**आलिया भोगासी(बिचारा फिलिप गिफोर्ड)**

सदर चित्र हे कोणाशीही संबंधित नसून त्या काळातला इंग्रजी अधिकारी कसा असू शकतो हे दाखवण्यासाठी दिले आहे. शके १५८१ मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीसह सप्तमीस म्हणजे १० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी राजांनी अफझलखानास यमसदनी पाठविले.त्यानंतर महाराजांनी आदिलशाहीशी युद्धाची आघाडी उघडली.ते स्वतः आपले मुख्य सैन्य बरोबर घेऊन सह्याद्रीच्या पूर्वेचा म्हणजे देशावरचा विजापुरी मुलुख काबीज करीत निघाले,त्याच समयी काही सैन्य कोकणात धुमाकूळ घालून आदिलशाही मुलुख जिंकून घेऊ लागले.मराठी सैन्य कोकणात घुसल्यावर आदिलशाही सैन्याची पुरती दाणादाण उडाली.विजापुरी अधिकारी आपापल्या जागा सोडून राजापूरकडे पळत सुटले.त्यावेळी राजापूर बंदर आदिलशाहीच्या ताब्यात होते व तिथे रुस्तुमजमा नावाचा अधिकारी तिथला कारभार पाहत असे.ह्या रुस्तुम-इ-जमानचा महाराजांनी कोल्हापूरजवळ २८ डिसेंबर १६५९ रोजी पराभव केला होता.राजापूर ही एक मोठी बाजारपेठ होती.आयात-निर्यातीचे केंद्र असल्यामुळे राजापूर श्रीमंत शहर होते. इ.स.१६५८ च्या उत्तरार्धात इंग्रजांनी तिथे एक वखार उघडलेली होती. दोरोजी(धोरोजी) नावाच्या मराठी सरदाराने कोकणात जोरदार मुसंडी मारली होती....