रघुजी भोसल्यांच्या शिक्क्याची गोष्ट
#ऐतिहासिक_सत्यकथा
#भाग_२
नागपूरकर भोसल्यांचा इतिहासही दैदिप्यमान आहे.
त्यांच्या इतिहासात जे पुरुष नावारूपाला आले, त्यापैकी एक म्हणजे पहिले रघुजी भोसले होय. सेनासाहेबसुभा
परसोजी भोसले यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सुपुत्र कान्होजी भोसले यांस
सेनासाहेबसुभ्याची वस्त्रे मिळाली. त्यानंतर वऱ्हाडात भाम याठिकाणी त्यांनी आपले
स्थान बळकट केले. सुरुवातीस कान्होजी यांस संतति नसल्याने त्यांनी आपल्या चुलत
बंधूंचे सुपुत्र रघोजी(पहिले) उर्फ बाबासाहेब यांस आपल्याजवळ ठेविले होते. पुढे
कान्होजीस रायाजी नामक पुत्र झाल्यावर त्यांचे रघुजीवरील प्रेम कमी होत गेले. त्यांच्यात
बेबनाव होऊन रघुजी चांदसुलतान गोंड राजे यांच्याकडे चाकरीला राहिले होते. नंतर
फत्तेसिंग भोसले, रघुनाथभट पटवर्धन इ. मंडळींनी साताऱ्यात शाहू राजांकडे रघुजींसाठी
शब्द टाकला होता. पुढे ते फत्तेसिंग भोसले यांच्याबरोबर कर्नाटक स्वारीवर गेले
होते.त्यांनी कर्नाटक प्रांती जाऊन स्वपराक्रम व जवमर्दी करून प्रांत सर केला.
पुढे कान्होजी भोसले यांनी वऱ्हाड प्रांती बदफैलीवर
जुलूम करून महाराजाशी बागी(बंडखोर) झाले. सबब त्यांचे पारिपत्यास रघोजी भोसले उर्फ
बाबासाहेब यांस मुकरर करून समागमे फौज देऊन वऱ्हाड प्रांती रवाना केले. त्यांनी
कान्होजी भोसले याजला काबीज करून साताऱ्यास घेऊन आले. त्याजवरून
महाराज सरफराज होऊन रघोजी भोसले यांजला सेनासाहेबसुभ्याची वस्त्रे व जरीपटका व
साहेबनौबद व शिक्केकट्यार व कोन्हेरराम दिवाण व रखमाजी गणेश चिटणवीस व पटवर्धन
शिक्केनवीस व बक्षी व फडणवीस वगैरे मुत्सद्दी आणि इतर सरदार मानकरी बरोबर देऊन सन
११३९(१७३८
साली) साली वऱ्हाड प्रांती रवाना केले.
रघुनाथभट पटवर्धन झिपरे हे कान्होजी भोसले यांचे
सावकार होते. पुढे ते रघुजींचेसुद्धा सावकार झाले. मागे एकदा त्यांनी काशीहून
व्यापाराकरिता काही नरमीना व पशमिना (रेशमी-लोकरी) माल नागपूरस आणला होता. या
मालावर गोंड राजाने महसूल मागितला. रघुनाथभट यांनी तो देण्याचे नाकारले, तेव्हा त्यास
कैदेत ठेविले होते. त्यावेळेस रघुनाथभट यांनी रघुजी व कान्होजी भोसले यांची मदत
घेऊन कैदमुक्त झाले. पुढे रघुनाथभट यांनी रघुजींकरिता सेनासाहेबसुभ्याची वस्त्रे
मिळविण्याकरिता प्रयत्न केले होते.
रघुनाथभट पटवर्धन यांनी आपल्या बायकोच्या हातातील
पाटल्या मोडून रघोजींसाठी शिक्का करण्याकरिता पाटल्याचे सोने दिले म्हणून पटवर्धन
हेच शिक्केनवीस झाले. रघुजींचा शिक्का वर्तुळाकार असून त्यात पुढील अक्षरे आहेत:-
“शाहुराज-पदांभोज-भ्रमरायितचेतस: बिम्बात्मजस्य
मुद्रेयं राघवस्य विराजते.”
संदर्भ:- १. ऐतिहासिक पत्रव्यवहार
२.
नागपुरचा संक्षिप्त इतिहास
Ⓒ तुषार माने
Comments