शाहू महाराज स्वदेशी दाखल व बापुजी सोनाजी दिघे यांची कामगिरी
#जुन्या_ऐतिहासिक_गोष्टी
राजाराम महाराजांनी
रामचंद्रपंत यांस हुकूमतपन्हा हे पद दिले होते. त्यावेळी महाराजांच्या आज्ञेवरून
मावळ प्रांतीचे सरदार, देशमुख, देशपांडे, जमीनदार आपले जमावानिसी रामचंद्रपंत
हुकूमतपन्हा यांचे लष्करात सामील होऊन मोठमोठे पराक्रम करीत होते. रामचंद्रपंतांच्या
लष्करात शंकराजी नारायण गांडेकर हे फार हुशार कारकून होते. त्यांनी मावळातील सरदार
व फौजेनिशी मुघलांनी जिंकलेले किल्ले, मुलुख काबीज केले. हे वर्तमान रामचंद्रपंतांनी
जिंजीस लिहून पाठविल्यावर, राजाराम
महाराजांनी शंकराजी नारायण यांना सचिवपदाचा
अधिकार देऊन वस्त्रे पाठविली. शंकराजी नारायण सचिव यांचे फौजेत मुठेखोरे महालचे
दिघे देशपांडे मंडळीतील चौघे सरदार होते. याविषयी इसवी सन १६९८ सालचे एक पत्र आहे.१
(इतिहाससंग्रह)
श्री
“म|| अनाम देशकुलकर्णी तर्फ मुठेखोरे यांसी:-
शंकराजी नारायण सचिव
सुरुसन तिस्सा तिसैन अलफ, बद्दल शेरणी हक्कापैकी बद्दल देणे वेतनात कारकून व लोक
सेवक राजकडी[?]
रुपये ५०
राजश्री महादजी बाजी
सभासद रु. २५, मोरो धाक प्रभु सभासद रु. ६|.
जनाजी राम सभासद
रुपये १२||. बापुजी सोनाजी पदांती पऱ्हा सहश्री रुपये ६|.
एकूण रुपये पन्नास
देविले असेत. आदा करणे. जाणिजे छ. ५ रबिलाखर परवानगी हुजूर मोर्तब असे.”
बार सुरु सुदबार
पत्रात लिहिले आहे
त्यावरून हे चार इसम दिघे व देशपांडे सरदार होते, व बापुजी सोनाजी दिघे हे हजार
पायदळाचे सरदार होते असे दिसते.
राजाराम महाराजांनी सन
१६९९ साली परसोजी भोसले यांस सेनासाहेबसुभा हे पद व सरदेशमुखीची सनद देऊन वऱ्हाड व
गोंडवन प्रांतात अंमल बसविण्यासाठी पाठविले. त्या प्रांतात त्यांनी अंमल
बसविल्यामुळे तो प्रांत त्यांजकडे सोपविला गेला. बापुजी सोनाजी हे हुशार,
बुद्धिवान, पराक्रमी व मुत्सद्दी असे पाहून त्यांजला महाराजांकडून परसोजी भोसले
यांनी आपलेकडे जमेनिसीचे कामावर नेमून घेतले.२(ऐतिहासिक जुन्या गोष्टी खंड २ पृ.१७)
याचवेळी बापुजी दिघे यांस हिंगणी बेरडीचे वतनही देण्यात आले.३(नागपूर राज्याचा उदय
आणि आस्थापना पृ.१७)
इसवी सन १७०७ मध्ये
आझमशहा याने शाहू महाराजांस कैदेतून मुक्त केले. त्यानंतर शाहू महाराज लंबकानी
येथे आले.(येथे सुजनसिंग रावळ याची महाराजांस मदत झाली.)
तेथे त्यांस ताराबाईंकडील सर्व वृत्त कळले. तेव्हा शाहू महाराजांस विचार पडला की,
आपल्या जवळ फौज व ऐवज नाही. इकडे युद्धाशिवाय परिणाम लागेलसे दिसत नाही. तेव्हा
निभाव कसा लागतो या विवेचनात पडले.
शाहू महाराजांची
स्वारी लांबकानीस आल्याचे वर्तमान बापुजी सोनाजी दिघे यांस कळताच, त्यांनी
सेनासाहेबसुभा यांस कळविले की, आपण शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ सरदार. हल्ली शिवाजी
महाराजांचे नातू व राज्याचे खरे मालक जे शाहू महाराज आहेत ते आले आहेत, तरी
त्यांजला भेटावे. त्यांजला इकडील कोणाही सरदाराची ओळख नाही. ताराबाईंशी प्रसंग!
शाहू महाराजांचे बरोबर फौजही नाही. अशा दुर्घट प्रसंगी आपणांकडून त्याजला साह्य
मिळाल्यास आपणांस भूषणास्पद होईल व यांत साधल्यास आपलाही काही फायदाच होईल.
ही मसलत परसोजी
भोसले यांस पसंत पडली, आणि लागलेच परसोजी यांनी आपल्या तर्फे बापुजी सोनाजी दिघे
जमेनिवीस यांसच महाराजांकडे पाठविले. बापुजी यांनी लांबकानीचे मुक्कामी जाऊन
स्वामींचे दर्शन घेतले. शाहू महाराजांसही परमानंद झाला. परसोजी भोसले यांचे
आज्ञेप्रमाणे सर्व बोलणी नेमात आल्यावर, शाहू महाराजांनी बापुजी दिघे प्रभु यांस
सांगितले की, हे सर्व कार्य ईश्वर कृपेने शेवटास गेल्यास तुम्हांस दोन गाव स्वामी
इनाम देतील.
नंतर बापुजी
प्रभूंनी परत येऊन परसोजींस साकल्य वर्तमान निवेदन केले. ते श्रवण करून परसोजींसही
आनंद झाला, आणि स्वामींचे आज्ञेप्रमाणे बापुजीस बरोबर घेऊन, फौजेनिशी परसोजी भोसले
यांनी शाहू महाराजांकडे जाऊन स्वामींचे दर्शन घेतले. शाहू महाराजांनीही त्यांचा
योग्य सत्कार केला. परसोजींसारखे मातबर सरदार अनुकूल जाह्ल्याने शाहू महाराजांस
फारच संतोष होऊन सर्व चिंता दूर झाल्या.
परसोजी भोसले व
बापुजी दिघे देशपांडे यांस फौजेसह बरोबर घेऊन शाहू महाराज साताऱ्याकडे चालले.
परसोजी व बापुजी यांनी नेमाजी शिंदे, हैबतराव निंबाळकर, पिंगळे पेशव्यांचा हस्तक
परोळ्याचा जहागीरदार चिमणाजी दामोदर मोघे वगैरे उत्तरेकडे वावरणारे सरदार शाहू
महाराजांच्या सेवेत रुजू झाले.४(मराठी रियासत खंड ३ पृ.३८) पुढे ताराबाईंच्या
पक्षाशी खेडच्या लढाईचा प्रसंग उद्भवला. त्यावेळेस सेनापती धनाजी जाधव, खंडो
बल्लाळ इ. मंडळी शाहू महाराजांच्या बाजूस आली.
शाहू महाराजांस
राज्यप्राप्ती झाल्यावर बापुजी सोनाजी दिघे प्रभु देशपांडे तर्फ मुठेखोरे यांस वचन
दिल्याप्रमाणे दोन गाव इनाम देऊन राजपत्र करून दिले. सदर पत्र पुढीलप्रमाणे५(राजवाडे
खंड १२, ले.५९ सदर पत्र १९ मे १७०८ या तारखेचे आहे.)

१६३० आषाढ वद्य ५.
स्वस्तिश्री राज्याभिषेक-शके ३५ सर्वधारी संवत्सरे आषाढ बहुल पंचमी, रविवासरे क्षत्रिय कुळावतंस श्रीराजा शाहूछत्रपती स्वामी याणीं रा। बापूजी सोनाजी परभूउपनाम दिघे (शिक्का पेशवे) देशकुलकर्णी व गांवकुलकर्णी तो मुठेंखोरें, सुभाप्रांत मावळ, यांनी इनामपत्र दिल्हें ऐसें जे :- स्वामी परराष्ट्रांतून स्वराज्यांत आले त्या प्रसंगी तुह्मी राजश्री परसोजी भोसलें याची जमी-निसी करून असतां त्याचे तर्फेने स्वामीचे दर्शनास येऊन लांबकानीचे मुकामीं दर्शन घेतले. स्वामीचे आज्ञेवरून राजश्री परसोजी भोसले यांस फौजेनिसी स्वामीचे दर्शनास आणिलें. ते प्रसंगी तुह्मीं सेवा बहुत एकनिष्ठेनें केली व पुढेंही निष्ठेने वर्तणूक करतां. तुमचें ऊर्जित करून वंशपरंपरे चालवणें, हें स्वामीस अवश्यक. याजकरितां तुह्मी विनंति केली की, आपण स्वामीच्या राज्यांतील वतनदार सेवक आहों, जें ऊर्जित कर्णे तें वतनसमंधावरी केलियानें परंपरागत चालेल. त्यावरून स्वामी तुह्मांवरी कृपाळू होऊन नूतन इनाम देहे तो मुठेंखोरं पों। २.
मौजे भवळी १ मौजे टेमघर १ ऐसी, दोनीं गावें इनाम कुलबाब, कुलकानू, खेरीज हक्कदार व इनामदार करून, चतु:सीमा भूमि पूर्व-मर्यादेप्रमाणें देखील जल, तुरू, पाषाण, झाड-झाडोरा, निधि-नि. क्षेपासहित, इनाम आजरामरामत करून दिल्हा असे. तरी सदरहू दोहीं गांवचा इनाम. उपभोग तुह्मीं व तुमचे बापभाऊ जनाजी. राम देशकुलकर्णी खोत पुत्रपौत्रादि-वंशपरंपरेने अनभऊन सुखरूप असणें. स्वामी व स्वामीचे वंशपरंपरेने तुह्मांस दोनी गांव चालवितील. जाणिजे. निदेश समक्ष.
मोर्तब
बार.
सुरुसूद बार.
मोर्तब सुमार २ तेरीख छ १९ रबिलाखर, सु॥ तिसा मया.
मोर्तब सुमार २ तेरीख छ १९ रबिलाखर, सु॥ तिसा मया.
बापुजी दिघे हे
वऱ्हाडात नोकरीवर असतांना त्यांचे वतनावर त्यांचे भाऊपणातील महादाजी रघुनाथ दिघे
देशपांडे हे होते. वर लिहिलेली राजपत्रे बापुजींनी महाराजांकडून घेऊन महादाजी
रघुनाथ यांजकडे स्वदस्तुरचे पत्रासोबत पाठविली. ते पत्र पुढीलप्रमाणे:-
श्रीशंकर
“श्रीयासहस्त्रय चिरंजीव राजश्री महादाजी
रघुनाथ यांसी:-
प्रीतिपूर्वक बापुजी
सोनाजी प्रभु आशीर्वाद उपरी येथील वर्तमान राजश्रीने आमच्या तमाम सनदापत्रा देविल्या
असेत. आम्ही स्वार होऊन सत्वरच येऊ. कळले पाहिजे. यानंतर टेमघरच्या इनामाच्या सनदा
करून पाठविल्या असेत व मौजे भवली व टेमघर येथील जो वसूल घेतला असेल, तो तिजाईमध्ये
मजुरा घेणे(कागद फाटला आहे.) ही पत्रे पाठविली असेत. घेऊन जो वसूल दिवाणात घेतला
असेल तो आपला मजुरा घेणे. ऐसी पत्रे घेतली असेत. ते तुम्हाकडे पाठविली असेत. तूप व
डबे तीन पाठविले ते पावले. कळले पाहिजे. तुम्ही शिरोळास आला म्हणोन वर्तमान ऐकितो.
तर तुम्ही व जनाजी ऐसें भेटीस येणें. भेट जाहलीयावर दुसरे रोजी तुम्हांस निरोप
देऊ. आमचीही रवानगी लवकरच होणार आहे. तर सत्वर भेटीस येणें. हे आशीर्वाद. जनाजीस
रुपये ७|| साडे सात देविले असेत. ते त्याचे घरी पावते करणे. येविशी तुम्हांस(कागद
फाटला आहे.) व त्यास रुपये देविले असत. तर तुम्ही त्याचे घरी रुपये पावते करणे.
येविशी अनमान न करणे हे आशीर्वाद.” सदर पत्रावरून असे दिसते की, महादाजी देशपांडे
यांनी इनाम गाव आपले कब्जात घेतले होते.
परसोजी भोसले यांचे
सुपुत्र कान्होजी भोसले यांच्या काळातही बापुजी सोनाजी दिघे प्रभु यांनी कामगिऱ्या
पार पाडल्या आहेत. मराठे निजामाचा मोड करण्यासाठी दक्षिणप्रांती गेले होते तेव्हा
कान्होजी भोसले देखील होते. त्यावेळेस कान्होजी यांची सरंजामाची पत्रे बापुजी
प्रभु यांजबरोबर पाठविल्याचा उल्लेख आहे.६(शाहू रोजनिशी ले.२३-२४) कान्होजी भोसले
हे शाहू महाराजांशी फटकून वागत असत. बापुजी दिघे हे महाराजांशी एकनिष्ठ असल्याने
त्यास कान्होजीची समजूत घालण्यास सांगितले होते, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
संदर्भ:-
- इतिहाससंग्रह
- थोरले शाहू महाराज यांचे चरित्र:- हेरवाडकर
- मराठी रियासत खंड ३:- गो.स.सरदेसाई
- राजवाडे खंड १२
- नागपूर राज्याचा उदय आणि आस्थपना:- गद्रे
- श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज आणि थोरले राजाराम महाराज यांची चरित्रे:- हेरवाडकर(चिटणीस बखर)
- शाहू रोजनिशी
Comments