म्हाळोजी घोरपडे आणि हिंदू धर्म !
हिंदुराव(बहिर्जी) घोरपडे घराण्याच्या कैफियतीत म्हाळोजींसंबंधी दिलेल्या माहितीचा आशय पुढीलप्रमाणे:-
'म्हाळोजीराव घोरपडे आदिलशाही बादशहाच्या नोकरीत होते. त्यावेळी बादशहाने असा विचार केला की आपण या सलतनतीचे सर्वश्रेष्ठ सत्ताधीश असताना आपले मराठे सरदार हिंदू धर्माच्या पद्धती प्रमाणे आचरण करतात, ही गोष्ट अयोग्य आहे. आपला धर्म आणि हिंदू धर्म हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. हा सर्व प्रदेश आपल्या ताब्यातील आहे. तेव्हा या प्रदेशात सर्व लोकांनी बादशाही धर्माप्रमाणे वागले पाहिजे. तसे त्यांना हुकूम फर्मावले पाहिजेत. या मुलुखातील हिंदू धर्म दरोबस्त बुडवून हिंदूंची देवस्थाने उध्वस्त केली पाहिजेत. त्या ठिकाणी दर्गे व मशिदी बांधून मुसलमानी धर्माचा मोठा प्रसार केला पाहिजे. बादशहाने असा विचार करून आपल्या धर्माच्या सरदारांशी व उमरावांशी त्या बाबतीत खलबत केले. एव्हढेच नव्हे तर, तसे घडवून आणण्यासाठी आपल्या मुलुखात धामधूम चालवली.
त्यावेळी म्हाळोजीरावांप्रमाणेच शहाजी राजे भोसलेही बादशहाचे सरदार होते. म्हाळोजींनी शहाजी राजांशी एकंदर परिस्थितीसंबंधी विचारविनिमय केला. त्यांचे म्हणणे असे की, आम्ही सर्व हिंदू धर्माचे सरदार येथे चाकरी करीत असताना बादशहाचे धोरण जर असेच निमूटपणे पहात राहिलो तर या धर्मात जन्म घेऊन आम्ही काय मिळविले? आपल्या धर्माचे रक्षण करावे, परधर्म भयावह असतो, असे शास्त्रात सांगितले आहे. बादशहाचे वर्तन आमच्या धर्माविरुद्ध होत असेल तर आम्ही गप्प बसणे यौग्य नाही. बादशहा खरोखर सर्व प्रजेशी न्यायीपणाने वागत असेल आणि त्या स्थितीत आम्ही त्याची आज्ञा भंग करू तर त्याचा दोष आमच्याकडे येईल. पण या राज्यात तसा काही प्रकार राहिलेला नाही. बादशहाची प्रजेशी होणारी वागणूक धार्मिकदृष्ट्या पक्षपाताची आहे. अशा स्थितीत आपला धर्म बुडवू देता कामा नये. या निश्चयाने आपण उभयतांनी फौजा तयार केल्या पाहिजेत आणि हिंदू धर्म संरक्षणाच्या मार्गात यवन सरदार फौजेनिशी सन्मुख लढाईस आले तर त्यांचा पराभव केला पाहिजे. '
कैफियतीत दिलेली माहिती म्हाळोजींच्या मनःस्थितीचे तंतोतंत वर्णन करणारी असो वा नसो पण त्यांच्या मनाचा भाव त्यातून दिसून येतो. म्हाळोजींच्या मनात येणाऱ्या ह्या विचारांवरून तत्कालीन काळातील परिस्थिती कशी असावी हे कळते.
म्हाळोजींच्या विचारांचा कापशीकर घोरपडे घराण्याच्या कैफियतीतही उल्लेख सापडतो. 'म्हाळोजी राजे व शककर्ते शिवाजी राजे यांचे हिंदू धर्म संस्थापन करणेबद्दल एकमत होऊन बेलभंडारा परस्परा देऊन तह झाला.'
संदर्भ:- हिंदूराव घोरपडे घराण्याच्या दक्षिणेतील इतिहास
टीप:- खालील चित्र हे प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे.
- तुषार माने
Comments