पोर्तुगीजांनी(Inquisition) केलेला हिंदूंचा छळ व अन्याय
सदर लेखात आपण पोर्तुगीजांनी(इंक्विझीशनने)
हिंदूंचा छळ कशाप्रकारे केला ह्याबद्दल थोडी माहिती देत आहे. ह्यात
इंक्विझीशन हा शब्द वारंवार आला आहे. The Inquisition may be described as an ecclesiastical
tribunal for the suppression of heresy and punishment of heretics.
पोर्तुगीजांनी हिंदूंचा वसई व गोवा येथे
मोठ्याप्रमाणावर छळ केल्याची अनेक वर्णने आहेत. पोर्तुगीजांच्या अमलाखालील
गोव्याच्या जुन्या काबेजादीतील तिसवाडी, साष्ट व बारदेश ह्या प्रदेशांप्रमाणे वसई
प्रांताचेहि ख्रिस्तीकरण एकाच तत्वावर झाले. ते तत्व म्हणजे “Cuius regio, illius religio” (ज्याचे
राज्य, त्याचा धर्म) हे होय. पोर्तुगीज अमलातील लोकांसाठी ख्रिस्ती धर्म
प्रसारार्थ वेळोवेळी कायदे करण्यात आले होते. वास्तविकरीत्या अशा तऱ्हेचे कित्येक
कायदे पोर्तुगाल येथे ज्यू व मुसलमान लोकांसाठी फार वर्षापासून प्रचलित होते.
गोव्यापेक्षाही वसई प्रांतामध्ये हिंदु लोकांस विशेष तीव्रतेने धर्मछळ सोसावा
लागला असावा. त्या प्रांतातील वतनदारांस आपापल्या गावातील हिंदु जनतेमध्ये त्यांनी
ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी केलेल्या प्रयत्नाचा अहवाल सरकारात द्यावा लागे.
गोव्यात सन १५६० मध्ये इंक्विझीशन स्थापण्यात
आले. खरे म्हटल्यास इंक्विझीशन हे ज्यू व ख्रिस्ती लोकांसाठी होते. पण तेरावा
ग्रेगरी याने incipit Antiqua indoerum improbitas ह्या
आज्ञापत्राच्या आधाराने इंक्विझीशन हिंदू लोकांवरही आपली सत्ता चालवी. लिस्बनच्या National library मध्ये जुवाव देल्गादु फिगैर याने सन
१५६५ पासून १६१५ पर्यंत गोव्याच्या इंक्विझीशनने केलेल्या ३८०० खटल्यांची नोंद Repertorio Geral नावाच्या
हस्तलिखितात मिळते. त्यात पुष्कळ हिंदूंची नावे आहेत. त्यांस फटके मारण्याची
शिक्षा होई किंवा हद्दपार करण्यात येई. साष्टीच्या बखरीत रुपाजी भालेराव वगैरे
इसमांस इंक्विझीशनकडून तेलाची डगली घालून जाळण्यात आल्याचे वर्णिलेले आहे.
हद्दपारीची शिक्षा कित्येक लोकांना मोझांबिक
सारख्या आफ्रिकेतील पोर्तुगीजांच्या प्रदेशात भोगावी लागे. सन १७७४ साली गोव्याचे
इंक्विझीशन बंद झाले, तेव्हा त्यांच्या कैदेत काही ख्रिस्ती इसमांबरोबर बाबू शेणवी
हा उसकई(बारदेश) येथील इसम हद्दपारीची शिक्षा भोगीत होता. सन १६४५ पासून तर
गोव्यातील इंक्विझीशन चौदा वर्षाखालील बाप वारलेल्या हिंदु मुलांस आपल्या ताब्यात
घेऊन त्यांस ख्रिस्ती धर्माची दीक्षा देऊ लागले. गरोदर हिंदु विधवांवर देखील
इंक्विझीशन सत्ता गाजवी.
गोव्यात Inquisition ने तेथील निवासींना(हिंदू) स्वतःच्या
धर्माचे पालन चालू ठेवणे फार कठीण केले होते. हिंदूंची मंदिरे नष्ट केली गेली आणि पोर्तुगीज प्रदेशाच्या बाहेरही नवीन मंदिरे बांधण्याची किंवा त्यांना कायम ठेवण्याची मनाई करण्यात आली. हिंदू पुजारी व शिक्षक यांवरही बंदी घालण्यात आली. ख्रिश्चनतेच्या प्रचाराच्या दृष्टीकोनातून हिंदूंची उपस्थिती अवांछित मानली गेली व त्यांना निर्वासित केले गेले.
इंक्विझीशनने निरनिराळ्या ठिकाणी विविध पद्धतीने लोकांचे छळ केले. E.T.Whittington लिहितात, 'सभ्य मनुष्यांवर भयानक असे हल्ले करण्यात आले. थंब-स्क्रू, लेग-क्रशर्स, Spanish boots, खिळे असणारी चाके यांवर पीडित व्यक्तीला पायाला वजने बांधून झोपविण्यात येई. उकळते तेल त्यांच्या पायावर ओतण्यात येत. तसेच burning sulphur त्यांच्या शरीरावर टाकण्यात येत असे. जळणाऱ्या मेणबत्त्या पिडीताच्या काखेत ठेवत. फादर डी.नोबली या इटालियन जेसुईटाने हिंदू संन्यासाची वस्त्रे स्वीकारली. त्याने स्वतःला 'रोम ब्राह्मण' असे संबोधले आणि मदुरा व आसपासच्या भागातील शेकडो हिंदूंना ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित केले. अशा विविध मार्गांनी लोकांचे धर्मपरिवर्तन केले.
हिंदूंकडून शेंडीकर सुद्धा वसूल
केला होता. सन १७३५ मध्ये एक संन्यासी नारव्याच्या तीर्थामध्ये स्नान करण्याच्या
हेतूने देशावरून गोव्यात आला होता. पोर्तुगीजांनी त्यास पकडून विजरई सांदोमिलच्या
अनुमतीने त्यास सक्तीने जुन्या गोव्यातील बोंजेझूसच्या चर्चमध्ये ख्रिस्ती धर्माची
दीक्षा दिली.
मराठ्यांनी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली वसई व
आजूबाजूच्या पोर्तुगीज प्रदेशांवर मोहीम करण्याचे प्रमुख कारण म्हणजे, हिंदूंचा
चालू असलेला धार्मिक छळ व राज्यविस्तार होय. चिमाजी अप्पांनी वसई सर केल्यानंतर
त्यांचे अभिनंदन करताना मल्हारराव(होळकर) लिहितात, ‘स्वामीनी वसई फत्ते केलीयाची
पत्रे श्रीमंत राजश्री राऊ स्वामीस(थोरले बाजीराव) आली त्यावरून सविस्तर
कळले.....देवब्राह्मणाची संवस्थापना करावयासाठीच स्वामीचा अवतार आहे.’ अमृतराव
शंकर दिनकरराव हाही पुढील शब्दात चिमाजी अप्पांचे अभिनंदन करतो, ‘वसई फत्ते
केली याजपेक्षा....हिंदुराज्याचे संस्थापन स्वामीचे हातून होईल.’ ह्या
नोंदींवरून लक्षात येते की,
पोर्तुगीज अंमल असणाऱ्या प्रदेशातील हिंदूंची अवस्था किती वाईट होती.
पुढे शिवाजी महाराजांचा एक उल्लेख देत आहे.
इंक्विझीशनच्या शिक्षांसंबंधी काही छायाचित्रे
जोडत आहे.
संदर्भ:- १. पोर्तुगेज-मराठे संबंध: डॉ. पांडुरंग
पिसुर्लेकर
२. पेशवे
दफ्तर
३. साष्टीची बखर
४. The Goa Inquisition: A.R.Priolkar
Ⓒ तुषार माने
४. The Goa Inquisition: A.R.Priolkar
Ⓒ तुषार माने
Comments