सेनासाहेबसुभ्यासाठी भोसले बंधुंची भांडणे व देवाजीपंत चोरघडे यांची हुशारी





#ऐतिहासिक_माहिती

नागपूरकर सेनासाहेबसुभा रघूजी भोसले(थोरले) मरण पावले तेव्हा त्यांस चार पुत्र होते. जानोजी, मुधोजी, बिंबाजी व साबाजी. त्यातील जानोजी व बिंबाजी हे चांगले कर्ते होते. जानोजी व साबाजी हे धाकटे स्त्रीचे असून जानोजी हे चौघात वडील होते. मुधोजी व बिंबाजी हे वडील स्त्रीचे होते. रघूजींनी मरणापूर्वी, वडील पुत्र जानोजी यांनी सेनासाहेबसुभ्याचा मुख्य अधिकार चालवावा व बाकीच्या तिन्ही पुत्रांनाही राज्यात वाटणी देऊन त्याचा परामर्ष घ्यावा असे सांगितले होते. 
रघूजींच्या मृत्यूवेळी जानोजी व साबाजी त्यांच्याजवळ होते. त्याचवेळेस मुधोजी यांस गाविलगडचा किल्ला सर करण्यास पाठविले होते. मुधोजी हे वडील बायकोचे सुपुत्र या नात्याने त्यांनी आपला वडीलपणा पुढे करून सेनासाहेबसुभ्याचे पद मिळविण्याचा विचार केला. जानोजी भोसल्यांनी देखील मुधोजींचे मन ओळखून आपली मजबुती करण्यास सुरुवात केली.

मुधोजींनी मार्गातूनच जानोजीस पत्र लिहिले, ‘आम्ही वडील मातोश्रीचे. तेव्हा कनिष्ठ तुम्ही. दौलतीची मालकी आम्हांकडेस. तुम्ही आमचे आज्ञेत वागावे.’ याप्रमाणे लिहून मुधोजींनी वऱ्हाडातून खंडण्या घेऊन फौजा ठेवण्यास सुरुवात केली. सदाशिव हरि, पारोळेकर देशमुख, दिनकर विनायक, महिपतराव दिनकर इ. मंडळी सोडल्यास कुणीही सरदार अथवा मुत्सद्दी मुधोजींजवळ नव्हते. याउलट जानोजींकडे रघूजींच्या वेळचे सर्व सरदार व मुत्सद्दी होते. बाबूराव कोन्ह्रेर, रखमाजी गणेश चिटणवीस, त्रिंबकजी राजे भोसले, नरहर बल्लाळ, कृष्णाजी गोविंद, शिवभट साठे, रघूजी करांडे, बिंबाजी वंजाळ, कृष्णाजी आटोळे, आनंदराव वाघ इ. महत्वाची माणसे जानोजींजवळ होती.

भोसल्यांचे आप्त व इतर मंडळी विचारात पडली. सरतेशेवटी जानोजी वडील असल्यामुळे त्यांसच सेनासाहेबसुभ्याची वस्त्रे मिळणे योग्य आहे, असे ठरवून ती वस्त्रे मिळविण्याकरिता त्रिंबकजी राजे भोसले व बाबूराव कोन्ह्रेर यांना पुण्यास पेशव्यांकडे पाठविण्यात आले. त्याकाळच्या वहिवाटेप्रमाणे राजास/पेशव्यांस नजराणा दिल्याशिवाय वस्त्रे मिळत नसत.

जानोजी व मुधोजी यांची भांडणं या सेनासाहेबसुभ्या करिताच होती. जानोजींच्या वतीने देवाजीपंत चोरघडे(साडेतीन शहाण्यांपैकी एक सबंध शहाणा) यांनी नजराणा ठरविण्याची वाटाघाट केली. देवाजींनी अक्कल हुशारीने वागून या गोष्टी हाताळल्या. त्रिंबकजी भोसले व बाबूराव कोन्हेर याच कामाकरिता पुण्यास गेले होते. पण मग देवाजीपंत मधेच कुठून आले?

त्रिंबकजी राजे भोसले यांच्याकडे कोन्हेरराम उमरेडकर नावाचा एक कारकून होता. त्यांच्याकडे देवाजी म्हणून एक शागीर्द होता. त्रिंबकजी राजे जेव्हा पुण्यास सेनासाहेबसुभ्याच्या वस्त्रांकरिता गेले, त्यावेळेस देवाजी त्यांचेबरोबर पुण्यास गेला. त्रिंबकजी राजे व बाबूराव कोन्हेर यांचे नानासाहेब पेशव्यांशी नजराण्याबद्दल जे बोलणे चालले ते सर्व देवाजी लक्ष देऊन ऐकत असे. एके दिवशी त्रिंबकजी व बाबूराव कोन्हेर दरबारास गेले असता, देवाजीपंतही गेले. दरबार बरखास्त झाल्यावर त्रिंबकजी व कोन्हेर घरास आले पण देवाजीपंत मागेच निजून राहिले. रात्री नानासाहेब पेशवे बसून शृंगारशास्त्रे काढून इतिहास करीत असावे, हा छंद फार. त्यावेळी देवाजीपंत यांनी जागृत होऊन शास्त्र विषयाच्या बोलण्याची निवृत्ती करून बोलू लागले. त्यावरून नानासाहेबांची मर्जी प्रसन्न होऊन विचारले की, ‘तुम्ही कोठे असता?’ त्यांनी विनंती केली जे ‘त्रिंबकजी व कबुराव कोन्हेरे यांजपाशी असतो.’ तेव्हा नानासाहेबांनी आज्ञा केली की, ‘तुम्ही नित्य येत जावे.’ त्यावरून त्यांच्या जाण्यास सुरुवात झाली. नानासाहेबांची मर्जी देवाजीपंतांनी फारच प्रसन्न करून घेतली.

 तेव्हा एके दिवशी ते कोणत्या गोष्टीकरिता आले आहेत हे त्यांनी नानासाहेबांस सांगितले. त्रिंबकजी व बाबूराव कोन्हेर हे नजराण्याची रक्कम दीड लक्ष रु ठरवण्याच्या तयारीत आहेत हे देवाजीपंताने जाणले. त्रिंबकजी व बाबूराव हे यानंतर जानोजीस विचारून नजराण्याची रक्कम नक्की ठरविण्याकरिता नागपूरास आले व जानोजीस ७ लक्षापर्यंत नजराण्याची रक्कम ठरेल असे सांगू लागले.

 देवाजीस ही लबाडी लक्षात आल्यावर त्याने जानोजीस एकांतात भेटून सर्व बारीक मोठे विचार समजून सांगितले. तसेच ही कामगिरी माझ्याकडे(देवाजी) दिल्यास मी नजराण्याची रक्कम अडीच (२||) लक्षावर ठरवून आणतो असे त्याने जानोजीस सांगितले. जानोजीनेही यात आपला बराच फायदा आहे हे जाणून सदर काम देवाजीपंतावर सोपविले. देवाजीने पुण्यास जाऊन नानासाहेब पेशव्यांस सांगितले की त्रिंबकजी व बाबूराव दीड लक्ष देतो म्हणतात तर मी जानोजीकडून अडीच लक्ष देववितो. नानासाहेबांचाही एक लक्षाचा फायदा होत असल्याने त्यांस ही गोष्ट पसंत पडली. अखेर देवाजीपंताच्या मध्यस्थीने नजराण्याची रक्कम ठरली. देवाजीपंताच्या हुशारीने जानोजींचा फायदा झाल्याने त्यांची मर्जीही पंतांवर बसली.

पुढे नानासाहेब पेशव्यांनी भोसले बंधूंना पुण्यास बोलावून त्यांच्यात तडजोडी करविल्या. नानासाहेबांनी हा निकाल सन १७५७ साली करविला. पण जानोजींना कायदेशीर सनद ता. ६-८-१७६१ साली ताराबाईंचे हातून थोरल्या माधवरावांच्या कारकीर्दीत मिळाली.

संदर्भ:-
  1. नागपूरकर भोसल्यांची बखर 
  2. नागपूर प्रांताचा इतिहास
  3. नागपूरकर भोसल्यांचे चिटणीशी बयान
  4. ऐतिहासिक पत्रव्यवहार
Ⓒतुषार माने


Comments

Popular posts from this blog

शिवाजी महाराजांचे आरमार

अखेर मातुःश्रींची भेट झाली !

**कर्तव्यकठोर राधाबाई पेशवे**