्यांचे 'भारतीय क्रांतीचा उद्गाता' असे वर्णन केले.

लोकमान्य टिळक हे स्वतःच एक संस्था तसेच विचारशाखा होते.भारतातील ब्रिटिश सत्ता आणि तिची प्रतिष्ठा यांना सुरुंग लावण्यात त्यांची ताकद आणि आकांक्षा यांनी महत्वाची भूमिका बजावली!
Historians will not fail to recognize that he was one of the men who by indomitable qualities and life long service laid the foundation of the future India under Swaraj.
गांधी आणि अरविंदांनी म्हटल्याप्रमाणे टिळक हे 'आधुनिक भारताचा जनक' म्हणून ओळखले गेले.
The national movement of India, without thinking of Bal Gangadhar Tilak wouldn't be possible and giving him a very high place among nation builders and the makers of New India!

मला आवडणाऱ्या काही ओळी ह्या टिळकांनी स्वातंत्र्यासाठी केलेल्या त्यागास समर्पक आहेत:

Freedom is an
Everlasting hope
That once reached
Can't be taken away

A breeze
Lightly caressing my face
The sun's rays
Illuminating my soul

Freedom
I will not stop striving for you.

संदर्भ:- लोकमान्य टिळक चरित्र
           लोकमान्य टिळक:-धनंजय कीर
           India politics since the mutiny
           निवडक अग्रलेख व पत्रे

Ⓒ तुषार माने



Comments

Popular posts from this blog

शिवाजी महाराजांचे आरमार

अखेर मातुःश्रींची भेट झाली !

**कर्तव्यकठोर राधाबाई पेशवे**