मिस जेम्स हॉल उर्फ जमालखान
हिंदुस्थानात पुरुष
सैनिकांबरोबर स्त्रियांच्याही पलटणी होत्या. अशाच एका जेम्स हॉल नावाच्या स्त्रीचा
उल्लेख उत्तर पेशवाईत सापडतो. ह्या बाई लष्करी कवायतीत निष्णात होत्या. मूळच्या फ्लोरेन्सच्या
असणाऱ्या ह्या बाईंचा हिंदुस्थानाशी संबंध आला. मिस्टर जेम्स हॉल नावाचे गृहस्थ
मद्रास येथे होते,
त्यांच्याशी या बाईंचा विवाह झाला होता. पण काही कारणांमुळे नवऱ्याशी फारकत घेऊन
या बाईनी शिपाईगिरीचा पेशा स्वीकारला होता. त्या स्त्री पलटणी तयार करीत असत.
त्यांच्या लष्करी पेशावरून त्यांना जमालखान असे नाव मिळाले(बहुधा आपल्या लोकांनी
नावाचा चुकीचा उच्चार केला असावा.)
ह्या बाई १७८८ साली सवाई
माधवराव पेशव्यांच्या कारकीर्दीत पुण्यात आल्या. इथे त्यांनी एक स्त्रीपलटण उभारली.
बाईंचा स्वभाव बराच कडक होता. त्या मोगली सरदारांप्रमाणे मर्दानी पोषाख करून
सेनानायकाचे काम करीत. त्यांच्या सेवेत एक ब्राह्मण नोकर होता व त्याच्याकडून काही
अपराध घडल्यामुळे बाईनी त्यास मरेपर्यंत चोप दिला. ह्या प्रसंगामुळे नाना फडणीसांनी
ह्या बाईंस लोहगडावर कैदेत ठेविले होते. तिथे त्या सात वर्ष कैदेत होत्या. पुढे शिंद्यांचा
फ्रेंच सेनापती पेरान याने बाईंची सुटका केली पण त्यानंतर लगेच मुंबईस जाऊन सन
१७९८ साली ह्या बाई मृत्यू पावल्या.
संदर्भ:- इतिहाससंग्रह
#ऐतिहासिक_माहिती
- तुषार माने
Comments